र्वष सरली, संघ बदलले, खेळाडू, कर्णधार बदलले; पण एक गोष्ट चिरंतन म्हणावी तशी आजही कायम आहे. अगदी ‘इतिहास हा बदलण्यासाठीच असतो’, या वाक्याला तडा देणारी आणि ती गोष्ट म्हणजे विश्वचषकात भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानवरील विजय. आतापर्यंतच्या विजयाची परंपरा महेंद्रसिंग धोनीच्या युवा ब्रिगेडनेही कायम ठेवत पाकिस्तानला ७६ धावांनी पराभूत करत डौलात विजयी सलामी दिली. पुन्हा एकदा ‘जित गया भाई जित गया, हिंदुस्थान जित गया’ हा नारा देशभर घुमला आणि सलग सहाव्यांदा पाकिस्तानी चाहत्यांचे फटाके पुन्हा एकदा माजघरात जाऊन पडले. सामनावीर विराट कोहलीचे शतक, त्याला लाभलेल्या शिखर धवन आणि सुरेश रैना यांच्या तडफदार अर्धशतकांच्या सुरेख साथीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना ७ बाद ३०० अशी दमदार मजल मारली. स्पर्धेपूर्वीच कुचकामी ठरवलेल्या गोलंदाजांनी अचूक आणि भेदक मारा केल्यामुळे पाकिस्तानला आव्हानाचा यशस्वी पाठलाग करणे कर्मकठीण झाले.
भारताने नाणेफेक जिंकल्यावर कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अनपेक्षितपणे प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत पहिला धक्का दिला. भारताच्या सलामीवीरांनी सावध सुरुवात केली असला तरी रोहित शर्माच्या (१५) रूपात भारताला पहिला धक्का बसला; पण त्यानंतर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी संघाच्या धावसंख्येला संयतपणे आकार देण्याचा प्रयत्न केला. सावध खेळत या दोघांनी एकेरी-दुहेरी धावांवर जास्त भर दिला. फॉर्मात नसलेल्या या दोन्ही फलंदाजांनी सुरुवातीला स्थिरस्थावर होण्यावर भर दिला आणि धावफलक सातत्याने हलता ठेवण्याची जबाबदारी चोख पार पाडली; पण विराट कोहलीच्या एका चुकीच्या निर्णयामुळे धवनला धावबाद होऊन माघारी परतावे लागले. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२९ धावांची भागीदारी रचत संघाच्या धावसंख्येची उत्तम पायाभरणी केली. धवनने ७ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७३ धावा फटकावल्या. धवन बाद झाल्यावर सुरेश रैनाला चौथ्या क्रमांकावर बढती देण्यात आली आणि भारताची ही रणनीती यशस्वी ठरली. शतकाच्या समीप आल्यावर कोहलीची फलंदाजी थोडीशी अडखळली; पण रैनाने या वेळी धावसंख्येत उत्स्फूर्तपणा आणला. कोहली ७६ धावांवर असताना त्याला जीवदान मिळाले आणि त्याने याचा फायदा उचलत पाकिस्तानविरुद्धच्या विश्वचषकातील सामन्यांमध्ये पहिला शतकवीर होण्याचा मान पटकावला. शतक झळकावल्यावर मात्र कोहलीला जास्त धावा करता आल्या नाहीत. त्याने ८ चौकारांच्या जोरावर १०७ धावांची खेळी साकारली. कोहली बाद होण्यापूर्वीच रैनाने सामन्याची सूत्रे आपल्या हातात घेतली होती. पाकिस्तानच्या गोलंदाजीचा चोख समाचार घेत रैनाने भारताची धावगती जलद केली. रैनाने ५६ चेंडूंत ५ चौकार आणि तीन षटकार लगावत ७४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. रैना बाद झाल्यावर मात्र भारताच्या धावगतीला खीळ बसली; पण संघाला तीनशे धावांच्या आकडय़ाला स्पर्श करता आला. पाकिस्तानकडून वेगवान गोलंदाज सोहेल खानने पाच बळी मिळवण्याची किमया साधली.
भारताच्या या आव्हानाचा पाठलाग करताना युनिस खानच्या (६) रूपात पाकिस्तानला पहिला धक्का बसला; पण त्यानंतर अहमद शेहझाद (४७) आणि हॅरीस सोहेल (३६) यांनी संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. सोहेलला बाद करत अश्विनने ही जोडी फोडली आणि त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांची रांग लागली. १ बाद ७९वरून पाकिस्तानची ५ बाद १०३ अशी अवस्था झाली. त्यानंतर कर्णधार मिसबाह उल हकला शाहिद आफ्रिदी (२२) चांगली साथ देईल असे वाटत होते; पण त्याला मोठी खेळी साकारता आली नाही आणि मिसबह एकाकी पडला. अन्य फलंदाजांकडून अपेक्षित साथ लाभली नसली तरी त्याने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला; पण त्यामध्ये तो अयशस्वी ठरला. मिसबाहने ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७६ धावांची खेळी साकारली. भारताच्या मोहम्मद शमीचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. कारण प्रत्येल स्पेलमध्ये त्याने पाकिस्तानला पिछाडीवर ढकलले. शमीने ३५ धावांत चार बळी घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्याला वेगवान गोलंदाज मोहित शर्माने चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक
भारत : ५० षटकांत ७ बाद ३०० (विराट कोहली १०७, सुरेश रैना ७४, शिखर धवन ७३; सोहेल खान ५/५५) विजयी वि. पाकिस्तान : ४७ षटकांत सर्व बाद २२४ (मिसबाह उल हक ७६; मोहम्मद शमी ४/३५)
सामनावीर : विराट कोहली.

माझ्या कारकीर्दीतला हा आतापर्यंतचा सर्वोत्तम विजय असावा. विश्वचषकाची अद्भुत सुरुवात झाली आहे. पाकिस्तानविरुद्धचा सामना हा नेहमीच महासंग्रामासारखा असतो आणि आजचा सामनाही तसाच रंगला. जेव्हा तुम्ही चांगली कामगिरी करता तेव्हा तुमच्याकडून अपेक्षा अधिक वाढतात; पण मला दडपण आणि अपेक्षा नेहमीच आवडतात. या सामन्यासाठी आम्हाला जबरदस्त पाठिंबा मिळाला. संपूर्ण स्पर्धेत आम्हाला असाच पाठिंबा मिळेल, अशी आशा आहे.
– विराट कोहली, भारताचा फलंदाज

विश्वसनीय विराट!
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत शतकी खेळी साकारत विराट कोहलीने भारताच्या wc10विश्वचषक अभियानाची विजयी सुरुवात केली. या विजयाचा आनंद विराटने ‘सेल्फी’च्या माध्यमातून साजरा केला. टेनिसमध्ये जेतेपद पटकावल्यानंतर कॅमेऱ्यावरच स्वाक्षरी देण्याची अनोखी परंपरा रूढ झाली आहे. विराटनेही ही परंपरा जोपासत सामन्याचे चित्रीकरण करणाऱ्या एका कॅमेऱ्यावर स्वाक्षरी दिली आणि ‘सेल्फी’ही काढला.  ऑस्ट्रेलियाशी झालेल्या कसोटी मालिकेत विराट झंझावाती फॉर्ममध्ये होता. मात्र तिरंगी एकदिवसीय स्पध्रेत त्याला चांगली कामगिरी करता आली नव्हती. मात्र विश्वचषकात विराटने पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत शतक झळकावले. विराटच्या शतकानेच भारताच्या विजयाचा पाया रचला. चाहत्यांचा आणि संघव्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवल्यानेच विराटने कॅमेऱ्यावर स्वाक्षरीच्या वर इंग्रजीत ‘बिलिव्ह’ असे लिहिले.

कोहलीने इतिहास रचला
विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने आतापर्यंतचा एकही सामना गमावला नसला तरी एकाही भारतीयाला शतकही झळकावता आले नव्हते; पण यंदाच्या पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने (१०७) शतक रचत नवा इतिहास लिहिला. भारताचा माजी महान फलंदाज सचिन तेंडुलकरने २००३च्या विश्वचषकात ९८ धावांची खेळी साकारली होती. कोहलीने २२वे शतक साकारताना सौरव गांगुलीच्या शतकी विक्रमाची बरोबरी साधली.

निळाईचे साम्राज्य!
पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबरचा सामना असेल आणि तोही विश्वचषकाचा, मग भारतीय कसे काय मागे राहतील, याचाच प्रत्यय पुन्हा एकदा या विश्वचषकातील सामन्यातही आला. अ‍ॅडलेड क्रिकेट ग्राऊंडवर भारतीय चाहत्यांनी परिधान केलेल्या निळ्या रंगाच्या गणवेशामुळे निळाईचे साम्राज्य पसरलेले होते. निळ्या समुद्राच्या लाटा यावात तसा भास सामना पाहताना होत होता. या निळाईमध्ये पाकिस्तानच्या चाहत्यांनी परिधान केलेला हिरव्या रंगाचा गणवेश हा निळ्या समुद्रामध्ये हिरव्या ठिपक्यांसारखा दिसत होता. अ‍ॅडलेड क्रिकेट ग्राऊंडची क्षमता ५३,५०० एवढी असून, त्यात २५,००० भारतीय चाहते होते.

अमिताभचे समालोचन पदार्पण
‘अभिनयाचा बादशाह’ असलेल्या अमिताभ बच्चन यांनी भारत-पाकिस्तान लढतीच्या निमित्ताने समालोचनात यशस्वी पदार्पण केले. आपल्या दमदार आवाजासाठी जगप्रसिद्ध अमिताभ यांनी कपिल देव आणि शोएब अख्तर यांच्या साथीने सामन्यापूर्वीच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यानंतर ७२ वर्षीय अमिताभ यांनी आकाश चोप्रा आणि अख्तरच्या साथीने भारत आणि पाकिस्तान यांच्या खेळाचे विश्लेषण केले. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आणि अरुण लाल यांनी अमिताभच्या साथीने समालोचन केले. १९६०च्या दशकात सदोष आवाजासाठी अमिताभला आकाशवाणीने नाकारले होते. ‘‘हा अनुभव अनोखा होता. या संधीने मला भरभरून आनंद दिला. भारताने विजय मिळवल्यामुळे आनंद द्विगुणित झाला आहे,’’ अशा शब्दांत अमिताभ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
wc06

भारतीय संघाचे अभिनंदन. छान खेळलात. आम्हा सर्वाना तुमचा अभिमान आहे!
-नरेंद्र मोदी, भारताचे पंतप्रधान

आयसीसी विश्वचषकामधील पहिला सामना जिंकणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन. आगामी सामन्यांतसुद्धा ही यशोमालिका कायम ठेवा!
-प्रणब मुखर्जी, राष्ट्रपती

भारताने विश्वास सार्थ ठरवणारा विजय मिळवला. अजून मोठा पल्ला गाठायचाय!    
-सचिन तेंडुलकर