News Flash

विजयाचे रंग कोण उधळणार?

ऐन रंगपंचमीच्या दिवशी विविध रंगांची उधळण होत असताना विजयाचे रंग कोण उधळणार, याकडेच क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेले असेल.

| March 5, 2015 09:03 am

भारत-वेस्ट इंडिज शुक्रवारी आमनेसामने
ऐन रंगपंचमीच्या दिवशी विविध रंगांची उधळण होत असताना विजयाचे रंग कोण उधळणार, याकडेच क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेले असेल. वाकाच्या वेगवान खेळपट्टीवर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. या सामन्यात विजयासह भारतीय संघ विजयाची मालिका कायम राखणार की वेस्ट इंडिज भारताला नमवत मोठा धक्का देतात का, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. त्याचबरोबर ख्रिस गेल आणि वेस्ट इंडिजचा वेगवान मारा रंगात येतो की भारताची फलंदाजी आणि फिरकी गोलंदाजी रंग दाखवणार का, हे पाहण्यासाठी चाहते आसूसलेले आहेत.
भारताची फलंदाजी आणि गोलंदाजी सध्याच्या घडीला अनपेक्षित रंग उधळत आहे. सलामीवीर शिखर धवन आणि विराट कोहली यांनी आतापर्यंत चांगले सातत्य दाखवले आहे. रोहित शर्मालाही सूर गवसलेला दिसत आहे. अजिंक्य रहाणे आणि सुरेश रैना यांनी आपल्याला मिळालेल्या एकमेव संधीचे सोने केले आहे. पण कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांना अजूनही सूर गवसलेला नाही. गोलंदाजीमध्ये आर. अश्विन हे भारताचे मुख्य अस्त्र ठरत असून गेलचा काटा दूर करण्यासाठी धोनी त्याचा चाणाक्षपणे वापर करू शकतो. गेलला जर लवकर बाद करायचे असेल तर त्याच्याकडे भुवनेश्वर हा चांगला पर्याय असेल, पण तो अपयशी ठरल्यावर अश्विनकडे ती जबाबदारी येईल. मोहम्मद शमी तंदुरुस्त होऊन या सामन्यात खेळणार असल्याची दाट शक्यता आहे. पण तो संघात आल्यावर कोणाला वगळायचे, हा देखील धोनीपुढे प्रश्न असेल. कारण वेगवान गोलंदाज उमेश यादव आणि मोहित शर्मा यांनी आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. गेल्या सामन्यात वाकाच्या खेळपट्टीवर उमेशने भेदक मारा केला होता, त्यामुळे त्याला संघात कायम ठेवता येईल. त्यामुळे मोहित, भुवनेश्वर आणि शमी यांच्यापैकी एकाला कदाचित धोनीला वगळावे लागेल. या तिघांनाही खेळवायचे झाल्यास रवींद्र जडेजाला धोनी वगळेल का, हा मोठा प्रश्न आहे.
गेलची जादू भारताविरुद्धही चालणार का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण आयपीएल सुरू झाल्यानंतर गेलला भारताविरुद्ध चांगली कामगिरी करता आलेली नाही. मार्लन सॅम्युअल्स, दिनेश रामदिन, लेंडल सिमन्स यांच्यावर फलंदाजीची मदार असेल. खेळपट्टीही वेस्ट इंडिजच्या भेदक माऱ्याला साजेशी असली तरी ते याचा किती फायदा उचलतात, हे पाहावे लागेल. जेरॉम टेलर, डॅरेन सॅमी यांच्याकडे गोलंदाजीचा चांगला अनुभव आहे, त्यामुळे ते भारताला सुरुवातीला किती धक्के देतात, हे वेस्ट इंडिजसाठी महत्त्वाचे असेल. दुसरीकडे सुलेमान बेन आणि गेल यांची फिरकी भारताला सतावील का, हे पाहावे लागेल.
दोन्ही संघांचा विचार करता वेस्ट इंडिजपेक्षा भारताचेच पारडे जड दिसत आहे. कारण ते भन्नाट फॉर्मात असून आतापर्यंत सर्व आघाडय़ांवर त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. दुसरीकडे वेस्ट इंडिजच्या कामगिरीमध्ये एकजूट आणि सातत्य दिसत नाही. त्यामुळे भारताला हा सामना जिंकण्याची संधी अधिक असल्याचे म्हटले जात आहे.

सामना क्र. : २८
भारत वि. वेस्ट इंडिज (ब-गट)
स्थळ : पर्थ ल्ल वेळ : शुक्रवारी दु. १२.००

संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, सुरेश रैना, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, मोहित शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, स्टुअर्ट बिन्नी.
वेस्ट इंडिज : जेसन होल्डर (कर्णधार), दिनेश रामदीन (यष्टीरक्षक), मार्लन सॅम्युअल्स, सुलेमान बेन, जॉन्सन चार्ल्स, जोनाथन कार्टर, शेल्डन कॉट्रेल, ख्रिस गेल, निकिता मिलर, केमार रोच, आंद्रे रसेल, डॅरेन सॅमी, लेंडल सिमन्स, ड्वेन स्मिथ, जेरॉम टेलर.

थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2015 9:03 am

Web Title: india vs west indies match preview
Next Stories
1 चक्रव्यूहात चोकर्स
2 क्रिकेटेन्मेंट :मौका.. मौका..!
3 ऑस्ट्रेलियातून.. : ऑस्ट्रेलियात धुमशान
Just Now!
X