wclogoनवे गुरुजी, इंग्लंडचे माजी कर्णधार पॉल कॉलिंगवूड यांची शिकवणी त्यांच्यासाठी लावण्यात आली आहे, पण तरीही त्या बालकाच्या नजरेपुढे आहे, एक जुनी छबी. गेले एक तप, ज्यांनी दिलेले धडे गिरवल्यामुळेच आपण इथपर्यंत पोहोचलो, त्या राहुल द्रविड गुरुजींच्या आठवणी विसरण्याइतके ते कृतघ्न नाही.
मोसम २००३चा. तेव्हा राहुल द्रविड कर्तबगारीच्या एका उंच शिखरावर स्थिरावलेला होता. स्टीव्ह वॉच्या कांगारूंचा अश्वमेध रोखण्यात त्याचा वाटा मोठा होता. कोलकाता कसोटीत राहुल व लक्ष्मण यांनी भारताला फॉलोऑन मिळाल्यानंतर अख्खा, संपूर्ण चौथा दिवस खेळून काढला. एक ऐतिहासिक महत्त्वाची भागी रचली. सामनाच नव्हे तर मालिका भारताच्या बाजूने फिरवली. आता हा फलंदाजीचा महानायक स्कॉटलंड संघात मिसळत होता, मार्गदर्शकाची भूमिका जाता जाता पार पाडत होता.
इंग्लंडविरुद्ध निराशा करणाऱ्या, पण त्याआधी न्यूझीलंडला कडवी लढत देणाऱ्या स्कॉटलंडच्या विकासात द्रविडची भूमिका मोलाची ठरते, असे सांगतात स्कॉटलंडचे साहाय्यक प्रशिक्षक क्रेग राइट. ते म्हणतात, ‘‘एवढा मोठा फलंदाज, पण तेवढाच साधा माणूस आमच्यात सहजतेनं मिसळायचा. क्रिकेट खेळण्यासाठी शरीर व मन कसं सज्ज करायचं, शांत व एकाग्र ठेवायचं हे आम्ही शिकलो त्याच्याकडून.’’
राहुल-सचिन
कोणताही गाजावाजा न करता द्रविडच्या कृतीविषयी चर्चा करायचे कारण म्हणजे सचिनचे अलीकडचे वक्तव्य. २०१९चा विश्वचषक फक्त दहा संघांत खेळविण्याची उफराटी चाल आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती खेळतेय. एन. श्रीनिवासन, अरुण जेटली, जगमोहन दालमिया यांच्या हाताखालील भारतीय क्रिकेट नियामक मंडळ त्या चालीला मंजुरी देतंय. अशा वेळी सचिन आवाहन करतोय, ‘क्रिकेटचा खेळ हाताच्या बोटांवर मोजता येणाऱ्या संघांपलीकडच्या दुनियेत फैलावला जावा. सहभाग दहा देशांपुरता मर्यादित करावा, की, १४-१६-२० अशा देशांपर्यंत वाढवत न्यावा? या तपशिलात जाण्याची धिटाई सचिनने अद्याप दाखवलेली नाही; पण उद्या नाही तर परवा त्याला त्याबाबतची भूमिका मांडावीच लागेल.’
विश्वचषकातील संघांचा सहभाग आस्तेआस्ते कसा वाढलाय आणि ४० वर्षांत दुप्पट झालाय, ते बघू या.
ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, भारत, पाकिस्तान व श्रीलंका हे सात संघ, संस्थापकांसारखे ११ही विश्वचषकात सहभागी, विजेतेपदाचे वाटपही त्यांच्यातच, इंग्लंड व न्यूझीलंड सोडून बाकीच्या पाच संघांत, त्यांच्या जोडीला आठवा संघ १९७५मध्ये पूर्व आफ्रिका व १९७९मध्ये तिच्या जागी कॅनडा. आठवा संघ, ही तेव्हाची व्यावहारिक गरज, स्पर्धकांची चार-चार संघांच्या दोन गटांत विभागणी करण्यासाठी. १९८३ व ८७मध्ये कॅनडाच्या जागी झिम्बाब्वेला आणलं गेलं. स्पर्धक संघ आठचे आठच.
८ ते १६ ते १०?
स्पर्धक संघांची गाडी पहिल्या चार विश्वचषकांत आठची आठवर अडकलेली. दक्षिण आफ्रिकेने रानटी वर्णद्वेषी धोरण सोडले अन् नेल्सन मंडेलाचा दक्षिण आफ्रिका सन्मानाने बनला ९वा स्पर्धक संघ. मग भारतखंडातील ९६च्या सहाव्या विश्वचषकात केनिया, संयुक्त अरब अमिराती व नेदरलँडस् यांसह स्पर्धक देश १२. ९९ मध्ये बांगलादेश व स्कॉटलंडचे पदार्पण. इंग्लंडने आर्यलड, स्कॉटलंड व नेदरलँडस् यांसह भरवलेल्या स्पर्धेत १२ संघ कायम. एकविसाव्या शतकातील तिन्ही स्पर्धा, काही अंशी अँग्लो-ऑस्ट्रेलियन प्रभावक्षेत्राबाहेर, त्यात सहभागी देशांचा आकडा वाढत गेला. २००३ दक्षिण आफ्रिका – नामिबियासह १४. मग २००७ वेस्ट इंडिज – आर्यलड व बम्र्युडासह १६! २०११ भरतखंड- १४ देश.
विश्वचषकाचा किरकोळ का होईना, विस्तार होत गेला. आठवरून १४-१६ पर्यंत. मग आता २०१५मध्ये पीछेहाट का? चार-सहा पावलं पुढे टाकल्यावर चार-सहा पावलं माघार कशासाठी?
काही लिंबूटिंबू संघांनी आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवलेली नाही का? पाठोपाठच्या तीन विश्वचषकांत आर्यलडने खडे चारले आहेत पाकिस्तान व बांगलादेश, इंग्लंड व यंदा विंडिज या कसोटी दर्जाच्या संघांना. १९९२ मध्ये ब्रायन लाराच्या विंडीजला पुण्यात हादरवणाऱ्या केनियाने २००३मध्ये उपांत्य फेरीपर्यंत धडक मारली होती. श्रीलंका, बांगलादेश व झिम्बाब्वे यांना त्यांनी लोळवलं होतं. नेदरलँड्स ऊर्फ हॉलंडने पदार्पणात पाकिस्तान व बांगलादेशला, मग गेल्या विश्वचषकात इंग्लंडला त्यांनी हादरवलं होतं. अशा संघांना गरज आहे ती मदतीच्या हाताची, उपेक्षेची नव्हे. आज ते आपल्या पायांवर उभे राहण्याइतके तगडे नाहीत. त्यांना कुबडय़ा पुरवू नका; पण हातापायात ताकद येईल, असं टॉनिक द्या. भारत काय करू शकेल? भारताने काय करावं? आयसीसीपुढे कोणता आदर्श ठेवावा?
अफगाणिस्तान, नेपाळ, केनिया, नेदरलँडस्, आर्यलड, स्कॉटलंड यांच्यासाठी किंवा आलटूनपालटून त्यातील दोन-दोन, तीन-तीन संघांसाठी रणजी स्पर्धेत स्थान द्यावं. त्यांच्या या खर्चाचा भार उचलावा आणि या देशात प्रशिक्षक व बुजुर्ग आदर्शवत खेळाडू पाठवावेत! आयपीएलचा पैसा सत्कारणी लावावा!