sattaविश्वचषक स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. सर्वच लढती रंगतदार होणार असल्यामुळे सट्टेबाजही खूश आहेत. जेवढय़ा लढती रंगतदार तेवढी सट्टेबाजारालाही रंग चढतो. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या सामन्यात त्यांचा खरा धंदा होत असतो. बांगलादेशसोबत भारताची लढाई ही एकतर्फी होईल, असा सट्टेबाजांचा होरा असला तरी असे भाव देऊन पंटर्सना आव्हान दिले जाते. बांगलादेशसारखा संघ कधीही चमत्कार करू शकतो, अशी आशा असते तर भारत कधीही गडगडू शकतो, असेही सट्टेबाजांना वाटत असते. त्यामुळेच एक जुगारच अशा संघांना भाव देऊन केला जातो. त्यामुळेच भारताला २० पैसे देऊ करणाऱ्या सट्टेबाजांनी बांगलादेशसाठी पाच रुपये भाव दिला आहे. न्यूझीलंड-वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका-श्रीलंका या चुरशीच्या लढतींमुळेच आणखी रंगत वाढणार आहे. या पाश्र्वभूमीवर भारताला आता तिसरा क्रमांक मिळाला आहे. विजेतेपदाचे दावेदार आहेत ऑस्ट्रेलिया आणि मग न्यूझीलंड. उपांत्य फेरीत कोणते संघ पोहोचतील, याबाबतही आता उलाढाल सुरू झाली आहे. भारत, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ उपांत्य फेरीत असतील.
अव्वल पाच फलंदाज : कुमार संगकारा,
ए बी डी’व्हिलियर्स, शिखर धवन, तिलकरत्ने दिलशान आणि हशिम अमला.
अव्वल पाच गोलंदाज : मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, मोहम्मद शमी, टिम साऊदी आणि मॉर्ने मोर्केल.
निषाद अंधेरीवाला