popat(तोताराम निवांत दुपारी वृत्तपत्र चाळत बसला होता. दोन दिवसांनंतरही भारत-पाकिस्तान मॅचचे कवित्व संपलेले नाही. विठ्ठलपंत साद घालतात.)
तोताराम : विठ्ठलपंत, माणूस सवयीचा गुलाम. तुम्ही बहकू नका आमच्याप्रमाणे. चंपकराव येण्याची आणि भाकीतं सांगण्याची सवय झाली तुम्हाला.
(तेवढय़ात चंपकराव थ्री फोर्थ आणि टीशर्ट अशा वेशात अवतरतात.)
तोताराम : या टायमाला स्पोर्ट्स आऊटफिटात?
चंपक : सहा महिन्यांपासून कॉम्प-ऑफ तुंबलेला. आज त्याच्याच आनंदाप्रीत्यर्थ हुंदडतोय.
तोताराम : सकाळी मॅच पाहिली का?
चंपक : कसलं काय, उठून डोळे चोळत टीव्ही लावला, तेव्हा बोल्ट ‘मॅन ऑफ द मॅच’चा अ‍ॅवॉर्ड घेत होता. कसली घाई एवढी!
तोताराम : सगळे तुमच्या ‘माही’सारखे नसतात. शेवटच्या ओव्हपर्यंत मॅच खेचणं तब्येतीला हानिकारक.
चंपक : बांगलादेश-अफगाणिस्तानचं सांगा.
तोताराम : विठ्ठलपंत कामाला लागा.
(विठ्ठलपंत एक हिरवं-लाल कार्ड हाती देतात)
तोताराम : बांगलादेशकडे सगळं आहे, हो पण टेम्परामेंट नाही. मोमिनुल आणि अनामुल चांगले खेळतील. शकिबदादा आणि तमीमभौंना कर्त्यां पुरुषाप्रमाणे खेळावं लागेल. उत्साह आणि ऊर्जा पुरेशी नाही. कसदार खेळावंच लागेल. अफगाणिस्तानच्या मंडळींना प्रतिकूल परिस्थितीत जीव जपण्याची सवय त्यामुळे वर्ल्ड कपला आले की जीव ओतून खेळतात. नवख्यांचं अवघडलेपण कधीच दिसत नाही. एकाचं नाव घेऊन उपयोग नाही, १५ जण एकच आहेत. कॅनबेराच्या उष्ण वातावरणात मुकाबलाही ‘हॉट’ होणार.
चंपक : ओकीज. उशिरा ठेवलीय मॅच ते एक बरं आहे. बघता तरी येईल काय हॉट वगैरे म्हणताय ते!