पाकिस्तान आणि त्यानंतर दक्षिण आफ्रिकेसारख्या संभाव्य विजेत्या संघावर मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघाच्या कामगिरीवर माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकर प्रभावित झाला आहे. याबाबत त्याला आनंदही झाला असला तरी तो समाधानी मात्र नक्कीच नाही.
‘‘गतविजेता भारतीय संघ या वेळी किमान उपांत्य फेरीपर्यंत पोहोचायला हवा. आतापर्यंत विश्वचषकामध्ये त्यांनी चांगले विजय मिळवले आहेत, त्याबाबत मी आनंदी असलो तरी समाधानी मात्र नाही. मला असे वाटते की, संघामध्ये यापुढेही सातत्याने अशी कामगिरी करत राहावी,’’ असे सचिन म्हणाला.
भारताच्या दोन्ही विजयांमध्ये फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. याबाबत सचिन म्हणाला की, ‘‘मला या खेळाडूंची क्षमता माहिती असल्याने विश्वचषकात ते चांगले खेळतील, हे मी पूर्वीच म्हटले होते. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपण चांगली फलंदाजी केली. डावाचा शेवट अजूनही चांगला होऊ शकला असला, पण दक्षिण आफ्रिका या सामन्यामध्ये कधीही वरचढ ठरलेला दिसला नाही. या सामन्यासाठी पुरेपूर अभ्यास भारतीय संघाने केला होता.’’
दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना शतकवीर शिखर धवनने गाजवला, त्याला अजिंक्य रहाणेची चांगली साथ मिळाली. याबाबत सचिन म्हणाला की, ‘‘पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये शिखरने अप्रतिम फलंदाजी केली. मला आशा आहे की त्याच्या कामगिरीमध्ये असेच सातत्य राहील. या खेळींमुळे त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. या विश्वचषकावर शिखर प्रभाव पाडेल असे मी म्हटले होते, पण अजिंक्य रहाणेची खेळी हा दुग्धशर्करा योग होता. अगदी सहजपणे त्याने अप्रतिम फटक्यांचा नजराणा पेश केला. मोठे फटके मारण्याचा त्याने जास्त प्रयत्न केला नाही आणि जे मोठे फटके खेळला ते चोख होते.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेची सुरुवात चांगली होणे गरजेचे असते. कारण जर सुरुवातीला विजय मिळाले तर तुमचे मनोबल उंचावत जाते आणि त्यामुळे ही विजयाची मालिका भारतीय संघाने सुरूच ठेवायला हवी.’’

अतिसरावाने दडपून जाऊ नका -सचिन
पर्थ : भारतीय संघाने अचानकपणे सरावाला विश्रांती दिल्याची बातमी आल्यावर बऱ्याच जणांनी भुवया उंचवल्या होत्या. पण अतिसरावाने दडपून जाण्यापेक्षा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ताजेतवाने राहण्यावर अधिक भर दिला असून सचिननेही या गोष्टीला पाठिंबा दिला आहे. ‘‘सराव करणे आणि स्वत:ला ताजेतवाने ठेवणे, याचा योग्य समन्वय ठेवायला हवा. त्यामुळे या दोन्ही गोष्टी कशा हाताळायचा हे ठरवायला हवे. जेव्हा काही चुकीचे घडत असते तेव्हा जास्त सराव करावा लागतो, पण जेव्हा सारे काही योग्य चालू असते त्या वेळी ऊर्जा वाचवणेही महत्त्वाचे असते,’’ असे सचिन म्हणाला.