सहा चेंडू आणि सात धावा झिम्बाब्वेला विजयासाठी हव्या होत्या.. फक्त दोन चेंडूंवर सामन्याचा निकाल लागू शकतो अशी रोमहर्षक परिस्थिती.. तर दुसरीकडे दोन बळी मिळवल्यावर आर्यलडच्या पदरी विजय पडला असता.. सर्वच ठिकाणी भाकितांना पेव फुटले होते.. पण नक्की कोण सामना जिंकेल, यावर कोणीही ठाम नव्हते.. कारण आर्यलडच्या ३३२ धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेचा संघ ४९ षटकांमध्ये ८ पलंदाज wc05गमावून ३२५ धावांवर येऊन ठेपला होता.. बेधडक फलंदाजी करत रेगिस चकाब्व्हा आणि तवांडा मुपारिव्हा हे दोघेही खेळपट्टीवर होते.. अनुभवी अॅलेक कुसॅकवर अखेरचे षटक टाकण्याची जबाबदारी होती.. पहिला चेंडू मंदगतीने टाकत त्याने चकाब्व्हाला त्रिफळाचीत केले.. आर्यलड विजयापासून एक बळी लांब होता.. दुसऱ्या चेंडूवर एक धाव गेली आणि ६ चेंडूंत १८ धावा करणारा मुपारिव्हा फलंदाजीला आला.. कुसॅकने पुन्हा एकदा संथ चेंडू टाकला त्यावर मोठा फटका मुपारिव्हाने मारला खरा, पण तो क्षेत्ररक्षकाच्या हातात बसला आणि आर्यलडने पाच धावांनी थरारक विजय मिळवला. या विजयासह आर्यलडने सहा गुणांसह ‘अ’ गटामध्ये चौथे स्थान पटकावले आहे.
 एड जॉइस आणि अँडी बालबिर्नीच्या दमदार खेळींच्या जोरावर आर्यलडने ३३१ धावा फटकावल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची ४ बाद ७४ अशी अवस्था होती, पण त्यानंतर कर्णधार ब्रेंडन टेलर आणि शॉन विल्यम्स यांनी पाचव्या विकेटसाठी १४९ धावांची भागीदारी रचत संघाला विजयाचे स्वप्न दाखवले. पण मोठा फटका मारण्याच्या नादात टेलर बाद झाला, त्याने ९१ चेंडूंत ११ चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर १२१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारली. टेलर बाद झाल्यावर विल्यम्सने सर्व सूत्रे आपल्या हातात घेत झिम्बाब्वेसाठी विजयाचा मार्ग बनवायला सुरुवात केली. पण सीमारेषेवर त्याला अप्रतिम झेल जॉन मूनीने पकडला आणि विल्यम्सला माघारी परतावे लागले. विल्यम्सने ७ चौकार आणि २ षटाकारांच्या जोरावर ९६ धावांची खेळी साकारली.

संक्षिप्त धावफलक
आर्यलड : ५० षटकांत ८ बाद ३३१ (ई डी जॉइस ११२, अँडी बालबिर्नी ९७; तेंदाई चटारा ३/६१) विजयी वि. झिम्बाब्वे : ४९.३ षटकांत सर्व बाद ३२६ (ब्रेंडन टेलर १२१, शॉन विल्यम्स ९६; अॅलेक्स कुसॅक ४/३२)
सामनावीर : ईडी जॉइस.

सामना थरारकच झाला, पण खेळाडूंनी अंतिम क्षणापर्यंत धीर सोडला नाही आणि त्यामुळेच आम्ही हा सामना जिंकू शकलो.
—–

*४ ईडी जॉइसने शनिवारी आर्यलडकडून विश्वचषकातले चौथे शतक झळकावले. यापूर्वी जर्मी ब्रे, केव्हिन ओब्रायन आणि पॉल स्टर्लिग यांनी विश्वचषकात शतके झळकावली आहेत.

*७ कर्णधार ब्रेंडन टेलरने झिम्बाब्वेतर्फे सर्वाधिक शतक झळकावण्याचा विक्रम. टेलरचे हे कारकिर्दीतील सातवे शतक ठरले असून यापूर्वी माजी कर्णधार अॅलिस्टर कॅम्पबेलने सात शतके झळकावली होती.

अव्वल फलंदाज
१. ए बी डी’व्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका ) : ३१८  धावा
२. हशिम अमला (दक्षिण आफ्रिका) : २९५ धावा
३. ब्रेंडन टेलर  (झिम्बाब्वे ) : २९५ धावा

अव्वल गोलंदाज
१. टिम साऊदी (न्यूझीलंड) : १३ बळी
२. मॉर्नी मॉर्केल, जोश डॅव्हे, जेरॉम टेलर, वहाब रियाझ ११ बळी
३. मिचेल स्टार्क, ट्रेंट बोल्ट, इम्रान ताहीर, तेंदई चटारा १० बळी