आकडेवारी कधी कधी किती फसवी, किती फसगत करू पाहणारी असू शकते. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व वेस्ट इंडिज (अन् संयुक्त अरब अमिराती!) अशा कसोटी दर्जाच्या संघांशी झालेल्या सामन्यात न दिसलेलं चित्र, हॅमिल्टनमधील सेडन पार्कचा धावफलक दाखवत होता. प्रतिपक्षाची सलामीची जोडी फोडण्यात wclogoभारतीय तेज त्रिमूर्ती प्रथमच अपेशी ठरत होती. गेल्या २० वर्षांतील सर्वोत्तम तेज त्रिमूर्ती म्हणून त्यांना दस्तुरखुद्द कपिल देव निखंज गौरवत होते, त्यांच्याबदली जाडेजा व अश्विन या उरल्यासुरल्या गोलंदाजांना आणलं जात होतं!
पॉवर प्लेच्या पहिल्या दहा षटकांत भारतीय गोलंदाजांची याआधीच्या चार सामन्यांतील कामगिरी काय होती? अ‍ॅडलेडला पाकिस्तान १ बाद ४६. मग मेलबर्नला दक्षिण आफ्रिका १ बाद ३८. पर्थच्या खेळपट्टीवर वेस्ट इंडिज तर ४ बाद ३८! (दरम्यान, अमिराती २ बाद २८) आणि आता केवळ अमिरातीपेक्षा सरस असलेले आर्यलड, न्यूझीलंडमधील हॅमिल्टन शहरातील सेडन पार्कमध्ये बिनबाद ६०. कर्णधार विल्यम पॉर्टरफिल्ड व पॉल स्टर्लिग यांनी उमेश यादवला लक्ष्य केलेलं. त्याला दोन षटकार व तीन चौकार अशा लाथा-बुक्के wc07मारलेले. दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान व विंडीज यांना न जमवून आणलेली धडाकेबाज सलामी आर्यलड देत होतं : नेमकं काय घडत होतं? अशुभ संकेत तर मिळत नव्हते?
सेडन पार्कची खेळपट्टी फलंदाजांसह गोलंदाजांनाही न्याय देणारी. विश्वचषकाआधी श्रीलंका व भारत यांच्याशी न्यूझीलंडचे सामने झाले, त्यात एकंदरीत ५००-५५०पेक्षा जास्त धावा फटकावल्या गेल्या नव्हत्या. पण आता खेळपट्टी पाटा बनवा, फटकेबाजीला पूरक अशीच बनवा, असे स्पष्ट आदेश आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) देत होती. त्यानुसार आपण खेळपट्टी बनवत आहोत असे माळी ऊर्फ क्युरेटर सांगत होते.
चौके-छक्के स्वस्त!
दुसरी बाब क्रीडांगणाच्या मोजमापाची, लांबी-रुंदीची. अ‍ॅडलेड व पर्थ यापेक्षाही मेलबर्न विशाल. सीमारेषा ७५ यार्डापलीकडच्या. याउलट सेडन पार्कची सीमारेषा दोन्ही यष्टींच्या रेषेत ४०-४० मीटर्सवर स्क्वेअर लेग ते पॉइंटच्या सीमारेषा याच्या दीडपट. त्यामुळे येथे चौकार-षटकार स्वस्त. आर्यलडच्या ६ षटकार व २२ चौकारांतून फलंदाजीच्या २४८ धावांपैकी ११२ धावा. भारताच्या, तर ९ षटकार व २४ चौकार यांच्यामार्फत २४१ पैकी दीडशे धावा! याचे श्रेय फलंदाजांइतकेच जवळच्या सीमारेषांना.
या कामगिरीमुळे संतुष्ट झालेल्या चॅनल्समधून भारतीय संघाच्या कामगिरीवर स्तुतिसुमनं उधळण्याची चढाओढच लागलेली दिसते. संघ-संचालक रवी शास्त्री, तेज त्रिमूर्तीवर नवनवे किताब ओवाळून टाकत आहेत. शमीला ते संबोधतात कोलकाताचा नबाब, उमेश यादवला विदर्भ एक्स्प्रेस, तर मोहित शर्माला हरयाणा एक्स्प्रेस. त्यांनी नवोदितांना प्रोत्साहन द्यावं. ‘‘तुम्ही मिचेल जॉन्सन व मिचेल स्टार्कच्या wc08वेगाविषयी लिहिता, आता शमी-यादववरही तसंच लिहा’’ असं पत्रकारांनी सांगावं, हे मी समजू शकतो. त्यांच्या कामाचा तो भाग आहे. पण चॅनल्सच्या समीक्षकांना झालंय तरी काय?
कोणते डावपेच?
कौतुकं कशाकशाची होत आहेत? म्हणे धोनीनं, तेज त्रिमूर्तीच्या जागी जाडेजा-अश्विनला आणण्याचे कल्पक डावपेच लढवले. या बदलात डावपेच कोणते व कल्पकता कोणती? शमी, यादव व मोहित शर्मा यांचे पहिले हप्ते, पहिले स्पेल अपेशी ठरले. १५ षटकांत चेंडूस धाव अशी नाबाद ८९ची सलामी झाली. आता हे तिघे बदलायचे, तर हाताशी उरलं होतं कोण? अश्विन व जाडेजा. त्यांच्या हाती चेंडू देण्यास धोनीपुढे पर्यायच कोणता उरला होता? त्यांना गोलंदाजी दिली गेली ती मजबुरीतून, अडचणीतून हाती असलेला एकमेव मार्ग पत्करणाऱ्या अनिवार्यतेतून! त्यात कसली कल्पकता व कसले डावपेच? तीच बाब सुरेश रैनाबाबत. शमी व अश्विन यांनी १९ षटकांत चार फलंदाज बार करताना दिल्या फक्त ७९ धावा. पण मोहितच्या ६ षटकांत ३८, जाडेजाच्या ७ षटकांत ४५ व यादवच्या ४ षटकांत तर ३४, अशा १७ षटकांत ११७. म्हणजे षटकामागे चक्क सात-सात. या तीन महागडय़ा गोलंदाजांना आणखी १३ षटकं देणं म्हणजे ९०-१०० धावांच्या टोलेबाजीला आमंत्रण देणं. म्हणून त्यानं शेवटचा पर्याय वापरला रैनाचा. तो तर स्वप्नं बघतोय २०११च्या विश्वचषकातील अष्टपैलू युवराजची जागा भरून काढण्याची. खरी कमाल त्यानं केली. १० षटकांत ४० धावा दिल्या. यादव, जाडेजा, मोहित यांचे अपयश झाकले गेले. विचार व्हायला पाहिजे याचाच.
अशा वेळी जाणकार विचार करीत आहेत उपांत्यपूर्व, उपांत्य व अंतिम फेरीचा. सर्वप्रथम बहुधा बांगलादेशचा. मग ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका यांचा. ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडन हा विराट कोहलीचा चाहता. पण थंड डोक्यानं विचार करताना तो धोक्याचा एक कंदीलही दाखवतो!
हेडनचं निरीक्षण
कोहलीवर माऱ्याचा रोख कसा ठेवला जावा व जाईल? हेडन म्हणतो, ‘‘कोहलीला पायांवर (म्हणजे डाव्या यष्टीच्या रेषेत) चेंडूचा रोख माझे गोलंदाज ठेवू लागतील, तर मी वेडापिसा होईन! पायांभोवती पडणारे चेंडू (ऑनला) फटकवण्यासाठी त्याच्या भात्यात अप्रतिम फटके आहेत. अशा चेंडूला फटकवताना त्याची धावगती १०० चेंडूंवर २७७ धावा अशी गरुडभरारी मारते. तरीही गोलंदाज ती चूक करीत राहतात. ज्यांची कमाई लाखो डॉलर्सची असे हे गोलंदाज, उजव्या यष्टीच्या फूटभर बाहेर टप्पा का ठेवत नाहीत? ऑस्ट्रेलियन गोलंदाज याबाबत हयगय करणार नाहीत. त्याचा विचार प्रामुख्यानं करा! ओळीनं पाच जय ही सुरुवात गौरवास्पद. पण त्यात हुरळून जाण्याचा भोटपणा टाळला पाहिजे. संघाला शाबासकी देताना, ‘आगे बढो’ आवर्जून म्हणा. कौतुकं राखून ठेवू या अंतिम फेरीसाठी, विश्वचषक विजयासाठी!