झिम्बाब्वेविरुद्धच्या लढतीत मोठय़ा लक्ष्याचा पाठलाग करताना अडचणीत सापडलेल्या संघाला विजयपथावर नेणाऱ्या महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्रमवारीतही आगेकूच केली आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत दोन स्थानांनी सुधारणा करत धोनीने आठवे स्थान गाठले आहे.
धोनीने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद ४५ धावांची खेळी केली होती तर झिम्बाब्वेविरुद्ध त्याने ८५ धावांची निर्णायक खेळी साकारली होती. विश्वचषकात सलग दहा सामन्यांमध्ये विजय मिळवण्याचा विक्रमही धोनीने नावावर केला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावणारा शिखर धवन सातव्या तर विराट कोहली चौथ्या स्थानी कायम आहे. दक्षिण आफ्रिकेचा ए बी डी’व्हिलियर्स अव्वलस्थानी आहे. विश्वचषकात सलग चार सामन्यांत चार शतके झळकावणारा कुमार संगकारा दुसऱ्या स्थानी आहे. झिम्बाब्वेविरुद्ध शतक साकारणाऱ्या सुरेश रैनाने तीन स्थानांनी सुधारणा करत १७वे स्थान मिळवले आहे.
विश्वचषकात भारतीय गोलंदाज चांगली कामगिरी करत आहेत, मात्र त्यांच्या कामगिरीचा कोणताही परिणाम क्रमवारीतील स्थानावर झालेला नाही. अव्वल दहामध्ये एकही भारतीय गोलंदाजाला स्थान मिळू शकलेले नाही. मोहम्मद शमी ११व्या स्थानी आहे. विश्वचषकात प्रभाव पाडू न शकलेल्या डेल स्टेनने अद्यापही अव्वल स्थान टिकवले आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा रवींद्र जडेजा ग्लेन मॅक्सवेलसह सातव्या स्थानी आहे. श्रीलंकेचा तिलकरत्ने दिलशान अव्वल स्थानावर आहे.