विश्वविजेतेपद राखणे खडतर आव्हान आहे. या कठीण काळात चाहत्यांनी भारतीय संघाला पाठिंबा द्यावा, असे आवाहन महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने केले आहे. 

‘‘प्रत्येक सामन्यात प्रतिस्पध्र्याचा धुव्वा उडवत विजय मिळवावा, ही चाहत्यांची अपेक्षा असते. पण ते शक्य नाही. काही वेळेला तुम्हाला पराभवाला सामोरे जावे लागते. मात्र त्यातूनही खूप काही शिकण्यासारखे असते. कठीण कालखंडात संघात एकी असेल तर विजयपथावर परतता येते. केवळ जिंकल्यानंतर नव्हे तर पडत्या काळातही देशवासीयांची साथ असेल तर खेळाडूंचा हुरूप वाढतो,’’ असे सचिनने सांगितले.
विश्वचषकात तब्बल सहा वेळा प्रतिनिधित्व करणाऱ्या सचिनने निव्वळ प्रेक्षक म्हणून यंदाचा विश्वचषक अनोखा असेल, असे सांगितले. तो पुढे म्हणाला, ‘‘गेल्या विश्वचषकातही मी सदिच्छादूत होतो. मात्र त्यावेळी मी खेळत होतो. यावेळी तटस्थ भूमिकेतून विश्वचषक पाहण्याचा अनुभव वेगळाच असेल. १९८३ला भारताने विश्वचषक जिंकल्याचे क्षण मी टीव्हीवर अनुभवले होते. १९८७मध्ये मी बॉलबॉयच्या भूमिकेत होतो. तेथून सुरू झालेला प्रवास विश्वचषकाच्या सदिच्छादूत होण्यापर्यंत आल्याने एक वर्तुळ पूर्ण झाल्याची भावना मनात आहे.’’