वाकाच्या वेगवान खेळपट्टीवर संयुक्त अरब अमिराती आणि वेस्ट इंडिजवर मिळवलेल्या विजयांमध्ये बरीच तफावत आहे. अमिरातीकडे चांगले फलंदाज आणि गोलंदाज नव्हते; पण वेस्ट इंडिजकडे चांगला भेदक मारा wc11होता आणि त्यापुढेच भारतीय फलंदाजी कोलमडली. ही परीक्षा आपण कशीबशी उत्तीर्ण झालो, हे मात्र वास्तव आहे. प्रत्येक वेळी पराभवातूनच शिकले पाहिजे असे नाही, तर या विजयातून भारताला शिकण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत.
भारताचा वेगवान मारा
विश्वचषकापूर्वी भारताचा मारा स्वैर वाटत होता. विश्वचषकामध्ये या गोलंदाजीची कत्तल होईल, असेही म्हटले गेले. वाकाची खेळपट्टी सर्वात वेगवान, पण तिथे आपले गोलंदाज दिवस गाजवतील, अशी सुतराम शक्यता नव्हती. वाकावरच्या पहिल्या सामन्यात आर. अश्विनची फिरकी चालली, पण या सामन्यात वेगवान मारा प्रभावी वाटला. उमेश यादवने गेल्या सामन्यासारखाच या वेळीही वेगवान मारा केला. मोहम्मद शमीचे कौतुक करावेच लागेल. त्याने दाखवलेला वेग नक्कीच वाखाणण्याजोगा होता. उसळणाऱ्या चेंडूंसोबत तो चांगले स्विंगही करत होता. ज्या पद्धतीने त्याने ख्रिस गेलसाठी सापळा रचला, तो लाजवाबच होता, कारण तोच एक मोठा खेळाडू त्यांच्या संघात होता. त्याचे तीन झेल भारतीय क्षेत्ररक्षकांकडून सुटले. शमीने शोएब अख्तरच्या सांगण्यावरून धावण्यामध्ये केलेला बदल पथ्यावर पडला. त्याची गोलंदाजी अधिक वेगवान, भेदक आणि अचूक झाली. योग्य टप्पा आणि दिशा त्याच्याकडे होतीच. शमीने ज्या पद्धतीने स्विंग आणि उसळत्या चेंडूंचे मिश्रण केले त्याला तोड नव्हती. त्याने गेलला उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू टाकून हैराण केले. मग त्याला उसळते चेंडू टाकून फ्रंटफूटवर येऊ दिले नाही आणि त्यानंतर एक उसळता चेंडू टाकत त्याला तंबूची वाट दाखवली. मोहित शर्माही प्रभावी ठरला, पण नायक मात्र शमीच ठरला. अश्विन या वेळी अधिक जलद व फलंदाजांच्या भोवती अधिक चेंडू टाकायला गेला आणि तिथेच तो फसला, पण जडेजाने मात्र एकाच टप्प्यावर चेंडू टाकत चांगला मारा केला.
होल्डरची फटकेबाजी
एके काळी ‘वेगवान माऱ्याचे बादशाह’ असलेल्या वेस्ट इंडिजची आपण ७ बाद ८५ अशी दयनीय स्थिती केली होती, तिथून ते फार फार तर सव्वाशे धावा गाठतील असे भाकीत वर्तवण्यात येत होते, पण होल्डरने दमदार अर्धशतक झळकावत संघाला १८२ धावा फटकावून दिल्या. सात बळी मिळवल्यानंतर भारतीय गोलंदाज थोडे सुस्तावलेले वाटले. ऑस्ट्रेलिया किंवा द. आफ्रिकेकडे बघितले तर ते शेपूट गुंडाळताना अधिक आक्रमक होतात, तसे भारतीय गोलंदाज दिसले नाहीत किंवा तेव्हा त्यांची देहबोलीसुद्धा थकल्यासारखी जाणवत होती; पण जर अशीच संधी आपण ऑस्ट्रेलियासारख्या संघाला दिली असती, तर धावसंख्या दोनशेच्या पार गेली असती आणि आपल्याला कदाचित पराभवही दिसला असता.
भारतीय फलंदाजांची दाणादाण
वेगवान खेळपट्टीवर भेदक गोलंदाजीला सामोरे जाण्यासाठी भारतीय संघ परंपरेनुसार अजूनही सज्ज नाही, हे या सामन्यातून दिसले. सुरुवातीची काही षटके संयमपणे खेळून काढत त्यांनी डाव पुढे न्यायला हवा होता, पण तसे झाले नाही. शिखर धवन, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांना चेंडू कळले नाहीत. विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांना चेंडू पूल करायचा मोह आवरला नाही. परिस्थिती नेमकी काय आणि कधी जोखीम घ्यावी हे त्यांना अजूनही कळलेले दिसत नाही. रैनाला फटके मारण्याची गरज नव्हती. एकंदरीत समोर अनुभवी भेदक मारा असला असता तर भारताला ही धावसंख्या ओलांडणे जमलेही नसते. ट्वेन्टी-२०च्या आवेगातून आपण बाहेर आलेलो आहोत का, हे पुन्हा चाचपडून पाहायला हवे.
शांतचित्त धोनी
धोनी हा चांगल्या फॉर्मात नाही, पण त्याच्याकडे मैदानावर तग धरून खेळण्याची तयारी आहे, हेच या सामन्यात दिसले. त्याने सुरुवातीला शांतचित्ताने फलंदाजी केली. त्याने मारलेले मोठे फटके अचूक नव्हते. ते हवेत उडाले होते, पण तो नशीबवान ठरला एवढेच. तो जर बाद झाला असता तर भारताला पराभवाचा पहिला धक्का बसला असता. वेस्ट इंडिजचे हे दुर्दैव.
विंडीजच्या जागी अन्य दिग्गज संघ असता तर सामन्याचे चित्र वेगळे असू शकले असते. होल्डरकडे अनुभवाची कमतरता आहे. त्यामुळे त्याने ड्वेन स्मिथ आणि मार्लन सॅम्युअल्सला गोलंदाजी दिली, पण अनुभवी डॅरेन सॅमीला एकही षटक दिले नाही. भारताच्या उधळलेल्या वारूला विजयपथावर मार्गक्रमण करताना हा धडा मिळण्याची नितांत आवश्यकता होती. यामधून जर शिकलो नाही तर बाद फेरीतील मार्ग कठीण असेल.