News Flash

कठीण काळात शांत राहिलो -धवन

खेळ मनासारखा होत नव्हता. टीका होत होती. मात्र प्रतिकूल परिस्थितीत मी शांत राहिलो आणि म्हणूनच दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघाविरुद्ध संघाच्या विजयात शतकी योगदान देऊ शकलो,

| February 24, 2015 03:17 am

शिखर धवन

खेळ मनासारखा होत नव्हता. टीका होत होती. मात्र प्रतिकूल परिस्थितीत मी शांत राहिलो आणि म्हणूनच दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघाविरुद्ध संघाच्या विजयात शतकी योगदान देऊ शकलो, असे उद्गार शिखर धवनने काढले.
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वसाधारण कामगिरीमुळे सलामीवीर शिखर धवनवर जोरदार टीका होत होती. त्यातच तिरंगी मालिकेतही लौकिकाला साजेशी कामगिरी करता न आल्याने विश्वचषकासाठीच्या संघातून त्याला वगळावे अशा चर्चाना उधाण आले होते. पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीत मोठी खेळी करण्यात अपयशी ठरलेल्या शिखरने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत शतकी खेळी साकारत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. या शतकासह शिखरने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
 ‘‘पदार्पणाच्या विश्वचषकात शतक झळकावता आल्याची भावना सुखावणारी आहे. मात्र माझ्या शतकापेक्षा विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेला आम्ही पहिल्यांदा नमवू शकलो याचा आनंद जास्त आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढय़ संघांमध्ये त्यांची गणना होते. त्यांच्याविरुद्ध विजय मिळवल्याचे समाधान अतीव आहे. दर्जेदार गोलंदाजांचा समावेश असलेल्या माऱ्याविरुद्ध शतक करता आले याचा आनंद आहे,’’ असे शिखरने सांगितले.
फॉर्ममध्ये परतल्याविषयी विचारले असता धवन म्हणाला, ‘‘या क्षणाची मी गेले अनेक महिने प्रतीक्षा करत होतो. या कठीण काळात शांत राहण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. माझ्या बॅटमधून धावा निघत नव्हत्या तेव्हा मी कधीही घाबरलो नाही. वाईट दिवसांनंतर कधीतरी चांगला दिवस येईल याची मला खात्री होती. मानसिकदृष्टय़ा कणखर राहणे आवश्यक होते आणि मी तेच केले. वागण्यातील शांतपणा फलंदाजीतही प्रतीत झाला असे वाटते. कठीण कालखंडातही मी सुरुवात करत होतो, मात्र या सुरुवातीचे मोठय़ा खेळीत रूपांतर करता येत नव्हते. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेद्वारे फॉर्ममध्ये परतल्याने आनंदी आहे.’’
हे कारकीर्दीतील सर्वोत्तम शतक वाटते का, यावर शिखर म्हणाला, ‘‘२०१३मध्ये चॅम्पियन्स करंडकातील शतकापेक्षा हे शतक महत्त्वाचे आहे. मी निग्रहपूर्वक खेळलो. प्रत्येक फटका विचारपूर्वक खेळत होतो. कार्डिफ येथील शतकापेक्षा या शतकाच्या वेळी खेळाडू म्हणून परिपक्व झालो आहे. माझ्या खेळात आणखी सुधारणा होईल.’’
‘‘दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी अव्वल दर्जाची आहे. त्यामुळे भागीदारी होणे आवश्यक होते. सुरुवातीला विराट आणि त्यानंतर अजिंक्यसह भागीदारी झाल्याने तीनशेचा टप्पा ओलांडू शकलो,’’ असे शिखरने सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2015 3:17 am

Web Title: i am happy that we beat south africa in world cup says shikhar dhawan
टॅग : Shikhar Dhawan
Next Stories
1 पुन्हा मोठय़ा विजयासाठी वेस्ट इंडिज सज्ज
2 लवचिकता हे रहाणेचे बलस्थान -धोनी
3 BLOG : अशी गोलंदाजी आपण नेहमी का करू शकत नाही?