ऑस्ट्रेलिया व इंग्लंड या पारंपरिक प्रतिस्पर्धीना ‘व्हॅलेंटाइन डे’च्या मुहूर्तावर खेळताना पाहण्याचा अनोखा आनंद क्रिकेट विश्वाला अनुभवता येणार आहे. दोन्ही देशांमध्ये असलेले ‘अ‍ॅशेस’चे वैर साऱ्यांनाच परिचित असले तरी हा सामना खेळभावनेनेच खेळला जायला हवा, हेच अनुभवण्याचा हा क्षण असेल. ऑस्ट्रेलिया व इंग्लंड हे दोन्ही संघ ‘प्रती’अ‍ॅशेसचे महत्त्व प्राप्त झालेल्या विश्वचषकातील पहिल्या सामन्यासाठी सज्ज झाले असून या दोन्ही संघांपैकी ऑस्ट्रेलियाचेच पारडे जड मानले जात आहे.
तब्बल चार वेळा विश्वविजेतेपद पटकावलेला ऑस्ट्रेलियाचा संघ तब्बल २३ वर्षांनी मायदेशात विश्वचषक खेळण्यासाठी आतूर आहे. या सामन्यात मायकेल क्लार्क आणि जेम्स फॉल्कनर यांना न खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला असून संघाचे कर्णधारपद जॉर्ज बेलीकडे असेल. त्याचबरोबर संघात झेव्हियर डोहर्टीला संधी देण्यात असून जोश हॅझेलवूड आणि पॅट कमिन्स यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. सलामीसाठी डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच सज्ज असून मधल्या फळीमध्ये शेन वॉटसन, बेली, ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्हन स्मिथ असे एकामागून एक फलंदाज आहेतद. गोलंदाजीमध्ये मिचेल मार्श आणि मिचेल स्टार्क यांच्यावर संघाची मदार असेल.
इऑन मॉर्गनने कर्णधारपद स्वीकारल्यापासून संघामध्ये सकारात्मक बदल झाले आहेत. मॉर्गनसह इयान बेल, मोईन अली, रवी बोपारा यांच्यावर फलंदाजीची भिस्त असेल. गोलंदाजीमध्ये जेम्स अँडरसन, स्टिव्हन फिन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या जोडीला ख्रिस वोक्सला संधी देण्यात आली आहे.
तिरंगी मालिकेमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले असले तरी त्यांना ऑस्ट्रेलियावर मात करता आलेली नाही. दोन्ही संघांचा विचार करता ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंडपेक्षा अधिक सक्षम दिसत आहे.

वार्नरबरोबर शाब्दिक युद्ध नाही -अँडरसन
मेलबर्न : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामधला सामना म्हटला की शाब्दिक युद्ध आपसूकच आले. पण विश्वचषकामध्ये मात्र शाब्दिक खेळी करणार नसल्याचे इंग्लंडकडून स्पष्ट करण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वार्नर हा काही दिवसांपूर्वी शाब्दिक हल्ल्यांमुळे चर्चेत आला असला तरी त्याच्याविरोधात शाब्दिक हल्ल करणार नसल्याचे अँडरसनने स्पष्ट केले आहे.
‘‘मी वॉर्नरच्या समोर यापूर्वीही बऱ्याचदा गोलंदाजी केली आहे. सध्या आमचे लक्ष हे विश्वचषकातील सामन्यांवर केंद्रित आहे, त्यामुळे खेळाविषयी आम्ही आक्रमक असलो तरी कोणत्याही खेळाडूविरोधात आक्रमक होणार नाही,’’ असे अँडरसन म्हणाला.

सामना क्र. : २ ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड (अ-गट)
स्थळ : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंड, मेलबर्न ल्ल वेळ : सकाळी ९.०० वा.
लक्षवेधी खेळाडू
डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) : यंदाच्या विश्वचषकातील धुवाँधार सलामीवीर म्हणून डेव्हिड वॉर्नरचे नाव घ्यावे लागेल. आतापर्यंत धडाकेबाज फलंदाजी करून संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची चांगली सुरुवात होण्यासाठी वॉर्नरची फलंदाजी महत्त्वाची ठरेल.
इऑन मॉर्गन (इंलंड) : कर्णधारपद मिळाल्यावर इऑन मॉर्गनच्या कामगिरीमध्ये सातत्य दिसत आहे. मधल्या फळीत फलंदाजीला येऊन मॉर्गनने बऱ्याचदा संघाचा डाव सावरला असून संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली आहे. त्यामुळे या विश्वचषकात इंग्लंडला मोठी मजल मारायची असेल तर मॉर्गनची भूमिका महत्त्वाची असेल.

बोलंदाजी
आतापर्यंत विश्वचषकातील आमची कामगिरी पाहिली की त्यावरूनच सारे काही स्पष्ट होते. आतापर्यंत आम्ही नेहमीच विश्वचषकामध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी केली असून, या विश्वचषकातही आम्ही मोठी मजल मारू, असा विश्वास मला आहे. संघ चांगला समतोल असून आमच्याकडे बरेच पर्यायही उपलब्ध आहेत. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या सामन्यापासून विजयाची मालिका सुरू करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.
– जॉर्ज बेली (ऑस्ट्रेलिया)
विश्वचषकात खेळणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते. आमचा पहिलाच सामना यजमान ऑस्ट्रेलियाबरोबर त्यांच्याच मैदानात होणार आहे, प्रेक्षकांचा पाठिंबाही त्यांच्यामागे असला तरी आम्ही या सामन्यासाठी पूर्ण तयारीनिशी सज्ज आहोत. विश्वचषकातील पहिल्या विजयासाठी आम्ही सज्ज आहोत.
जेम्स अँडरसन (इंग्लंड)

आमने सामने
सामने १३० – ऑस्ट्रेलिया : ७६ ’ इंलंड : ४९ ’ टाय / रद्द : ५
संघ
ऑस्ट्रेलिया : मायकेल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, जोश हॅझेलवूड, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, जेम्स फॉल्कनर.
इंग्लंड: इऑन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जेम्स अँडरसन, गॅरी बॅलन्स, इयान बेल, रवी बोपारा, स्टुअर्ट ब्रॉड, जोस बटलर, स्टीव्हन फिन, अ‍ॅलेक्स हेल्स, ख्रिस जॉर्डन, जो रूट, जेम्स टेलर, जेम्स ट्रेडवेल, ख्रिस वोक्स.