दर चार वर्षांनी रंगणारा क्रिकेटचा महासोहळा आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. विश्वचषक मोहिमेची सुरुवात संस्मरणीय व्हावी यासाठी संयोजकांनी उद्घाटन सोहळ्याला मनोरंजनाचा तडका दिला आहे. प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन गायिका जेसिका मौबॉय, टिना एरिना, नॅथिनाअल, डॅरेल ब्रेथवेट आपल्या गायनाने सोहळ्याची संगीतमय सलामी करणार आहेत. मेलबर्न सिम्फनी ऑर्केस्ट्रा या सोहळ्याचे आकर्षण असणार आहे. व्हिक्टोरियाचे पर्यटन आणि विशेष कार्यक्रमांचे मंत्री जॉन इरेन यांनी यासंदर्भात माहिती दिली. मेलबर्नच्या सिडने मयेर म्युझिक बॉल येथे १२ फेब्रुवारीला उद्घाटन सोहळा होणार आहे.
नेत्रदीपक फटाक्यांची आतषबाजी मेलबर्नसह जगभरातल्या क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असेल, असे इरेन यांनी सांगितले. २३ वर्षांनंतर विश्वचषकाचे ऑस्ट्रेलियात पुनरामगन होत आहे. हे पुनरागमन दिमाखदार असावे, या दृष्टीनेच भव्य रंगारंग सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सहआयोजक असलेल्या न्यूझीलंडमधील ख्राइस्टचर्च येथेही छोटेखानी उद्घाटन सोहळा रंगणार आहे.