दिवस आणि नशीब कधीच एकसारखे राहत नाही, त्यामध्ये सातत्याने बदल हे होतच असतात आणि बदल हा निसर्गाचा नियमच आहे, तोच कायमस्वरूपी आहे, असेही म्हटले जाते. ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यात भारताला एकही विजय मिळवता आला नाही, म्हणून भारतीय संघ विश्वचषकात नापास ठरला, असे झाले नाही. भारताने विश्वचषकात दमदार मजल मारत उपांत्य फेरी गाठली आहे आणि समोर आव्हान आहे ते त्याच ऑस्ट्रेलियाचे, ज्यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये भारताला एकही विजय मिळू दिला नव्हता. पण दिवस बदलले आणि आता भारतासमोर या पराभवाचा वचपा काढण्याची योग्य वेळ आली आहे. दुसरीकडे भारतावर दडपण आणण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी शाब्दिक हल्ले करायला सुरुवात केली असली तरी या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या महायुद्धात कोण सवाई ठरतो, याची उत्सुकता क्रिकेटजगताला असेल.
भारताच्या गोलंदाजांनी गेल्या सात सामन्यांमध्ये ७० बळी मिळवले आहेत. मोहम्मद शमी हा भारताचा मुख्य गोलंदाज ठरत असून त्याने ऐन वेळी भारताला बळी मिळवून दिले आहेत. उमेश यादव आणि मोहित शर्माची शमीला सुयोग्य साथ मिळत आहे. आर. अश्विनने आतापर्यंत चमकदार फिरकी गोलंदाजी केली असली तरी रवींद्र जडेजाला अजूनही लय सापडलेली नाही. ऑस्ट्रेलियाकडे भारताच्या गोलंदाजीचा सामना करण्यासाठी एकामागून एक दमदार फलंदाज आहेत. डेव्हिड वॉर्नर, स्टीव्हन स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि शेन वॉटसन यांनी आतापर्यंत चांगली फलंदाजी केली आहे. पण मायकेल क्लार्क आणि आरोन फिंच यांना अजूनही लय सापडलेली दिसत नाही. फिंचने विश्वचषकात एक शतक झळकावले असले तरी त्याला कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. अष्टपैलू जेम्स फॉकनर आणि बॅड्र हॅडिन यांना फलंदाजीसाठी फार कमी संधी मिळाली आहे.
मिचेल स्टार्क हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीचे प्रमुख अस्त्र ठरत आहे. मिचेल जॉन्सनकडे चांगला अनुभव आहे, तर जोश हॅझलवूडने कामगिरीत सातत्य दाखवले आहे. चौथा गोलंदाज म्हणून फॉकनरही चांगली गोलंदाजी करीत आहे. पण पाचवा गोलंदाज म्हणून वॉटसनला छाप पाडता आलेली नाही, त्यामुळेच ग्लेन मॅक्सवेलला गोलंदाजी करण्याची संधी मिळत आहे. ऑस्ट्रेलियाच्या तोफखान्याला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. भारताचे सारेच फलंदाज एकामागून एक चमकताना दिसत आहेत. रोहित शर्माला गवसलेला फॉर्म ही भारतासाठी जमेची बाजू असेल. सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी यांनी गेल्या काही सामन्यांमध्ये नेत्रदीपक फलंदाजी केली आहे. विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांना मात्र अजूनही मोठी खेळी साकारून कामगिरीत सातत्य राखणे जमलेले नाही. शिखर धवनने सुरुवात चांगली केली असली तरी गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला मोठी खेळी साकारता आलेली नाही.
घरच्या मैदानात सामना असल्याने ऑस्ट्रेलियाचे मनोबल उंचावलेले असेल. गेल्या तीन महिन्यांचा विचार केल्यास ऑस्ट्रेलियापेक्षा भारताच्या कामगिरीमध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे. त्यामुळे या सामन्यासाठी भारताचे पारडे ऑस्ट्रेलियापेक्षा जड असेल. पण हा सामना चांगलाच अटीतटीचा होईल.

ऑस्ट्रेलिया संघ
मायकेल क्लार्क (कर्णधार), जॉर्ज बेली, डेव्हिड वॉर्नर, आरोन फिंच, मिचेल जॉन्सन, मिचेल स्टार्क, जोश हॅझेलवूड, पॅट कमिन्स, झेव्हियर डोहर्टी, शेन वॉटसन, स्टीव्हन स्मिथ, ब्रॅड हॅडिन (यष्टीरक्षक), ग्लेन मॅक्सवेल, मिचेल मार्श, जेम्स फॉकनर.
लक्षवेधी खेळाडू
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) : विश्वचषकात ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी ठरलेला गोलंदाज म्हणजे मिचेल स्टार्क. आपल्या भेदक आणि अचूक माऱ्याने त्याने विश्वचषकात प्रत्येक प्रतिस्पध्र्याविरुद्ध तिखट मारा केला आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला स्टार्ककडून मोठय़ा अपेक्षा असतील.

बोलंदाजी
विश्वचषक हा एक मोठा सोहळा आहे. प्रत्येक  वेळी जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा सामना जिंकण्याचाच विचार डोक्यात असतो. आतापर्यंत आमची कामगिरी दमदार झाली आहे, त्यामुळे त्यामध्ये मोठा बदल आम्ही करणार नाही, फक्त कामगिरीमध्ये सातत्य राखण्यावर आमचा भर असेल.
– मायकेल क्लार्क (ऑस्ट्रेलिया)

आतापर्यंतची वाटचाल
साखळी फेरी
वि. इंग्लंड : १११ धावांनी विजयी
वि. बांगलादेश : पावसामुळे सामना रद्द
वि. न्यूझीलंड : एका विकेटने पराभूत
वि. अफगाणिस्तान : २७५ धावांनी विजयी
वि. श्रीलंका : ६४ धावांनी विजयी
वि. स्कॉटलंड : ७ विकेट्सने विजयी
उपांत्यपूर्व फेरी
वि. पाकिस्तान : ६ विकेट्सनी विजयी

भारत संघ
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक),
शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मोहम्मद शमी,
उमेश यादव, भुवनेश्वर कुमार,  स्टुअर्ट बिन्नी.

लक्षवेधी खेळाडू
विराट कोहली (भारत) : भारताचा सर्वाधिक सातत्याने खेळणारा फलंदाज म्हणजे विराट कोहली. पण विश्वचषकात त्याला आतापर्यंत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. कोहली हा मोठय़ा सामन्याचा खेळाडू असल्याचे म्हटले जाते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातला पराभवाचा वचपा काढण्यासाठी संघासह तोदेखील सज्ज झाला असेल.

बोलंदाजी
गेल्या चार महिन्यांपासून आम्ही क्रिकेट खेळत आहोत. त्यामुळे एवढय़ा दिवसांमध्ये तंदुरुस्त राहणे आणि सर्वोत्तम कामगिरी करणे, हे सोपे नसते. जेव्हापासून आम्ही सिडनीमध्ये आलो आहोत तेव्हापासून अथक मेहनत घेऊन सराव करत आहोत. मी आतापर्यंत दोनदा द्विशतक झळकावले असले तरी प्रत्येक दिवशी ते शक्य नसते आणि जाणूनबुजून कुणीही चुका करत नाही.
– रोहित शर्मा (भारत)

आतापर्यंतची वाटचाल
साखळी फेरी
वि. पाकिस्तान : ७६ धावांनी विजयी
वि. द. आफ्रिका : १३० धावांनी विजयी
वि. अमिराती : ९ विकेट्सनी विजयी
वि. वेस्ट इंडिज : ४ विकेट्सनी विजयी
वि. आर्यलड : ८ विकेट्सनी विजयी
वि. झिम्बाब्वे : ६ विकेट्सनी विजयी
उपांत्यपूर्व फेरी
वि. बांगलादेश : १०९ धावांनी विजयी

खेळपट्टी
सिडनीची खेळपट्टी ही फिरकीसाठी ओळखली जाते. पण यावेळी खेळपट्टी पाटा बनवण्यात आली आहे. या सामन्यात फलंदाज अधिक धावा करतील, त्याचबरोबर थोडे गवत दिसत असल्याने वेगवान गोलंदाजांना मदतही मिळेल.
आमनेसामने
एकदिवसीय
एकूण : ११७,
भारत : ४०,
ऑस्ट्रेलिया : ६७,
रद्द /बरोबरी: १०
विश्वचषक
एकूण : १०,
भारत : ३,
ऑस्ट्रेलिया : ७
रद्द /बरोबरी: ०

विश्वचषकात भारत आणि ऑस्ट्रेलिया दहा वेळा आमनेसामने आले असून त्यात सर्वाधिक ७ वेळा ऑस्ट्रेलियाने बाजी मारली आह़े.
*१३ जून १९८३
ऑस्ट्रेलिया १६२ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलिया : ९ बाद ३२० (ट्रेव्हर चॅपेल ११०, ग्रॅहम यॅलोप नाबाद ६६; कपिल देव ५/४३) विजयी वि़  भारत : सर्वबाद १५८ (के. श्रीकांत ३९, कपिल देव ४०; केन मॅकलेय ६/३९, टॉम हॉगन २/४८)

* २० जून १९८३
भारत ११८ धावांनी विजयी
भारत : सर्वबाद २४७ (यशपाल शर्मा ४०, संदीप पाटील ३०; रॉडने हॉग ३/४०, जेफ थॉमसन ३/५१) विजयी वि़ ऑस्ट्रेलिया : सर्वबाद १२९ (अ‍ॅलन बॉर्डर ३६; मदन लाल ४/२०, रॉजर बिन्नी ४/२९)

* ९ ऑक्टोबर १९८७
ऑस्ट्रेलिया एका धावेने विजयी
ऑस्ट्रेलिया : ६ बाद २७० (जेफ मार्श ११०, डेव्हिड बून ४९; मनोज प्रभाकर २/४७) विजयी वि़ भारत : सर्वबाद २६९ (के. श्रीकांत ७०, नवज्योत सिंग सिद्धू ७३; क्रेग मॅकडरमॉट ४/५६)

* २२ ऑक्टोबर १९८७
भारत ५६ धावांनी विजयी
भारत : ६ बाद २८९ (सुनील गावस्कर ६१,  दिलीप वेंगसरकर ६३, ; क्रेग मॅकडरमॉट ३/६१) विजयी वि़  ऑस्ट्रेलिया : सर्वबाद २३३ (डेव्हिड बून ६२; मणिंदर सिंग ३/३४, मोहम्मद अझरुद्दीन ३/१९)

* १ मार्च १९९२
ऑस्ट्रेलिया एका धावेने विजयी
(सुधारित लक्ष्य २३५ धावा)
ऑस्ट्रेलिया : ९ बाद २३७ (डीन जोन्स ९०; कपिल देव ३/४१, मनोज प्रभाकर ३/४१) विजयी वि़ भारत : सर्वबाद २३४ (मोहम्मद अझरुद्दीन ९३; टॉम मुडी ३/५६)

* २७ फेब्रुवारी १९९६
ऑस्ट्रेलिया १६ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलिया : सर्वबाद २५८ (मार्क वॉ १२६, मार्क टेलर ५९; वेंकटेश प्रसाद २/४९, वेंकटपती राजू २/४८) विजयी वि़  भारत : सर्वबाद २४२ (सचिन तेंडुलकर ९०, संजय मांजरेकर ६२; डॅमियन फ्लेमिंग ५/३६)

* ४ जून १९९९
ऑस्ट्रेलिया ७७ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलिया : ६ बाद २८२ (मार्क वॉ ८३, स्टीव्ह वॉ ३६; रॉबिन सिंग २/४३) विजयी वि़ भारत : सर्वबाद २०५ (अजय जडेजा नाबाद १००, रॉबिन सिंग ७५; ग्लेन मॅकग्रा ३/३४, डॅमियन फ्लेमिंग २/३३,
स्टिव्ह वॉ २/८)

* १५ फेब्रुवारी २००३
ऑस्ट्रेलिया ९ विकेट्सने विजयी
भारत : सर्वबाद १२५ (सचिन तेंडुलकर ३६; बेट्र ली ३/३६, जेसन गिलेस्पी ३/१३) पराभूत वि़ ऑस्ट्रेलिया : १ बाद १२८ (अ‍ॅडम गिलख्रिस्ट ४८, मॅथ्यू हेडन नाबाद ४५)

* २३ मार्च २००३
ऑस्ट्रेलिया १२५ धावांनी विजयी
ऑस्ट्रेलिया : २ बाद ३५९ (रिकी पाँटिंग नाबाद १४०, डॅमियन मार्टीन नाबाद ८८; हरभजन सिंग २/४९) विजयी वि़  भारत : सर्वबाद २३४ (वीरेंद्र सेहवाग ८२, राहुल द्रविड ४७; ग्लेन मॅग्रा ३/५२, ब्रेट ली २/३१, अ‍ॅन्ड्रय़ू सायमंड्स २/७).

* २४ मार्च २०११
भारत ५ विकेट्सने विजयी
ऑस्ट्रेलिया : ६ बाद २६० (रिकी पाँटिंग १०४, ब्रॅड हॅडिन ५३; आर अश्विन २/५२, झहीर खान २/५३, युवराज सिंग २/४४) पराभूत वि़  भारत : ५ बाद २६१ (सचिन तेंडुलकर ५३, गौतम गंभीर ५०, युवराज सिंग नाबाद ५७; डेव्हिड हसी १/२१).

अव्वल फलंदाज
१. कुमार संगकारा (श्रीलंका) ५४१ धावा
२. मार्टिन गप्तिल (न्यूझीलंड) ५३२ धावा
३. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) ४८२ धावा

अव्वल गोलंदाज
१. ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड) २१ बळी
२. मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया) १८ बळी
३. मोहम्मद शमी, जेरॉम टेलर, मॉर्ने मॉर्केल १७ बळी