विश्वचषकात भारतीय संघाची दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कामगिरी चांगली झालेली नाही. मात्र दक्षिण आफ्रिकेसारख्या मातब्बर संघाला नमवण्याची क्षमता भारतीय संघात आहे, असे मत भारताचा माजी खेळाडू व्ही. व्ही. लक्ष्मणने व्यक्त केले.
‘‘पाकिस्तानविरुद्धच्या विजयानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल आणि व्हरनॉन फिलँडर या वेगवान माऱ्याचा सामना करण्यासाठी भारतीय फलंदाज समर्थ आहेत. ऑस्ट्रेलियातील वेगवान खेळपट्टय़ांवर ते गेली चार महिने खेळत आहेत. त्यामुळे चेंडूला मिळणारी उसळी आणि वेग या गोष्टींना ते सरावले आहेत. त्यामुळे भारताला विजयाची उत्तम संधी आहे,’’ असे त्याने सांगितले.  
भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीविषयी विचारले असता लक्ष्मण म्हणाला, ‘‘ऑस्ट्रेलियाच्या प्रदीर्घ दौऱ्यात गोलंदाजांची कामगिरी हाच भारतीय संघासाठी चिंतेचा विषय होता. मात्र सलामीच्या लढतीत पाकिस्तानविरुद्धच्या महत्त्वपूर्ण लढतीत त्यांनी योजनांबरहुकूम गोलंदाजी केली. त्यामुळे बळी मिळाले. दक्षिण आफ्रिकेची फलंदाजांची फळी नवव्या क्रमांकापर्यंत आहे. त्यामुळे गोलंदाजी कळीचा मुद्दा ठरणार आहे. उमेश यादव आणि मोहम्मद शमी यांनी अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी धावा रोखत पाकिस्तानी फलंदाजांवर दडपण आणले होते. त्यामुळेच विजय साकारला.’’
विश्वचषकाच्या १९९२, १९९९ आणि २०११ अशा  एकूण तिन्ही लढतींत दक्षिण आफ्रिकेने भारतावर  विजय मिळवला आहे. ‘‘तो इतिहास आहे. त्याचा बाऊ करण्याची गरज नाही. आताच्या संघातले बहुतांशी खेळाडू या तीन सामन्यांमध्ये नव्हते. नवीन खेळाडूंनी इतिहासाचे दडपण घेऊ नये. प्रतिस्पध्र्याचे कच्चे दुवे ओळखून त्यानुसार खेळण्याची हातोटी भारतीय संघातील खेळाडूंकडे आहे,’’ असे लक्ष्मण म्हणाला.