वेस्ट इंडिजला पराभवाचा धक्का दिल्यानंतर आर्यलडच्या संघासमोर आता तुलनेने सोपे असे संयुक्त अरब अमिरातीचे आव्हान आहे. वेस्ट इंडिजसारख्या बलाढय़ संघाविरुद्ध तीनशे धावांचा सहज पाठलाग करणाऱ्या आर्यलड संघाकडून चाहत्यांच्या मोठय़ा अपेक्षा आहेत. पॉल स्टर्लिग, नील ओ’ब्रायन, एड जोयस आणि विल्यम पोर्टरफील्ड या चौकडीवर फलंदाजीची भिस्त आहे. केव्हिन ओ’ब्रायनचा झंझावाती खेळ अमिरातीसाठी डोकेदुखी ठरू शकते. अष्टपैलू अँड्रय़ू बलर्बिनी आर्यलडसाठी जमेची बाजू आहे. जॉर्ज डॉकरेल, अ‍ॅलेक्स क्युसॅक, जॉन मूनी या त्रिकुटावर गोलंदाजीची जबाबदारी आहे.
संयुक्त अरब अमिरातीकडे खुर्रम खान हा अनुभवी फलंदाज आहे. स्वप्निल पाटील आणि कृष्णा चंद्रन या भारतीय खेळाडूंकडून अमिरातीला मोठय़ा अपेक्षा आहेत. टिच्चून मारा करीत बळी घेणारे फिरकीपटू हे अमिरातीचे वैशिष्टय़ आहे. झिम्बाब्वेविरुद्ध अमिरातीने शानदार खेळ केला होता. आयसीसी आंतरखंड स्पर्धामध्ये अमिरातीने आर्यलडचा अनेकदा सामना केला आहे. त्या स्पर्धामध्ये झालेल्या पराभवाचा वचपा काढण्याची संधी त्यांना आहे.
विश्वचषक स्पर्धेत नेहमीच बडय़ा संघांना धक्का देण्याची किमया करणाऱ्या आर्यलडला अमिरातीच्या रूपात सहज विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरी गाठण्याच्या दृष्टीने सुरेख संधी आहे.

सामना क्र. : १६   आर्यलड वि. अमिराती
स्थळ : गाबा, ब्रिस्बेन  ल्ल वेळ : सकाळी ९.००

संघ
आर्यलड : विल्यम पोर्टरफील्ड (कर्णधार), अँड्रय़ू बलर्बिनी, पीटर चेस, अ‍ॅलेक्स क्युसॅक, जॉर्ज डॉकरेल, एड जोयस, अँड्रयू मॅकब्राइन, जॉन मूनी, केव्हिन ओब्रायन, निल ओब्रायन, मॅक्स सोरेनसेन, पॉल स्टर्र्िलग, स्टुअर्ट थॉम्पसन, गॅरी विल्यन, क्रेग यंग.  
अमिराती : मोहम्मद तौकीर (कर्णधार), खुर्रम खान, अमजद अली, अमजद जावेद, अँड्री बर्नगर, फहाद अल्हासमी, मंजुला गुरुगे, कामरान शाहझाद, कृष्णा चंद्रन, मोहम्मद नावीद, नासिर अझीझ, स्वप्नील पाटील, रोहन मुस्तफा, साकलेन हैदर, शैमान अन्वर.

थेट प्रक्षेपण
सर्व स्टार स्पोर्ट्स वाहिन्यांवर