दुबळ्या अफगाणिस्तानचा सहजरित्या पराभव करत न्यूझीलंडने विश्वचषकातील सलग पाचव्या विजयाची नोंद केली. अफगाणिस्तानने ठेवले १८७ धावांचे सोपे आव्हान न्यूझीलंडने सहा विकेट आणि ८५ चेंडू राखून सहज पूर्ण केले.
डॅनिएल व्हिटोरी आणि ट्रेंट बोल्ट यांच्या अचूक गोलंदाजीमुळे अफगाणिस्तानला न्यूझीलंडपुढे विजयासाठी १८७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. न्यूझीलंडने हे आव्हान चार गड्यांच्या मोबदल्यात पार करत ३७ व्या षटकातच विजयावर शिक्कामोर्तब केले. डॅनियल व्हेटॉरीने याने अफगाणिस्तानच्या चार फलंदाजांना तंबूत धाडले तर ट्रेंट बोल्टने तीन फलंदाजांना झटपट गुंडाळले. गोलंदाजीसोबतच न्यूझीलंडच्या फलंदाजांनी चांगली सुरुवात केली. एम जे गुप्तगिलने ब्रॅडन मॅकक्युलम आणि के.एस.विल्यमसन्सच्या साथीने प्रत्येकी ५३ आणि ५८ धावांची भक्कम भागीदारी केली आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.
त्याआधी, अफगाणिस्तानचा कर्णधार मोहंमद नबीने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.  सलामीवीर जावेद अहमदीला बोल्टने आपल्या पहिल्याच षटकात पायचीत बाद केले. त्यानंतर फिरकीपटू व्हिटोरीने उस्मान घनीला शून्यावर त्रिफळाबाद केले. त्यापाठोपाठ असगर स्टानिकझईला बोल्टने बाद केल्याने अफगाणिस्तानची ३ बाद २४ अशी अवस्था झाली. शेनवारी आणि नवरोझ मंगल धावा मिळवण्याचा प्रयत्न करत असतानाच, व्हिटोरीने मंगलला २७ धावांवर, कर्णधार नबीला ६ आणि झझाईला शून्यावर बाद करत अफगाणिस्तानला सलग झटके दिले. त्यामुळे अफगाणिस्तान शतकसुद्धा पूर्ण करु शकते की नाही अशी अवस्था होती. अखेर झद्रान याने शेनवारीला साथ देत ८६ धावांची भागीदारी करत संघाची धावसंख्या दीडशेच्या जवळ पोचविली. झद्रान ५६ धावांवर बाद झाल्यानंतर अफगाणिस्तानचा डाव पुन्हा कोसळला आणि त्यांचा डाव ४८ व्या षटकांत १८६ धावांवर संपुष्टात आला.