उपांत्य फेरीत भारताच्या पराभवामुळे गुरुवारी ऑस्ट्रेलियात (फक्त भारतीय जनसंख्येत) नराश्याचे वातावरण होते. भारताची घसरगुंडी पाहताच अनेक समर्थकांनी महेंद्रसिंग धोनी तंबूत परतताच स्टेडियमवरून पलायन केले. पराभवाच्या उंबरठय़ावर, ऑसी जल्लोषात आणि टोचणाऱ्या टोमण्यांसमोर logo04धोनी सेनेला एकटे कसे सोडावे म्हणून काही निष्ठावान क्रिकेटरसिकांनी आपली निष्ठा दर्शविण्यासाठी शेवटपर्यंत मदानावरचा ताबा सोडला नव्हता. पण ज्याची भीती होती ते अखेर घडलेच. या लढतीसाठी भरतीप्रमाणेच निळ्या उसळत्या लाटा जशा किनाऱ्यावरील भागावर ताबा मिळवतात, तसेच निळ्या भारतीय क्रिकेटरसिकांनी सिडनीवर कब्जा केला होता. पण पराभवाची ओहोटी येताच मिळवलेला ताबा किनाऱ्याला परत सोपवून हे निळे तुफान रातोरात गायब झाल्याचे जाणवले. सामना संपताच मदान आणि त्यानंतर काही तासांत सिडनी पुन्हा शांत झाले.  
ऑस्ट्रेलियातील भारतीय क्रिकेट समर्थकांनी (बऱ्याच!) भारताचा उपांत्य फेरीतला पराभव हळूहळू कबूल असल्याचे दर्शवून आपल्या परिपक्वतेचा परिचय दिला आहे. ‘‘सलग सात विश्वचषक सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला कधी तरी हरावे लागणारच होते आहे,’’ असे काहींचे म्हणणे होते. ‘‘ऑस्ट्रेलियातील बोर्डर-गावस्कर चषक आणि त्यानंतर तिरंगी एकदिवसीय स्पध्रेत कामगिरीच्या पाश्र्वभूमीवर भारत विश्वचषकात बाद फेरीत गाठेल, यावर बरेच प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यावर परदेशी वातावरण, कुटुंबापासून दुराव आणि अत्यंत लांबलचक दौरा या सर्व कारणांमुळे कामगिरीवर प्रभाव पडणे स्वाभाविक होते. अशा परिस्थितीतदेखील भारताने सात सामन्यांत प्रतिस्पध्र्याचे १० मोहोरे टिपले, हे कुठल्याही चमत्कारापेक्षा कमी नाही आणि हे अत्यंत समाधाकारक आहे,’’ असे स्टेडियममध्ये एका चाहत्याकडून ऐकले, तर ‘‘एक धागा सुखाचा अन् शंभर धागे दु:खाचे या जीवनातील सत्याप्रमाणे आठ धाग्यांत जर एक दु:खाचा निघाला तर काय गर आहे,’’ असे मत एका मेलबर्नहून आलेल्या मराठमोळ्या वृद्ध चाहत्याने व्यक्त केले. ‘‘डोंगर चढल्यावर फार काळ शिखरावर टिकणे शक्य नाही, खाली उतरणे गरजेचे आहे आणि भारतासाठी ती वेळ आली आहे,’’ असेही ते पुढे म्हणाले.
हृदय आणि मेंदूचा संघर्ष अजब आहे. हृदयाचे ऐकावे की मेंदूचे हा वाद खूप जुना आहे. भावना, मूल्य, प्रेम यांसारख्या गोष्टींबद्दल हृदयाचे ऐकावे आणि तर्क, युक्ती आणि आíथक बाबतीत मेंदूचे ऐकावे असा जाणकार सल्ला देतात. क्रिकेट म्हणजे भारतीयांचे निस्सीम प्रेम. बहुदा या संबंधित निर्णय आपण हृदयाने घेत असावे असे दिसते. कसोटी सामन्यांत मिळालेल्या पाहुणचाराची परतफेड आपण या सामन्यात नक्की करू आणि सात सामने जिंकलो, आता हाही जिंकू, असे हृदय सांगत होते. पण दोन्ही संघांची तुलना केली तर ऑस्ट्रेलियाचा संघ भारतापेक्षा नक्कीच अधिक बलवान आहे आणि त्यावरून ही स्पर्धा त्यांच्या अंगणात त्यांचा पराभव कसा करणार, हा तर्क मेंदू करीत होता. ‘दिल तो पागल है’ हे काय उगीच म्हणतात. मनातला हा सामना शेवटी हृदयानेच जिंकला आणि या वेडय़ा मनाच्या अपेक्षा वाढविल्या.
शुक्रवारची सकाळ झाली आणि या शहरात विश्वचषक उपांत्य फेरीचा सामना झाला असावा याचा अजिबात पत्ता लागला नाही. लोकांना काही तास काय घडले आणि त्याचे परिणाम पचविण्यास पूरक ठरले असावे. शुक्रवारी फार लोकांच्या चच्रेत पराभव नसून अनेकांच्या संभाषणात जिंकणे कठीणच होते असे ऐकायला मिळाले. ‘‘आपल्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीला बघायला जाण्याचे सोडून संघनायक धोनीने संघ आणि देशाला महत्त्व दिले. त्याला संपूर्ण विश्वचषकात तुम्ही डोक्यावर बसवता आणि एक सामना हरल्याबरोबरच टीका करता, हा कुठला न्याय झाला,’’ असा एका ऑसी क्रिकेटरसिकाने प्रश्न केला. अनुष्का शर्मा सामना बघायला आली म्हणून कोहली बाद झाला, यावरसुद्धा लोकांनी आपली मते प्रदर्शित केली.
भारतीय क्रिकेटरसिक हा थोडा अपरिपक्व आणि बराच भावनिक असतो. पराभव हा जीवनातील महत्त्वाचा घटक आहे, हे तो नेहमी विसरत असतो. खासकरून क्रिकेटच्या मदानावर. त्यावर प्रसारमाध्यमे त्यांच्या मागे दिवसरात्र लागलेली असतात. ज्यामुळे खेळावर लक्ष केंद्रित करणे कठीण ठरते. ‘लगान’च्या भुवनप्रमाणे कुठलेही मारक अस्त्र हाती नसताना धोनीने सामान्य युवा खेळाडूंना सोबत घेऊन उपांत्य फेरी गाठली आणि क्रिकेटरसिकांचे मनोरंजन केले, याबद्दल त्याचे आभारच मानायला हवेत. जलद आणि उसळत्या खेळपट्टीवर आपणही गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी करू शकतो याचा विश्वास धोनीने मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणेसारख्या युवा खेळाडूंना दिला आहे. खेळाडूंना शारीरिक स्वास्थ्यासोबत मानसिक तयारीचा मोठा हात आहे आणि या नवीन खेळाडूंना हा अनुभव प्रावीण्य मिळविण्यास मदत करील. धोनीच्या संघाने केलेल्या कामगिरीला सलाम करणे गरजेचे आहे आणि त्यांनी युवा खेळाडूंमध्ये केलेली ही गुंतवणूक भारताच्या क्रिकेट भवितव्यासाठी महत्त्वाची ठरेल, अशी आशा धरू या!