प्रमुख फिरकी गोलंदाज, उपयुक्त फलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक व माजी कर्णधार न्यूझीलंडचा डॅनियल व्हेटोरीने मंगळवारी सर्व प्रकराच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली. विश्वचषकाच्या अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभूत झालेला न्युझीलंडचा संघ आज मायदेशी परतला असता चाहत्यांनी खेळाडूंचे जल्लोषात स्वागत केले. त्याचवेळी व्हेटोरीने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीला अलविदा करत असल्याचे जाहीर केले. ‘विश्वचषकाच्या अंतिम फेरीतील सामना हा माझ्यासाठी शेवटचा सामना होता. माझ्या कारकिर्दीचा शेवट उत्तम झाल्याने मी समाधानी आहे’, असे ३६ वर्षीय व्हेटोरीने यावेळी सांगितले.
हॅरी पॉटर!
व्हेटोरीने आपल्या १८ वर्षांच्या कारकिर्दीत फिरकीजादूने एकूण ७०५ बळी टीपले आहेत. विश्वचषकात खेळण्यासाठी व्हेटोरीने कसोटी क्रिकेटमधून विश्रांतीचा निर्णय घेतला होता. उपांत्य फेरीच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत दडपणाच्या क्षणी व्हेटोरीने शांतपणे खेळ करत ग्रँट एलियटला सुरेख साथ दिली होती. अंतिम लढत ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला असल्याने उपांत्य फेरीच्या लढतीत व्हेटोरीला घरच्या मैदानावर शेवटचे खेळताना पाहण्यासाठी हजारो चाहते ऑकलंडच्या ईडन पार्कवर हजर होते.
व्हेटोरीची कमाल!