30 March 2020

News Flash

उपांत्यपूर्व फेरी एकतर्फी होणारच होती!

व्यावसायिक बॉक्सिंगमधील जगज्जेत्या माइक टायसनचा दबदबा प्रचंड. त्याला आव्हान द्यायला बस्टर डग्लस नामक कोणी एक महाभाग पुढे सरसावला, तेव्हा ही लढत विजोडच वाटली.

| March 23, 2015 12:13 pm

व्यावसायिक बॉक्सिंगमधील जगज्जेत्या माइक टायसनचा दबदबा प्रचंड. त्याला आव्हान द्यायला बस्टर डग्लस नामक कोणी एक महाभाग पुढे सरसावला, तेव्हा ही लढत विजोडच वाटली. सट्टेबाजांनी भाव दिला १:४२चा. याचा अर्थ बस्टरच्या विजयाच्या बाजूनं तुम्ही पैज लावली आणि चुकूनमाकून बस्टर जिंकून गेला, logo03तर एक डॉलरसाठी त्याची घसघशीत कमाई होईल ४२ डॉलर्सची!
अन् हा दाखला देत होता, वेस्ट इंडिजचा माजी कर्णधार व आता नवोदित कप्तान जेसन होल्डरमागे भक्कमपणे उभा राहणारा डॅरन सॅमी. विश्वचषक स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीत विंडीजची गाठ साखळी स्पर्धेत सहा सलग विजय संपादन करणाऱ्या बलवान न्यूझीलंडशी, पण माइक टायसन-बस्टर डग्लस लढतीत पैजांचा भाव व सट्टेबाजांचे अंदाज काय होते अन् काय घडलं, ते सारे जाणतात. बस्टर डग्लसने, तोपर्यंत अपराजित असलेल्या हेवीवेट जगज्जेत्याला अस्मान दाखवलं होतं, याचं स्मरण करून देत होता सॅमी.
सॅमीच्या आशावादी भाकिताला बॅटनं व चेंडूनं मैदानी हल्ल्यानं जबाब देण्याआधी न्यूझीलंड संघनायक ब्रेन्डन मॅक् क्युलमनं त्याच भाषेत सुनावलं. मॅक् क्युलम म्हणाला, ‘‘मी अश्व शर्यतींचा चांगला शौकीन आहे. त्या शर्यतींचा दाखला देतो. शर्यतीच्या सुरुवातीला माझ्या घोडय़ानं काही धांदल केली, तर तो शर्यतीबाहेर गेलाय असा अर्थ थोडाच लागतो? आमचा घोडा कधी नाही इतका तेज दौडतोय. या सामन्यातही आमच्याच विजयाच्या शक्यता दिसतात. साऱ्या गोष्टी आमच्या मनाजोगत्या १०० टक्के नसल्या तरी जिंकणार आम्हीच!’’
झुंज लागण्याआधी, उभय प्रतिस्पर्धी दावा करणार विजयाचाच. हलका स्पर्धकही बलवान प्रतिस्पध्र्याचीच भाषा करत असतो, तरीही सॅमी किंवा मिसबाह किंवा संगकारा किंवा मुश्रफी मुर्तझा यांची भाकितं स्वप्नरंजनच ठरली व तशीच ठरणार होती. विश्वचषकातील उपांत्यपूर्व फेरीचे चारही सामने नको-नको तितके एकतर्फी झाले व ते तसेच होणार होते!
धूमधडाका!
न्यूझीलंडसमोर विंडीजचा टिकाव लागणार नव्हता, अन् लागलाही नाही; पण पडझड होत असताना आणि आवाक्यबाहेरचं आव्हान वाकुल्या दाखवत असताना त्यांनी धूमधडाका चालू ठेवला होता. ५० ते २५० धावसंख्येपर्यंतच्या पाचही टप्प्यांत त्यांचा वेग न्यूझीलंडला लाजवणारा होता. पहिल्या अर्धशतकासाठी विंडीजला पुरेसे पडले ४२ चेंडू, तर न्यूझीलंडला ४६. शतक फलकावर लागलं तेव्हा विंडीज खेळले होते ७१ चेंडू, तर न्यूझीलंड ११५. दीडशतक विंडीजनी साजरं केलं ११४ चेंडूंत (न्यूझीलंडने शतकासाठी घेतले त्यापेक्षा एक चेंडू कमीच.), तर न्यूझीलंडला खेळावे लागले १७० चेंडू. न्यूझीलंडला दीडशेचा टप्पा मारण्यास १७०, तर दोनशेवर झेपावण्यास विंडीजला १४८ चेंडू पुरेसे! न्यूझीलंडचे द्विशतक २१७ चेंडूंत, तर विंडीजच्या अडीचशे १८० चेंडूंत! अन् २५०पर्यंत पोचण्यास किवींना लागले २४९ चेंडू!
आव्हान ३०० चेंडूंत ३९४ धावांचं. षटकामागे ८ धावांचं. विंडीज सुसाट सुटले ते षटकात आठ धावांची गती राखत. अर्धशतक, शतक, द्विशतक, अडीचशे. साऱ्या-साऱ्या टप्प्यांत त्यांनी ही गती राखली, पण ती गती राखण्यासाठी त्यांनी मोल दिलं सर्वस्वाचं, दहाही फलंदाजांचं.
विंडीजचा डाव संपला, तेव्हा त्यांच्या हाताशी १९.३ षटकं म्हणजे ११७ चेंडू होते. फटकेबाजीची झिंग चढली व त्या नशेत हाताशी राहाणारे चेंडू जमेस धरण्याचे हिशोब त्यांनी केले नाहीत. १५ चेंडूंत २७ धावा ठोकून काढणाऱ्या मार्लन सॅम्युएल्सचा अफलातून झेल व्हेटोरीनं थर्ड मॅन सीमेवर एकहाती अप्रतिम टिपला; पण गेल, सॅमी, होल्डर एवढे हातघाईवर कसे आले? ट्वेन्टी-२०ला साजेसा खेळ ते करत होते की, विंडीजचे खेळाडू ट्वेन्टी-२० अन् आयपीएलपुरतेच तेवढे सक्षम आहेत.
बेशिस्त व शरणागती पत्करणारे
विंडीजचं टोक धूमधडाक्यातच. ५० षटकांच्या क्रिकेटमध्ये २० षटकांच्या क्रिकेट शैलीचं दुसरं टोक श्रीलंकेच्या बेशिस्तीचं, तर बांगलादेशचं शरणागती पत्करण्याचं व कांगावा करण्याचं.
साखळी स्पर्धेत धावांचे धबधबे सुरू करणाऱ्या श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेसमोर पुरी ५० षटकं खेळून काढता आली नाहीत. आधीच्या सहा सामन्यांतील कुमार संगकाराच्या चार शतकांचं मूल्यमापन आता नव्यानं कसं केलं जाईल? निर्णायक सामन्यात ९६ चेंडूंत फक्त ४५ धावा जमवणारा संगकारा या वेळी सहकाऱ्यांचं स्फूर्तिस्थान कसा बनू शकणार होता? १६ चेंडूंत केवळ ४ धावा काढू शकणारा महेला जयवर्धने अन् ७ चेंडू वाया घालवत भोपळा फोडू न शकणारा तिलकरत्ने दिलशान सहकाऱ्यांना कोणते संकेत देत होते?
श्रीलंकन तारे-सितारे कचखाऊ, तर गोलंदाज बेशिस्त. फलंदाजीतील दारुण अपयश सावरण्याच्या आव्हानास ते कसे सामोरे गेले? दक्षिण आफ्रिकेस आव्हान अवघ्या १३४ धावा काढण्याचं, त्यामुळे गरज एकेक धाव वाचवण्याची, पण ज्याच्यावर गोलंदाजीची मदार त्यानं दोन नोबॉल अन् तीन वाइड बहाल केले. मलिंगा, उदयोन्मुख चमारा व परेरा यांनी आफ्रिकन संघाला तीन नोबॉल व आठ वाइड अशा बिनकष्टाच्या ११ धावांची भेट दिली!
सहीसलामत सुटले
बांगलादेशनं अक्षरश: शरणागती पत्करली. संघाला आव्हान चेंडूमागे धाव या गतीने त्रिशतकी झेप घेण्याची, पण त्या संघाचे दोन माजी संघनायक २००७च्या विश्वचषकातील भारतावरच्या सनसनाटी विजयाचे मानकरी शकीब अल हसन व मुशफिकर रहीम या जोडीनं कोणता खेळ केला? ४४ चेंडूंत १४ धावा काढण्याचा! पण कांगावाखोर बांगलादेश आज खडे फोडतंय पंचांच्या नावानं. त्यामुळे सहीसलामत सटकून जात आहेत पराभवाचे असली गुन्हेगार!
दारुण पराभवानंतर श्रीलंकेचं मौन, तर बांगलादेशचा कांगावा, पण कप्तान मिसबाह मात्र पाकिस्तानी क्रिकेटमधील उणिवांवर बोट ठेवतोय. फलंदाजी हा पाक क्रिकेटचा गेल्या दोन दशकांतील कच्चा दुवा. हनीफ मोहम्मद व सईद अहमद, झहीर अब्बास व माजिद खान, मुश्ताक महमद व वसीम राजा, सादिक अहमद व सईद अन्वर, जावेद मियाँदाद व सलीम मलीक, इन्झमाम उल हक व युसूफ योहाना ऊर्फ मोहम्मद युसूफ यांचे वारसदार पाक क्रिकेट घडवू शकलेलं नाही. क्षेत्ररक्षणही गचाळच होतंय.
चारही उपांत्यपूर्व सामने एकतर्फीच झाले. हार-जीत १०९ व १४३ धावांच्या फरकांची. नऊ विकेट व ३२ षटकं राखून, तसंच सहा विकेट व १६ षटकं राखून. म्हणजे चारही हार-जीत किमान शंभर व जास्तीत जास्त दोनशे धावांच्या फरकाने. सामने एकतर्फी झाले व ते तसेच होणार होते, कारण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, भारत व दक्षिण आफ्रिका हे चार देश अव्वल आहेत. त्यांच्याखाली दोन-चार पायऱ्यांवर आहेत श्रीलंका, पाकिस्तान, विंडीज व बांगलादेश (व इंग्लंड). ही तफावत भरून यायला हवी. मगच विश्वचषक क्रिकेट सकस होईल!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 23, 2015 12:13 pm

Web Title: darren sammy backs new captain jason holder
टॅग Darren Sammy
Next Stories
1 भारतीयांनी वहाबकडून कानमंत्र घ्यावा-रमिझ राजा
2 भारताविरुद्ध मी मुख्य फिरकीपटू असेन -मॅक्सवेल
3 चिकाटी व लवचिकता भारतीय गोलंदाजांची गुरुकिल्ली -चॅपेल
Just Now!
X