भारत व पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट लढतीबाबत कोटय़वधी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता असते, मात्र या दोन संघांमध्ये अ‍ॅडलेडला रविवारी होणाऱ्या विश्वचषक लढतीबाबत अद्यापही फारसे उत्साहाचे वातावरण दिसून येत नाही.
भारताचे विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे गुरुवारी सकाळी धावण्याचा व्यायाम करण्यासाठी त्यांच्या हॉटेलमधून अ‍ॅडलेड ओव्हल मैदानावर चालत गेले. मात्र त्यांच्याकडे रस्त्यावरील कोणत्याही माणसाने लक्ष दिले नाही. विराट हा अतिशय लोकप्रिय खेळाडू असूनही जेव्हा तो पुन्हा रस्त्याने सराव सत्रासाठी मैदानावर गेला, तेव्हाही त्याच्यासह भारताच्या खेळाडूंकडे लोकांनी औत्सुक्याने पाहिले नाही. स्टेडियमच्या दरवाजापाशीही कोणताही चाहता उपस्थित नव्हता. भारतात रणजी सामन्यांच्या वेळीही चाहत्यांचा भरपूर प्रतिसाद मिळत असतो.
अ‍ॅडलेडमधील स्टेडियमवर ५३ हजार ५०० क्रिकेटरसिकांची क्षमता आहे. मात्र प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो, हीच उत्सुकता आहे. बेन्सन अँड हेजेस चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात येथे भारताने पाकिस्तानला हरवले होते, त्या वेळी फक्त पाच हजार प्रेक्षक उपस्थित होते. १९९२मध्ये भारत व पाकिस्तान यांच्यात सिडनीला विश्वचषक स्पर्धेचा सामना झाला होता. त्या वेळीही प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.