14 December 2019

News Flash

विद्यार्थी उपग्रहाचा गौरव

अंतराळात उपग्रह स्थिर करावयाचा असेल तर त्यापेक्षा अवघड गोष्ट कोणतीच नसते.

आयआयटी मुंबईतील विद्यार्थ्यांनी विकसित केलेला ‘प्रथम’ हा उपग्रह

सोमवारी अवकाशात झेपावला आणि त्याच्या निश्चित स्थानी स्थिरावून प्रवास करू लागला. आयआयटीमधील विद्यार्थ्यांनी असा उपग्रह बनवावा ही संकल्पना शशांक तामसकर आणि सप्तर्षी बंडोपाध्याय यांच्यासमोर मांडणारे टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील डॉ. मयांक वाहिया यांनी या आव्हानाचा घेतलेला वेध.

अंतराळ हे शेवटचे टोक मानले जाते. अंतराळात जाण्याइतके मोठे आव्हान आजही कोणतेच नाही. अंतराळात उपग्रह स्थिर करावयाचा असेल तर त्यापेक्षा अवघड गोष्ट कोणतीच नसते. हे साध्य करण्यासाठी उपग्रहात सेकंदाला आठ किमी प्रवास करण्याची क्षमता असणे आवश्यक आहे. मुंबई ते पुणे हे सुमारे १२० किमीचे अंतर अवघ्या १५ सेकंदांत पार करण्याइतका हा वेग आहे. एवढय़ा जास्त वेगात उपग्रहाशी जोडून राहणे हेही तितकेच अवघड असते. यासाठी पृथ्वीवरील परिस्थितीत निरोगी जीवन जगण्यासाठी आपण जसे स्वत:ला सक्षम करतो तसे उपग्रहालाही सक्षम करावे लागते. यात उपग्रहाला निर्वात परिस्थितीत प्रवास करणे, सौर सेलपासून ऊर्जानिमिती करणे, वातावरणातील किरणोत्सर्गाचा सामना करण्यासाठी तयार करणे या बाबींचा समावेश आहे. उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी ज्या रॉकेटचा वापर होतो त्याचा वेग अवघ्या १६ मिनिटांमध्ये शून्यावरून तब्बल २८ हजार किमी प्रतितास इतका वाढतो. यामुळे होणारे गतिवर्धन खूप आक्रमक असते. यामुळे उपग्रहाचे प्रक्षेपण करताना सर्व प्रणाली लहान आकारात विकसित करणे, प्रतिकूल परिस्थितीत इतक्या जलद वेगाने धावणाऱ्या उपग्रहाच्या माध्यमातून संदेश मिळवणे यासाठी उच्च दर्जाची तंत्रज्ञान समज असणे आवश्यक असते.

विद्यार्थी उपग्रहांची मालिका अवकाशात झेपवणारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ही पहिली संस्था असेल. हे विद्यार्थी उपग्रह अगदीच लहान आकाराचे असतात. याचे वजन हे १० किलोपेक्षा कमी असते आणि त्याचा आकार एक घनमीटर इतका असतो. इस्रोचा हा प्रकल्प अगदी आगळा असून यामुळे विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधनातील गुंतागुंतीच्या गोष्टींचा अभ्यास करणे शक्य होते. यात सगळय़ात महत्त्वाची बाब म्हणजे यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च दर्जाच्या प्रणाली विकसित करण्याची क्षमता निर्माण होते. या इस्रोच्या या उपक्रमामुळे देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या पिढय़ा प्रगत तंत्रज्ञानात शिकू शकतात. इस्रोने आत्तापर्यंत केलेल्या विद्यार्थी उपग्रहांच्या प्रक्षेपणानंतर आता परदेशी संस्थांमधील विद्यार्थीही इस्रोने त्यांच्या उपग्रहांचे प्रक्षेपण करावे यासाठी इच्छुक आहेत.

विद्यार्थी उपग्रह कार्यक्रम हा देशातील आणि परदेशातील पिढय़ांना अधिक प्रशिक्षित करण्यास मदत करणार आहे. यातून अनेक नवीन संकल्पना विकसित होऊ शकणार आहेत. प्रथम या उपग्रहातून पृथ्वीपासून ५० किमीपेक्षाही उंच असलेल्या रेडिओ लहरी परावर्तित करणाऱ्या थरातील विद्युत परमाणू मोजता येणार आहे. हा थर जीपीएस संदेश परावर्तित करण्यात अडथळे निर्माण करू शकतो. प्रथमच्या साह्य़ाने विद्युत परमाणूंची संख्या कळल्याने जीपीएस अधिक खात्रीचे होणार आहे. याचबरोबर पृथ्वी आणि वातावरणातील संबंध समजणेही सोपे होणार आहे. या अशा महत्त्वाच्या आणि मागणी असलेल्या क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी संधी निर्माण होणे हे देशाच्या दृष्टीने गौरवास्पद आहे.

First Published on September 27, 2016 2:52 am

Web Title: iit student satellite glory
Just Now!
X