आधी काय होतं आणि आत काय आहे, याची कधीच तुलना आपण करायची नसते आणि सरतेशेवटी क्रिकेट हा खेळ आहे, त्यामुळे यापूर्वी काय घडलं याचा विचार करायचा नसतो. तुम्ही पाठांतर केलात आणि उत्तर दिलीत, असं यामध्ये होत नाही. ही एक फार अत्यंत निराळी स्पर्धा आहे, हा विश्वचषक आहे. त्यामुळे प्रेशर हे मोठय़ा संघांना असणारच, कदाचित आर्यलड आणि यूएईसारख्या नवख्या संघांवर ते जास्त नसेल, पण भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान यांच्यावर हे दडपण फार मोठय़ा प्रमाणात असेल. त्यामुळे ते आपला बेस्ट देण्याचाच प्रयत्न करणार. त्याच्यामध्ये इंडियाने आतापर्यंत आपण काय केलं, मग मागचा वर्ल्डकप जरी आपण जिंकलो असलो तरी आत्ताचा वर्ल्डकप निराळा आहे, कारण तो निराळ्या प्रांतामध्ये आहे.
तिरंगी स्पध्रेत आपण हरलो तरीसुद्धा मला असं वाटतं की ते त्या वेळचं होतं, आता आपले खेळाडू ज्या पद्धतीने खेळतायत ना, ते फारच वेगळं आहे. त्यांना माहिती आहे की त्यांना जिंकायचंय, जिंकण्यासाठीच ते उतरलेले आहेत, असं त्यांच्याकडे पाहिल्यावर वाटतं. प्रत्येकाची चांगली बॅटिंग होतेय, शिखरला बघितलं तर त्याला वर्ल्डकपपूर्वी लय सापडत नव्हती. भारताची सांघिक कामगिरी ही दिसून येत आह, तसे सर्वच संघ म्हणूनच खेळतात. पण भारताच्या खेळामध्ये एक वेगळी भावना मला दिसतेय. हा गेम आहे, जसजसे सामने होतील, तसतसे आपल्याला वेध लागतील. जो संघ चांगला खेळ करील तो वर्ल्डकप जिंकेल. सांघिक कामगिरी चांगली झाली तर ते चांगलं होणार आहे. आपल्याकडे शेवटच्या फळीपर्यंत सगळे खेळतायत. मीडियम पेसर्स चांगली कामगिरी करताना दिसतायत. संघाचा बॅलन्स चांगलाच आहे. पण दक्षिण आफ्रिकेला आपण हरवू आणि ते देखील १३० धावांच्या मार्जिनने ते कोणालाही वाटलं नसेल. त्यांची फिल्डिंग एवढी चांगली आहे की आपण ३०७ नाही तर साडेतीनशेच्या जवळपास धावा केल्या, त्यांच्या फिल्डर्सनी त्या रोखल्या. आपलीही फिल्डिंग अप्रतिम झाली. ज्या पद्धतीने आपण बोलिंग आणि फिल्िंडग केली ती सॉलिडच होती. दक्षिण आफ्रिकेला हरवल्यावर मला जास्त आनंद झाला, जेवढा पाकिस्तानला हरवल्यावर झाला नाही, कारण तो सामना आपण जिंकू असे वाटतच होते आणि तो ‘वन साइडेड’ झाला. पाकिस्तानच्या दुसऱ्या सामन्यातही आपण बघितलं की त्यांनी कशा पद्धतीने मार खाल्ला. ते चांगला खेळ करायचा प्रयत्न करतायत, पण त्यांच्याकडून चांगली कामगिरी होत नाही. त्यांच्या देशात तर फार तीव्र नाराजी आहे. त्यामुळे पाकिस्तानविरुद्ध जिंकलो, त्याच फारस कौतुक मला वाटलं नाही, पण दक्षिण आफ्रिकेवरचा विजय हा फारच आनंद झाला. आर्यलड आणि
 यूएई यांच्यातलाही सामना चांगला झाला. आर्यलडचा संघ खरंच दमदार आहे.
पण मला आतून असं वाटतं की,
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये अंतिम सामना होईल, असं मला मनापासून वाटतं.
मला असं वाटतं की, दोन सामन्यांमध्ये आपण चांगला खेळ केलाय. आता साखळीमध्ये चार सामने बाकी आहेत. त्यामध्ये उर्वरित खेळाडूंना संधी मिळेल, असं मला वाटतं. दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यावर आता बाकीचे सामने आपल्याला सोपे वाटतील, पण त्यांना गाफिल राहू नये, एवढेच वाटते. आपले प्लेअर्सना बँग ऑन आहेत, त्यामुळे आता आपली टीम सहजपणे पुढच्या फेरीत जाईल.
जितेंद्र जोशी
शब्दांकन : प्रसाद लाड