भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्धी असले तरी त्यांना एका जागी बसवणारा जिव्हाळा, लळा लावणारा एकमेव मार्ग २२ यार्डामधून जातो.. हा फक्त सामना नसतो, तर ते द्वंद्व असतं प्रत्येकाच्या मनामनातलं, जिथे फक्त विजयच हवा असतो. पराभवाचा ‘प’देखील शेवटच्या चेंडूपर्यंत निघत नसतो.. हाडवैर या शब्दाची अनुभूती देणारं, प्रत्येक चेंडूवर वाहवा किंवा शिव्यांची लाखोली वाहिली जाणारा असा हा सामना. अवघे क्रिकेट विश्व ज्याची आतुरतेने वाट पाहात आहे तो भारत आणि पाकिस्तान विश्वचषकातील यांचा पहिला सामना रविवारी रंगणार आहे. त्यामुळे उत्स्फूर्ततेचा सर्वोच्च बिंदू गाठणाऱ्या या सामन्यात जो संघ दडपण उत्तम पद्धतीने हाताळेल, त्यालाच विजयाची सर्वाधिक संधी असेल.
आतापर्यंत विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचे सर्व पाचही सामने भारताने जिंकलेले आहेत, त्यामुळे ध्वज विजयाचा उंच धरण्यासाठी भारतीय संघ सज्ज झालेला आहे. विश्वचषकापूर्वी झालेल्या तिरंगी मालिकेत भारताला एकही सामना जिंकता आलेला नसला तरी या सामन्यात पाकिस्तानसारखा संघ समोर आल्यावर मात्र भारतीय संघाने चांगलीच कंबर कसली आहे. रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे हे दोन्ही मुंबईकर चांगल्या फॉर्मात आहेत; पण शिखर धवन, विराट कोहली, कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांना अजूनही सूर गवसलेला नाही. त्यामुळे या सामन्यात भारताची फलंदाजी कशी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष असेल. भारतीय गोलंदाजी बोथट वाटत असली तरी त्यांनी आपली अस्त्रांना या सामन्यासाठी धार चढवलेली असेल.
आतापर्यंतच्या विश्वचषकातील पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी पाकिस्तानचा संघ प्रयत्नशील असेल. त्यांच्या संघाचा  विचार केला, तर त्यांची फलंदाजी ही गोलंदाजीपेक्षा दमदार आहे. कर्णधार मिसबाह उल हक,  युनिस खान, उमर अकमल, शाहिद आफ्रिदी असे दमदार फलंदाज त्यांच्या ताफ्यात आहेत. पाकिस्तानची गोलंदाजी ही अनुनभवी आहे; पण या नवख्या गोलंदाजांकडून आश्चर्यकारक कामगिरीही घडू शकते. गोलंदाजीमध्ये आफ्रिदीवर साऱ्यांची नजर असेल.
सध्याच्या घडीला दोन्ही संघांची फलंदाजी ही जमेची बाजू आहे, त्यमुळे दोन्ही संघ धावसंख्येचे आव्हान स्वीकारून प्रतिस्पर्धी संघाला प्रथम फलंदाजीला पाचारण करण्याची शक्यता आहे. धोनीचा चाणाक्षपणा पाकिस्तानच्या एकाही खेळाडूकडे दिसत नसून भारतासाठी ही जमेची बाजू असेल. पाकिस्तानसाठी आफ्रिदी हा हुकमी एक्का ठरू शकतो. दोन्ही संघांचा विचार केला, तर पाकिस्तानपेक्षा भारताचे पारडे वरचढ आहे; पण या थरारक सामन्यात कागदावरच्या नावांपेक्षा कामगिरीवरच सारे काही अवलंबून असते.

२००३ च्या विश्वचषकातील पाकिस्तानविरुद्धचा उपांत्य फेरीचा सामना हा अविस्मरणीय असाच आहे, माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम सामना होता तो. पण २०११ च्या विश्वचषकातील सामन्याचे फार मोठे दडपण माझ्यावर होते आणि ती भावना फारच वेगळी होती, ती भावना व्यक्त करता येणार नाही. पण यंदाच्या विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तानमधील सामन्याची उत्सुकता प्रेक्षकांना गेल्या वर्षभरापासून आहे.
-सचिन तेंडुलकर, भारताचा माजी महान क्रिकेटपटू

१९९२ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. मात्र या स्पर्धेतही पाकिस्तानला भारताविरुद्धचा सामना गमवावा लागला होता. विश्वचषक स्पर्धेत भारतासारख्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध आपण विजय मिळवू शकत नाही याचे दु:ख अद्याप पाकिस्तानच्या खेळाडूंना जाणवत आहे. भारत व पाकिस्तान हा सामना कोणत्याही अन्य सामन्यासारखा होत नसतो. उत्कंठाचे शिखरच या सामन्यात पाहावयास मिळते.
– अकिब जावेद, पाकिस्तानचा माजी गोलंदाज

सामना क्र. : ४   भारत वि. पाकिस्तान (ब-गट)
स्थळ : अ‍ॅडलेड क्रिकेट ग्राऊंड, अ‍ॅडलेड  ल्ल वेळ : सकाळी ९.०० वा.

लक्षवेधी खेळाडू
विराट कोहली (भारत) : भारतासाठी ‘धावांची मशीन’ ठरलेला फलंदाज म्हणजे विराट कोहली. आक्रमकतेबरोबरच संयतपणे फलंदाजी करत संघाला एकहाती सामना जिंकवून देण्याची कुवत कोहलीमध्ये आहे. मधल्या फळीत फलंदाजीला येऊन त्याने खेळपट्टीवर ठाण मांडला तर भारताचा विजय जवळपास निश्चित समजला जातो.
शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान) :  विश्वचषकात पाकिस्तानकडे असलेला सर्वात अनुभवी खेळाडू म्हणजे शाहिद आफ्रिदी. आपल्या घणाघाती फलंदाजीने गोलंदाजांची भंबेरी उडवणारा आणि जलद फिरकीच्या जोरावर फलंदाजांना चकवणारा आफ्रिदी हा पाकिस्तानचा आधारस्तंभ असेल.

बोलंदाजी
सामन्यांमध्ये दडपण आल्यावर शांतचित्त राहून त्या गोष्टीचा विचार करायचा असतो. माझ्या मते संघांतील खेळाडूंकडे चांगला अनुभव आहे. मोठय़ा संख्येने उपस्थित चाहत्यांपुढे कसा खेळ करावा आणि मोठय़ा सामन्यांमध्ये कशी कामगिरी करावी, या गोष्टींचा चांगलाच अनुभव संघाकडे आहे आणि त्याच गोष्टीचा फायदा आम्हाला नक्कीच होणार आहे. या सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आम्ही सज्ज झालो आहोत.
– महेंद्रसिंग धोनी  (भारत)

इतिहास हा बदलण्यासाठीच असतो, आयुष्यात काहीही स्थिरस्थावर असे नसते आणि या गोष्टीवर माझा विश्वास असून हेच डोक्यात ठेवून आम्ही मैदानात उतरणार आहोत. हे सारं अवघड आहे किंवा नाही हे मला माहिती नाही, पण कोणतीही गोष्ट अशक्यप्राय नक्कीच नसते.
– मिसबाह उल हक (पाकिस्तान)

आमने सामने
सामने १२६ – भारत : ५० ’ पाकिस्तान : ७२ ’ टाय / रद्द : ४

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी.
पाकिस्तान : मिसबाह उल हक (कर्णधार), अहमद शेहझाद, नसीर जमशेद, सर्फराझ अहमद, युनिस खान, हरिस सोहेल, उमर अकमल, शोएब मकसूद, शाहीद आफ्रिदी, यासिर शाह, मोहम्मद इरफान, एहसान अदिल, सोहेल खान, वहाब रियाझ.