१३ जून २००६ हा दिवस आर्यलडच्या क्रिकेट इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. कारण आर्यलडच्या संघानं या दिवशी बाळसं धरलं. रांगत्या पावलांनी ते आपला पहिला एकदिवसीय सामना खेळले. इंग्लिश संघाला त्यांनी तोडीस तोड टक्कर देत समस्त जागतिक क्रिकेटला एक प्रकारे आपल्या आगमनाचा जणू wc09इशाराच दिला होता. पहिलाच सामना असल्यानं आर्यलड संघातील ११ जणांनीही पदार्पण साजरं केलं. परंतु इंग्लिश संघातीलसुद्धा तिघांचा तो पहिलावहिला सामना होता. म्हणजेच हा एकदिवसीय सामना खेळणाऱ्या २२ पैकी १४ जणांनी आपल्या कारकिर्दीला त्याच ऐतिहासिक दिनी प्रारंभ केला. हा दिवस आर्यलडमधील डब्लिन शहरात राहणाऱ्या जॉयस कुटुंबीयांसाठी सुखद आनंद देणारा होता. कारण डॉमिनिक आणि एड अशा दोन भावंडांनी या दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या दोघांनीही दोन स्वतंत्र देशांकडून पदार्पण केलं होतं. दुर्दैवानं ते दोन्ही सलामीवीर पहिल्या सामन्यात अपयशी ठरले होते. इंग्लंडकडून खेळणाऱ्या एडला जेमतेम १० धावा काढता आल्या, तर डॉमिनिकला भोपळाही फोडता आला नव्हता.
जॉयस कुटुंबीयांच्या क्रिकेट हे नसानसांत भिनलेलं. एडचे वडील ख्रिस्टोफर आणि काकासुद्धा क्रिकेट खेळायचे. एडला चार भाऊ आणि चार बहिणी. या आठ जणांपैकी पाच जणांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भाऊ गस आणि डॉमिनिकप्रमाणे आयसोबेल आणि सिसिलिया या जुळ्या बहिणींनीही आर्यलडकडून खेळण्याचा मान मिळवला आहे. त्यांचा मोठा भाऊ जॉन यानं मात्र बुद्धिबळाची वाट पकडली. सध्या तो आर्यलडमधील सर्वोत्तम २० बुद्धिबळपटूंमध्ये गणला जातो. इतकंच कशाला, एडची आई मॉरिन ही अधिकृत क्रिकेट गुणलेखक. त्याच्या काकाच्या मुलांनाही क्रिकेट आवडायचं. त्यामुळे जॉयस इलेव्हन हा एक कौटुंबिक संघच डब्लिनमध्ये हौसेने सामने खेळायचा. त्यांचा तसा दराराही होता.
एडमंड ख्रिस्टोफर जॉयस हे त्याचं पूर्ण नाव. ‘जॉयसी’, ‘स्पड’ आणि ‘पिसी’ ही त्याची टोपणनावं. अराव्होन शाळेत शिकत असतानाच क्रिकेट खेळण्याचा आणि पाहण्याचा छंद त्याला लागला. अ‍ॅशेस क्रिकेट सामने त्याला तोंडपाठ असायचे. मग घरातून क्रिकेट प्रशिक्षणाचे धडे त्याला मिळतच होते. नंतर प्रेझेंटेशन कॉलेज आणि ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकताना त्याच्या खेळाला आणखी झळाळी मिळाली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर येण्यासाठी आर्यलड झगडत असताना २००१मध्ये एडनं आर्यलडऐवजी इंग्लंडकडून खेळण्याचा निर्णय घेतला. कारण कसोटी क्रिकेट खेळण्याची त्याची महत्त्वाकांक्षा होती. नोव्हेंबर २००६मध्ये मानसिक तणावाच्या कारणामुळे मार्कस ट्रेस्कोथिकनं माघार घेतल्याचं निमित्त झालं आणि इंग्लंडचे निवड समिती अध्यक्ष डेव्हिड ग्रॅव्हनी यांनी एडला अ‍ॅशेस मालिकेसाठी कसोटी संघात स्थान दिलं. ओवेस शाह आणि रॉबर्ट की यांच्यासारखे अनुभवी खेळाडू उपलब्ध असताना एडची केलेली निवड मात्र वादग्रस्त ठरली. कारण तोवर फक्त तीन एकदिवसीय आणि एकमेव ट्वेन्टी-२० सामना त्याच्या खात्यावर जमा होता. दुर्दैवानं ड्रेसिंगरूममध्ये बसून फक्त ऑस्ट्रेलियावारी करणं इतकंच त्याच्या नशिबात होतं. मग केव्हिन पीटरसनला दुखापत झाल्यामुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये एडनं मिळालेल्या संधीचं सोनं केलं. सातत्यपूर्ण कामगिरीच्या बळावर एडनं २००७च्या विश्वचषकात इंग्लंडचं प्रतिनिधित्वही केलं. परंतु इंग्लिश क्रिकेटमध्ये २००६ ते २०१० अशी चार वष्रे घालवूनसुद्धा कसोटी क्रिकेटचं स्वप्न मात्र सारखं वाकुल्या दाखवत होतं.
अखेर मार्च २०१०मध्ये एडनं आपल्या देशाकडून म्हणजेच आर्यलडकडून खेळण्याचा निर्णय घेतला. कारण २००७च्या विश्वचषकात पाकिस्तान, बांगलादेशला हरवण्याची आणि झिम्बाब्वेला बरोबरीत रोखण्याची किमया साधणाऱ्या आर्यलडचं क्रिकेट आपला दबदबा निर्माण करीत होतं. २०११च्या विश्वचषकात आयसीसीनं एडला आर्यलडकडून खेळण्याची परवानगी दिली. या ‘धक्का’तंत्रासाठी ओळखल्या जाणाऱ्या आर्यलडनं या वेळी इंग्लंड आणि नेदरलँड्सला हरवलं. यंदाही हा संघ मजल-दरमजल करीत उपांत्यपूर्व फेरीकडे वाटचाल करीत आहे. वेस्ट इंडिज, संयुक्त अरब अमिराती आणि झिम्बाब्वेसारख्या संघांना त्यांनी धूळ चारत अपेक्षा उंचावल्या आहेत. आयरिश क्रिकेटची दिमाखात सुरू असलेली वाटचाल या सहसदस्य राष्ट्राला लवकरच पूर्ण सदस्याचा दर्जा मिळवून देऊ शकेल. त्यामुळे त्यांना दर्जेदार कसोटी क्रिकेटही खेळता येईल आणि यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ३६ वर्षांच्या अनुभवी एडचं कसोटी क्रिकेट खेळण्याचं स्वप्न साकारू शकेल!