सलग सहाव्यांदा विश्वचषकात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला पराभूत करत विजयी परंपरा कायम राखली आणि महाराष्ट्रासह भारतभरात दिवाळी साजरी करण्यात आली. भारतीयांनी सामना जिंकल्यावर अनेक घरांमध्ये आनंद साजरा करण्यात आला. त्याचबरोबर रस्त्यांवर फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशाच्या तालावर काढण्यात आलेल्या मिरवणुका व ठिकठिकाणी चाहत्यांनी केलेल्या विजयाच्या घोषणा, अशा जल्लोषात चाहत्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या पाकिस्तानवरील विजयाचे स्वागत केले. जम्मूमध्ये असलेल्या भारतीय जवानांनीही एकमेकांना मिठाई भरवत आपला आनंद साजरा केला. नवी दिल्ली, पंजाब, हरियाणा या राज्यांमध्ये प्रत्येक मोहल्ल्यामध्ये जल्लोष सुरू होता.
मुंबईत रोहित शर्माच्या घरी कुटुंबीयांनी एकत्रितपणे सामन्याचा आनंद घेतला व विजयाचा जल्लोष साजरा केला. नागपूरला उमेश यादवच्या घरच्यांनीदेखील भारताच्या विजयाचा आनंद व्यक्त केला.
सकाळपासून रविवारच्या जंगी मेन्यूसाठी मासळी, चिकन किंवा भाजीपाल्याच्या खरेदीसाठी बाहेर पडणारा क्रिकेटप्रेमी घराबाहेर पडायला तयार नव्हता, त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. हा सामना सुरू झाल्यानंतर एरवी वाहतुकीच्या कोंडीमुळे सतत चर्चेत असलेल्या रस्त्यांवर आज फारशी वर्दळ नव्हती. अनेक सार्वजनिक मंडळांनी गल्लीत दूरदर्शनद्वारे या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहण्याची संधी उपलब्ध केली होती. पानाच्या टपऱ्या व केशकर्तनालयांमध्येही छोटेसे संच ठेवून थेट प्रक्षेपण उपलब्ध करण्यात आले होते. अनेक क्रीडा क्लबमध्येही मोठय़ा पडद्यांवर आपल्या सदस्यांसाठी ही संधी देण्यात आली. विवाहाचा मुहूर्त असल्यामुळे अनेक कार्यालयांमध्ये गर्दी होती. तीन-चार कार्यालयांमध्ये तर मोठय़ा पडद्यांवर या प्रक्षेपणाची सोय करण्यात आली होती.
पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी बाद झाल्यावर भारतीय चाहत्यांनी सुरू केलेला जल्लोष सामना संपेपर्यंत सुरूच होता. संध्याकाळी पाचनंतर भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले, तेव्हा मात्र सकाळपासून दडून बसलेले सारे पुन्हा एकदम ‘सोशल मीडिया’वर अवतरले. संध्याकाळी भारताच्या विजयाचे असंख्य चुटके, विनोद, ‘व्हॉट्स अ‍ॅप’वरून फिरू लागले. इतकेच नव्हे तर दिवसभर टीव्हीसमोर ठाण मांडून बसलेली तरुणाई बाहेर पडली आणि विजयोत्सव साजरा करू लागली.
मुंबईच्या दादर, शिवाजी पार्क, नरिमन पॉइंटसह अनेक भागांत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. कित्येक तरुण बाईक आणि गाडय़ांमधून तिरंगा फडकवत फिरत होते. सचिन तेंडुलकरनेही आपल्या वांद्रे येथील घराबाहेर चाहते जल्लोष करत असल्याचे ‘ट्विटर’वरून सांगितले, तर अमिताभ बच्चन यांनीही विजयाचा आंनद व्यक्त करत, यापुढेही समालोचन करण्यास हरकत नसल्याची मिश्किल ‘ट्वि’प्पणी केली. दरम्यान, पुण्यामध्ये काही चाहत्यांनी साखर वाटप करीत विजयोत्सव साजरा केला. विजयावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले. फटाक्यांच्या मोठमोठाल्या माळा लावून जल्लोष केला गेला. सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यांवर चाहत्यांनी हातात तिरंगा ध्वज घेत, भारतीय खेळाडूंच्या छायाचित्रांचे फलक घेत मिरवणुकीने जल्लोष केला.