News Flash

..ही समानता नव्हे, उपेक्षाच!

पुरुषी मानसिकता आणि वर्चस्ववादी वर्तनाला टक्कर देत महिलांनी अनेकविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतली, मात्र क्रिकेटमध्ये संकुचित मनोवृत्तीमुळे महिला क्रिकेट नेहमीच उपेक्षित राहिले आहे.---*

| March 8, 2015 05:50 am

पुरुषी मानसिकता आणि वर्चस्ववादी वर्तनाला टक्कर देत महिलांनी अनेकविध क्षेत्रांमध्ये उत्तुंग भरारी घेतली, मात्र क्रिकेटमध्ये संकुचित मनोवृत्तीमुळे महिला क्रिकेट नेहमीच उपेक्षित राहिले आहे. ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये सध्या पुरुषांचा विश्वचषक सुरू आहे. या विश्वचषकापेक्षाही जुना इतिहास असणारा महिला wclog09विश्वचषक, पर्यायाने त्यांचे क्रिकेट आणि या सगळ्यात हरवलेल्या भारतीय संघाचे दुर्लक्षित पर्व जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने उपेक्षित असल्याचे वास्तव समोर येत आहे.
ही घटना दोन वर्षांपूर्वीची. महिला विश्वचषकाचे बहुतांशी सामने मुंबईत होणार होते. त्यासाठी स्टेडियम्सची निवड केली जाणार होती. विश्वचषकासारखी प्रतिष्ठेची स्पर्धा असल्याने त्या दर्जाच्या स्टेडियम्सवर सामने होणे अपेक्षित होते, मात्र रणजी स्पर्धेचे कारण देत बीसीसीआयने सामन्यांचे आयोजन निम्नस्तरीय स्टेडियम्सकडे दिले. ज्या मैदानावर स्थानिक स्पर्धाचेही आयोजन होत नाही, जिथे थेट प्रक्षेपणाची सुविधा नाही, प्रेक्षकांना तसेच प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींना बसण्यासाठी व्यवस्था नाही अशा स्टेडियम्सवर विश्वचषकाचे सामने झाले. गटबाजीच्या राजकारणापायी डीवाय पाटील स्टेडियमला देण्यात आलेली आयोजनाची संधी नाकारण्यात आली. सध्या सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषकाच्या निमित्ताने ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये कोटय़वधी रुपये खर्च करून नवे स्टेडियम्सची उभारणी करण्यात आली आहे, तर बाकीच्यांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. मात्र निखर्वात ताळेबंद असणाऱ्या बीसीसीआयची महिला विश्वचषकासाठी आयोजनच्या वेळी ही कोती भूमिका होती.
ज्या विश्वचषकाला अशी वागणूक बीसीसीआयने दिली, त्या स्पर्धेला पुरुषांच्या विश्वचषकापेक्षा जुनी परंपरा आहे. आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेतर्फे १९७३मध्ये पहिल्यावहिल्या महिला विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. पहिल्या विश्वचषकात सात संघ होते आणि यजमान इंग्लंडनेच जेतेपद पटकावले. त्यानंतर दर चार ते पाच वर्षांच्या अंतराने नियमितपणे महिलांचा विश्वचषक होत आहे. विशेष म्हणजे पायाभूत सुविधांची वानवा असताना, प्रायोजकांची साथ नसताना आणि मानधन मिळण्याऐवजी स्वत:चेच पैसे खर्च करावे लागत असतानाच्या काळातही भारतीय महिला संघाने १९७८ ते २०१३ या कालावधीत आठ विश्वचषकांत सन्मानजनक कामगिरी केली. १९९७ आणि २०००मध्ये उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघाने पुढच्या अर्थात २००५च्या विश्वचषकात उपविजेतेपद प्राप्त केले. चेंडूला वेग आणि उसळी मिळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेतल्या खेळपट्टय़ांवर इंग्लंड, ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघांना टक्कर देत भारतीय संघाने दिमाखदार प्रदर्शन केले.
एकदिवसीय प्रकारात पहिले वैयक्तिक द्विशतक म्हटल्यावर सचिन तेंडुलकरचे नाव समोर येते. मात्र १९९७मध्येच ऑस्ट्रेलियाच्या बेलिंडा क्लार्कने २२९ धावांची मॅरेथॉन खेळी एकदिवसीय क्रिकेटमध्ये साकारली होती. गोलंदाजांना नामोहरम करत संघांच्या ४०० धावांच्या विक्रमांची विश्वचषकादरम्यान दररोज चर्चा होते आहे. मात्र १९९७मध्ये न्यूझीलंडने पाकिस्तानविरुद्ध ४५५ धावांचा विक्रम प्रस्थापित केला आहे. प्रसिद्धी व प्रोत्साहनाच्या अभावी पुरुषांच्या क्रिकेटमधील विक्रम चर्चेत राहतात.
विश्वचषक ही क्रिकेटजगताची सर्वोत्तम स्पर्धा. या स्पर्धेत प्रदर्शन चांगले होण्यासाठी स्थानिक सामन्यांमध्ये सराव होणे अत्यावश्यकच, मात्र ३६५ पैकी ३४० दिवस पुरुष क्रिकेटपटूंना दमवून टाकणारे वेळापत्रक राबवणाऱ्या बीसीसीआयकडे महिला क्रिकेटपटूंसाठी कोणत्याही ठोस स्पर्धा नाहीत. राष्ट्रीय संघाचा पाया असणाऱ्या १९, १७ तसेच १५ वर्षांखालील गटाच्या मुलांच्या असंख्य स्पर्धा देशभरात बीसीसीआयच्या मान्यतेने होतात, पण मुलींसाठी स्पर्धाच नाहीत. स्पर्धा नाही त्यामुळे सराव नाही, खेळाकडे वळणाऱ्यांची संख्या अल्प, प्रायोजक नाहीत. हे दुष्टचक्र आहे. मात्र राजकारण, अंतर्गत बंडाळ्या, परस्परविरोधी हितसंबंध, घोटाळे, न्यायालयीन सोपस्कार यात मश्गूल बीसीसीआयला सावित्रीच्या लेकींसाठी वेळ नाही आणि द्यायला पैसाही नाही. २००५मध्ये आयसीसीच्या आदेशामुळे बीसीसीआयला महिला क्रिकेटचे पालकत्व स्वीकारावे लागले, मात्र त्यानंतरही परिस्थितीत फारसा बदल झालेला नाही.
टेनिस, स्क्वॉश यांच्यासह अनेक खेळांमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंना समान बक्षीस रकमेसाठी जोरदार मोहिमा राबवल्या जात आहेत, पण क्रिकेटमध्ये ही तफावत महिला क्रिकेटला मिळणाऱ्या सापत्न वागणुकीचे द्योतक आहे. २०१३मध्ये भारतात झालेल्या महिला विश्वचषकात विजेत्या ऑस्ट्रेलिया संघाला ७५,००० डॉलर्स बक्षीस रकमेने गौरवण्यात आले आणि या स्पर्धेची एकूण बक्षीस रक्कम २,००,००० डॉलर्स होती. याच्या तुलनेत सध्या सुरू असलेल्या पुरुषांच्या विश्वचषक स्पर्धेत विजेत्या संघाला ३,९७५,००० डॉलर्स रक्कम मिळणार आहे आणि एकूण बक्षीस रक्कम १०,२२५,००० डॉलर्स रक्कम खर्च केली जाणार आहे.
दर्जा, कौशल्य, लोकप्रियता, चाहते या मुद्दय़ांवर महिला आणि पुरुष क्रिकेट यांमध्ये फरक राहणारच. अट्टहासाने समानता येणार नाही, परंतु क्षमता असूनही होणारे जाणीवपूर्वक दुर्लक्ष महिला क्रिकेटच्या विकासाला खीळ घालणारे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 5:50 am

Web Title: gender equality in cricket
Next Stories
1 बाद फेरी अभियान आज
2 कसेबसे उत्तीर्ण!
3 ‘शमी’ताभ!
Just Now!
X