लवचितकता हे मुंबईचा गुणी फलंदाज अजिंक्य रहाणेचे बलस्थान आहे. त्यामुळे संघासाठी तो कोणतीही जबाबदारी तो लिलया पेलतो, अशा शब्दांत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याचे कौतुक केले आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात शिखर धवनच्या स्फोटक शतकाप्रमाणेच रहाणेने ६० चेंडूंत साकारलेली ७९ धावांची खेळी ही तितकीच महत्त्वाची होती, असे धोनीने सांगितले.‘‘ट्वेन्टी-२०, एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेट असो, रहाणेच्या कामगिरीत कमालीची सुधारणा झाली आहे. तो कोणत्याही नव्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी तयार असतो,’’ असे धोनीने सांगितले.
तो पुढे म्हणाला, ‘‘रहाणेच्या फलंदाजीला अचूक समयसूचकतेची देणगी लाभली आहे. क्षेत्ररक्षकांमधील रिकाम्या जागा भेदून फटके खेळण्यात तो वाकबदार आहे.’’