भारताने पाकिस्तानविरुद्धचा सामना जिंकला असून त्यांचे मनोबल कमालीचे उंचावलेले असेल. पण दमदार फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका भारतीय संघाला पराभूत करील, असे भाकीत आपल्या अफलातून क्षेत्ररक्षणाने क्रिकेटला नवा आयाम देणारा दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेटपटू जाँटी ऱ्होड्सने भारताविरुद्धच्या सामन्याबाबत वर्तवले आहे.
‘‘गेल्या काही दिवसांतील भारतीय संघाची कामगिरी जर आपण पाहिली तर त्यांच्यामध्ये सुधारणा दिसून येते, त्याचबरोबर विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात त्यांनी पाकिस्तानला पराभूत केले असले तरी त्यांच्यापेक्षा मला दक्षिण आफ्रिकेचा संघ वरचढ वाटतो आणि या सामन्यात तेच बाजी मारतील,’’ असे जाँटी म्हणाला.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजी हा प्रमुख मुद्दा असेल आणि दोन्ही संघांमध्ये भारतापेक्षा दक्षिण आफ्रिकेची गोलंदाजी नक्कीच अधिक भेदक आहे, असे जाँटीला वाटते. याबाबत तो म्हणाला की, ‘‘दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीवर नजर टाकली तर ते सामना का जिंकू शकतात, याचे उत्तर मिळू शकेल. कारण त्यांच्याकडे डेल स्टेन, मॉर्ने मॉर्केल, वेन पार्नेल आणि व्हेरनॉन फिलँडरसारखे विविध शैलीचे गोलंदाज आहेत. त्यामुळे भारतीय संघ गोलंदाजीच्या बाबतीत पिछाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजीची आपण ऑस्ट्रेलियाशी तुलना करू शकतो.’’
तो पुढे म्हणाला की, ‘‘भारताला या सामन्यात आघाडी घ्यायची असेल तर भारताचे सलामीवीर स्टेनचा सामना कसा करतात, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. त्यामुळे भारताची सलामी चांगली झाली तर त्यांना मोठी धावसंख्या उभारता येऊ शकते.’’

भारतीय वेगवान गोलंदाजीने मला प्रभावित केलेले नाही. भारताकडे उमेश यादव हा एकमेव वेगवान गोलंदाज आहे. त्यामुळे भारत विश्वचषक आपल्याकडे कायम ठेवेल, असे मला वाटत नाही. या विश्वचषकासाठी मी दक्षिण आफ्रिकेला पसंती देईन, कारण त्यांच्याकडे डेल स्टेनसारखा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज व ए बी डी’व्हिलियर्ससारखा तडाखेबंद फलंदाज आहे. त्यामुळे हा विश्वचषक दक्षिण आफ्रिका जिंकेल, असे वाटते
– रॉडनी मार्श, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू