भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज इशांत शर्माला गुडघ्याला झालेल्या दुखापतीमुळे विश्वचषक क्रिकेट स्पध्रेतून माघार घ्यावी लागत आहे. भारताच्या चार दुखापतग्रस्त खेळाडूंपैकी इशांत तंदुरुस्ती चाचणीत अपयशी ठरला आहे.

इशांत शर्मा, रोहित शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा या चौघांची तंदुरुस्ती चाचणी घेण्यात आली. यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी येथे अखेरचा कसोटी सामना खेळलेल्या इशांतला शारीरिक तंदुरुस्ती सिद्ध करण्यात अपयश आले.
‘‘इशांतने माघार घेतली असून विश्वचषकापर्यंत तो तंदुरुस्त होऊ शकणार नाही, हे निश्चित आहे. नियमानुसार राखीव खेळाडू मोहित शर्माचा भारताच्या विश्वचषकाच्या संघात समावेश करण्यात आला आहे. इशांत मायदेशी परतण्याची शक्यता आहे,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
रोहित शर्मा मांडीचा स्नायू, भुवनेश्वर कुमार पायाचा घोटा आणि रवींद्र जडेजा खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त होते, परंतु तंदुरुस्ती चाचणी उत्तीर्ण होण्यात त्यांना कोणतीही अडचण आली नाही. आता ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्याविरुद्ध सराव सामन्यात ते खेळू शकतील.
इशांतच्या माघारीबाबत आणि त्याच्याऐवजी बदली खेळाडूची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.