चार महिन्यांच्या खडतर ऑस्ट्रेलियन दौऱ्यात भारतीय संघाच्या पदरी निराशा पडली. विश्वचषकापूर्वी आयोजित सराव सामन्यातही भारतीय संघाची पराभवाची मालिका खंडित झाली नाही. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानविरुद्धच्या सलामीच्या लढतीसाठी संघाला विजय मिळवून देऊ शकतील अशा ११ खेळाडूंसह संघबांधणी करण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आतूर आहे.
सराव सामन्यातील पराभवाविषयी विचारले असता धोनी म्हणाला, ‘‘सातत्याने पराभव स्वीकारणे कठीण आहे. फलंदाज चांगली कामगिरी करतात, तेव्हा गोलंदाज अपयशी ठरतात. गोलंदाज चमकतात, तेव्हा फलंदाज खेळ उंचावू शकत नाहीत. सर्व आघाडय़ा मिळून एकत्रित चांगली कामगिरी होणे आवश्यक आहे. सलामीच्या लढतीपूर्वी आमच्या हातात आणखी एक सराव सामना आहे. त्याद्वारे अंतिम संघ कसा असेल हे ठरवता येईल.’’
‘‘खेळाडूंच्या उपयुक्ततेवर बरेच काही अवलंबून आहे. आमच्या फिरकीपटूंनी खेळपट्टीवर चेंडूला मिळणाऱ्या उसळीचा फायदा उचलायला हवा. विश्वचषक मोठी स्पर्धा आहे,’’ असे धोनीने पुढे सांगितले.
विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा आणि त्यात देखील पाकिस्तानसोबत पहिला सामना असल्याने या सामन्यात विजय मिळाला तर, पुढील सर्व गणिते हाताळण्यास सोपे होईल, असेही धोनी म्हणाला. पाकविरुद्धच्या सामन्यासाठी खेळाडूंच्या उपयुक्ततेवर अंतिम अकरा जणांचा दमदार संघ मैदानावर उभा करता येईल अशी आशा असल्याचेही तो म्हणाला.