30 September 2020

News Flash

धोनीकडे झारखंडसाठी तरी खेळायला वेळ कुठे आहे?

आशा अमर असते. आणि तिचा चिकट धागा पकडून, लढवय्ये नवनव्या झुंजींना सामोरे जात असतात. संयुक्त अरब अमिरातीचे प्रशिक्षक आकिब जावेद पर्थला उतरता क्षणी, स्वप्न पाहू

| March 3, 2015 05:21 am

wclogoआशा अमर असते. आणि तिचा चिकट धागा पकडून, लढवय्ये नवनव्या झुंजींना सामोरे जात असतात. संयुक्त अरब अमिरातीचे प्रशिक्षक आकिब जावेद पर्थला उतरता क्षणी, स्वप्न पाहू लागले होते. इतिहासाची पुनरावृत्ती होणे जवळपास अशक्य कोटीतले असले तरी आशेचा धागा चिवटपणे पकडत होते.
आकिब जावेद हे पाकिस्तान कर्णधार इम्रान खानने हेरलेले एक रत्न. १९९२मधील विश्वचषकात वकार युनूसला दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली होती. स्वत: इम्रानही तब्येत साथ देत नव्हती, अन् मुख्यत: फलंदाज व स्फूर्तिदायी नेता एवढय़ाच भूमिकांना तो न्याय देऊ शकत होता. अशा परिस्थितीत आकिबमधील जलदगतीचे गुण त्याच्या नजरेत भरले होते. दुखापतग्रस्त युनूसच्या गैरहजेरीने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्याचे काम त्याने कोवळ्या आकिबवर सोपवले.
..आणि गतविजेच्या भारताशी चार हात करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीचा संघ पर्थमध्ये दाखल झाला, तेव्हा आकिब प्रेरणा शोधत होता. १९९२च्या विश्वचषकातील पर्थच्या सामन्यातून. पहिल्या पाच सामन्यांत पाकच्या खाती केवळ एक जय. पण डरकाळ्या फोडणाऱ्या वाघाचे चित्र लावणारा इम्रान आला आणि त्याने वातावरणच बदलून टाकले. त्याच्या स्फूर्तिदायक भाषणाने भारावलेल्या, चवताळून उठलेल्या पाक संघाने मग सलग पाच सामन्यांसह विश्वचषक जिंकला होता. त्या अफलातून परिवर्तनास सुरुवात झाली होती पर्थला!
इम्रानची झाकळ
‘‘आता आमचे खेळाडू काळजीत असतील. आता गाठ आहे गतविजेत्या भारताशी! पण १९९२मध्ये याच पर्थमधील मैदानात आम्हाला सामना करायला लागणार होता, तेव्हाच्या गतविजेत्या ऑस्ट्रेलियाशी. अ‍ॅलन बॉर्डरच्या संघाशी. पण वाघाच्या चित्राने नटलेल्या टी-शर्टमध्ये आज कोणता कर्णधार, अंतिम फेरीतही नाणेफेकीसाठी जाईल? पण त्याच्या शब्दांनी आम्हाला मंत्रमुग्ध केले. त्या शब्दांपेक्षा महत्त्वाचे होते, ते शब्द उच्चारणारे व्यक्तिमत्त्व. त्याच्यात जादू होती!..’’ आणि आता आकिब आशेवर होता की आपल्यात इम्रानची झाक आहे. संयुक्त अरब अमिरातीतील १५ पैकी ११ पाकिस्तानी खेळाडूंत, १९९२च्या विश्वचषक विजेत्या पाकिस्तानची झलक आहे!
आर्यलड अन् झिम्बाब्वे यांना अपयशी पण कडवी झुंज देणारा अमिरातीचा संघ, भारतासमोर साफ ढेपाळला. ताशी १४७ किमी वेगाच्या उमेश यादवपुढे ते गडबडलेच. पण त्यापेक्षाही जास्त अश्विनच्या उसळत्या ऑफ-स्पिनमधील विविधतेसमोर. क्रिकेटची राष्ट्रकुलापुरती सीमित असलेली दुनिया जिंकण्यासाठी निघालेल्या स्टीव्ह वॉच्या कांगारूंना हरभजन सिंगने भंडावले होते, ते आठवते? रिकी पॉन्टिंग, अ‍ॅडम गिलख्रिस्ट यांना तर त्याने खिशात घातले होते, ते फिरकीपेक्षा उसळीच्या जोरावर. मग आता अमिरातीचे हौशी खेळाडू अश्विनसमोर बुचकळ्यात पडले, तर त्यात काय विशेष?
वसईतला स्वप्निल पाटील, केरळीय कृष्णचंद्रन् कराटे आणि ताशी १४० किमीच्या गतीने मारा करू शकणारा श्रीलंकन मंजुळ गुरुगे प्रभृतींच्या अमिराती संघाचा जो धुव्वा उडाला त्याकडे कपिल देव सहानुभूतीने बघतो. ‘‘चेंडू उसळणाऱ्या पर्थच्या खेळपट्टीने भारत व अरब अमिराती संघातील तफावत अधिकच वाढवली, उंचावली. अमिरातीच्या फलदांजांनी शरणागती पत्करली, त्याबद्दल त्यांना दोष देणे योग्य ठरणार नाही. अशा तेज खेळपट्टय़ांवर खेळण्याचा अनुभव त्यांना होताच कुठे? अव्वल संघांच्या स्पर्धेत स्थिरावण्यास त्यांना वेळ द्या. धीर द्या. आणि धीर धरा!’’
संधी विश्वचषकाचीच?
अरब अमिरातीच्या या दणदणीत पराभवातून, कपिल कोणत्या निष्कर्षांवर येतो? ‘‘क्रिकेटच्या दुनियेतील उत्तमोत्तम संघांशी खेळण्याची व अशा लढतींतून आपला दर्जा सुधारण्याची संधी, लिंबूटिंबूंना दिलीच पाहिजे. हे माझे मत जुने आहे आणि आता त्याच मतावर, त्याच निष्कर्षांवर मी अधिक ठामपणे आलो आहे,’’ असे कपिल सांगतो.
कपिलच्या मतप्रदर्शनातील पुढचा भाग अधिकच निर्णायक आहे. ‘‘या लिंबूटिंबूना सर्वोत्तम संघांशी खेळण्याची अधिक संधी दिली पाहिजे. ती संधी विश्वचषकापुरती मर्यादित करून चालण्यासारखें नाही.’’
‘‘या एका शरणागतीवरून अरब अमिरातीला फाशी देऊ नका. अशा संघांना प्रोत्साहन देण्यातच जागतिक क्रिकेटचे हित आहे. (भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आदी.) प्रस्थापित व कुस्थितीतील देशांनी अरब अमिरातीसारख्या संघांना निमंत्रित केले पाहिजे. आपल्या राज्य व कौंटी संघांशी त्यांना खेळवले पाहिजे. परदेशी दौऱ्यावर, तीन व चार दिवशीचे सामने खेळून-खेळूनच अरब अमिरातीसारख्या संघांचा खेळ विकसित होईल.’’
दोन कप्तान-दोन टोके
राष्ट्रकुलापुरत्या मर्यादित असलेल्या विश्वचषकाच्या मोहिमांत भारताचे दोन कप्तान यशस्वी. पहिला कपिल, दुसरा धोनी. यापैकी पहिल्याचे मत आपण समजावून घेतले. धोनीचे मतप्रदर्शन बघा. अरब अमिरातीचा संघनायक तौकीर पत्रकारांना म्हणाला होता की, मोठमोठय़ा संघांशी नियमितपणे अधिक सामने मिळाले तरच आमचा खेळ सुधारेल. त्यावर धोनीची स्पष्टोक्ती अशी, ‘‘आम्ही भारतीय, आयपीएलमुळे वर्षांतून साडेनऊ महिने खेळत असतो. तुमच्याशी खेळण्यासाठी आमच्याकडे मोकळा वेळ आहेच कुठे!’’
कपिलची दृष्टी व्यापक. धोनी किती अप्पलपोटा व मस्तवाल! त्याने १५-२० कोटींसाठी आयपीएल जरूर खेळावे. पण अविकसित देशांसाठी त्याच्याकडे आठवडाही रिकामा नसावा? अरब अमिराती व लिंबू-टिंबू दूरच राहिले. धोनी त्याच्या झारखंडतर्फे रणजी स्पर्धेत कितीसा खेळलाय? पण श्रीनि, दालमिया, शरद पवार यांच्या आखणीत, कसोटीवीरांनी किमान रणजी सामने खेळण्याचे बंधन आहेच कुठे? मोसमाची आखणी मंडळ या भूमिकेतून केव्हा करणार?
वि. वि. करमरकर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2015 5:21 am

Web Title: dhoni does not have time to play for jharkhand
Next Stories
1 अर्थपूर्ण सराव महत्त्वाचा -धोनी
2 भारत मोठय़ा स्पर्धामध्ये दमदार कामगिरी करणारा संघ -ब्रॅड हॉग
3 ऑस्ट्रेलियातून.. : : एनआरआयना एकत्र ठेवणारा धागा क्रिकेटचा!
Just Now!
X