‘धावांची फॅक्टरी’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली भारतीय संघाचा आधारस्तंभ आहे, तर भेदक गोलंदाजीसह फलंदाजांची भंबेरी उडवणारा डेल स्टेन दक्षिण आफ्रिकेचा तारणहार आहे. भारत व दक्षिण आफ्रिका यांच्यातील लढतीला ‘स्टेन विरुद्ध कोहली’ अशा अनुषंगाने पाहिले जात आहे. मात्र या वैयक्तिक लढतीला मैत्रीची किनार आहे. मैदानावर आम्ही एकमेकांविरुद्ध उभे ठाकू. त्याच्यावर आक्रमण करण्याचा माझा प्रयत्न असेल. मात्र सामन्यानंतर तो पुन्हा माझा मित्र असेल, असे कोहलीने सांगितले.  
विराट व डेल आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून एकत्र खेळत होते. यादरम्यान ते एकमेकांचे मित्र झाले. डेल आता सनरायजर्स हैदराबादकडून खेळत असला, तरी मैत्रीचे ऋणानुबंध कायम आहेत.
‘‘डेल मला जेव्हा भेटतो, तेव्हा घट्ट मिठी मारतो. आम्ही खूप गप्पा मारतो. तो माझा चांगला मित्र आहे. मात्र त्याच्याविरुद्ध खेळताना वर्चस्व गाजवण्याचा माझा सर्वतोपरी प्रयत्न असेल. तोही त्याचा सर्वोत्तम खेळ करण्याचा प्रयत्न करेल. मैदानावर कदाचित आम्ही एकमेकांना काही बोलू, मात्र ते क्षणिक असेल. सामना संपल्यावर आम्ही पुन्हा मित्र असू,’’ असे कोहलीने सांगितले.