चार वर्षांनी येणाऱ्या क्रिकेटच्या या महाकुंभाची सारेच आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रत्येक विश्वचषकाची काही ना काही तरी खासियत असते. या वेळी विश्वचषकात सर्वात लक्षणीय ठरेल ती वेगवान गोलंदाजी. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील खेळपट्टय़ा, वातावरण या गोष्टींचा विचार केला तर वेगवान गोलंदाजांसाठी हा विश्वचषक खास असेल. त्यामुळे सर्वच संघ आपल्या वेगवान माऱ्यासह सज्ज झाले आहेत.
सध्याच्या घडीला वेगवान गोलंदाजीचा विचार केला तर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका या संघांची नावे अग्रक्रमाने पुढे येताना दिसतात. ऑस्ट्रेलियाच्या संघात वेगवान गोलंदाजांचा चांगलाच तोफखाना आहे. मिचेल जॉन्सन हा ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का असेल. जॉन्सनकडे चांगला अनुभव आहे आणि हा त्याचा अखेरचा विश्वचषक असेल, असे दिसते आहे. त्यामुळे आपला अखेरचा विश्वचषक अविस्मरणीय करण्याचा त्याचा नक्कीच प्रयत्न असेल. ऑस्ट्रेलियाच्या संघातला दुसरा मिचेल म्हणजे स्टार्क. स्टार्कने तिरंगी एकदिवसीय स्पर्धेमध्ये भेदक मारा करत साऱ्यांचेच लक्ष वेधले असून तो या विश्वचषकातील एक भेदक गोलंदाज म्हणून समोर येऊ शकतो. जोश हॅझेलवूड, नावाप्रमाणेच त्याच्या गोलंदाजीमध्येही जोश पाहायला मिळतो. आपल्या वेगवान माऱ्याने त्यानेही क्रिकेट जगताचे आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. पॅट कमिन्स हादेखील ऑस्ट्रेलियाकडे एक चांगला पर्याय आहे. शेन वॉटसनकडे वेग जास्त नसला तरी स्थिरस्थावर जोडी फोडण्यात तो माहीर आहे, त्याचबरोबर जेम्स फॉल्कनरदेखील मधल्या षटकांमध्ये संघाला सातत्याने यश मिळवून देत आहे.
दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन हा यंदाच्या विश्वचषकात सर्वाच्याच रडारवर अव्वल स्थानावर असेल. वेगवान अचूक मारा, हे स्टेनचे वैशिष्टय़. त्यामुळे या ‘स्टेनगन’ने एकदा का आपला मारा सुरू केला की फलंदाजी धारातीर्थी पडायला वेळ लागत नाही. एकटय़ाच्या जिवावर संघाला स्टेन विजय मिळवून देऊ शकतो. स्टेनला या वेळी सुयोग्य साथ लाभेल ती मॉर्ने मॉर्केलची. उंचपुऱ्या, गोऱ्यापान मॉर्केलचे चेंडू हे फलंदाजांच्या छातीपर्यंत सहज येतात आणि त्याला फटकावण्याची छाती फलंदाज दाखवताना दिसत नाहीत. वेगवान उसळते चेंडू टाकण्यात मॉर्केल वाकबगार असून त्याला विश्वचषकातील खेळपट्टय़ांची सुरेख साथ लाभेल. व्हेरॉन फिलॅण्डरकडे वेग नसला तरी त्याच्याकडे अचूकता आहे. चेंडू योग्य टप्प्यांवर टाकत फलंदाजांना धावा करण्यापासून रोखण्याचे कसब त्याच्याकडे आहे. वेन पार्नेलला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगला अनुभव असून तो त्यांच्या संघाचा गोलंदाजीतील चौथा खांब असेल.
न्यूझीलंडकडे टीम साऊथी, ट्रेंट बोल्ट, कायले मिल्स आणि मिचेल मॅक्लेघन ही यशस्वी चौकडी आहे. गेल्या वर्षभरात या तिघांनी न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजीची धुरा यशस्वीपणे वाहिली आहे. वातावरणाची त्यांना पुरेपूर माहिती असून या विश्वचषकातील सर्वाधिक क्लुप्त्या त्यांच्याकडून पाहायला मिळतील.
इंग्लंडच्या संघाचा विचार केला, तर जेम्स अँडरसनचे नाव घ्यावेच लागेल. आपल्या वेगवान माऱ्याने त्याने क्रिकेटविश्वाला भुरळ घातली आहे, त्याचबरोबर ‘रिव्हर्स स्विंग’ करण्यात अॅण्डरसन पटाईत आहे. त्यामुळे अँडरसन हे इंग्लंडचे खणखणीत नाणे आहे. युवा स्टिव्हन फिनकडे चांगलाच वेग आहे. हे त्याने तिरंगी स्पर्धेतही दाखवून दिले आहे. स्टुअर्ट ब्रॉडकडेही चांगला वेग आणि अनुभव आहे. ख्रिस वोक्स हा तेजतर्रार गोलंदाजही आपली कमाल दाखवताना दिसत आहे.
लसिथ मलिंगा हे एक नाव फलंदाजाला दडपणाखाली आणण्यासाठी पुरेसे आहे, कारण गेल्या काही वर्षांमध्ये मलिंगाने आपल्य जादूई वेगवान गोलंदाजीच्या जोरावर क्रिकेट जगतावर मोहिनी घातली आहे. पण मलिंगाचा अपवाद वगळता श्रीलंकेकडे एकही वेगवान गोलंदाज नाही.
एकेकाळी वेस्ट इंडिज आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध होते, पण सध्याच्या घडीला या दोन्ही संघांवर नजर टाकली तर संघामध्ये अनुभवी गोलंदाजांची कमतरता आहे. इम्रान खान, वसिम अक्रम, वकार युनिस आणि त्यानंतर शोएब अख्तर या पाकिस्तानच्या गोलंदाजांनी एकेकाळी विश्वचषक गाजवला असला तरी यंदाच्या विश्वचषकात पाकिस्तानकडे नावलौकिक मिळवलेला एकही वेगवान गोलंदाज नाही. मोहम्मद इरफान, वहाब रियाझ, राहत अली यांच्याकडे पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजीची जबाबदारी असेल. जुनैद खान दुखापतीमुळे विश्वचषकातून बाहेर पडल्याने संघाला मोठा धक्का बसला आहे. वेस्ट इंडिजचा विचार केला तर त्यांच्याकडे आंद्रे रसेल आणि जेरॉम टेलर हे दोन वेगवान गोलंदाज आहेत, पण या दोघांनाही आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही.
वेगवान गोलंदाजी आणि भारताचा तसा काही संबंध नसल्याचे पुन्हा एकदा या विश्वचषकात दिसत आहे. कपिल देव, जवागल श्रीनाथ आणि त्यानंतर भारताला मिळाला तो झहीर खान. झहीरने मागील विश्वचषकात हुकमी कामगिरी केली. परंतु तो सध्या दुखापतीशी सामना करण्यात व्यस्त आहे. इशांत शर्मा दुखापतग्रस्त झाल्याने विश्वचषकातून बाहेर पडला आहे. त्यामुळे भारतीय संघात सर्वात वेगवान गोलंदाज आहे तो उमेश यादव, पण त्याची दिशा भरकटलेली पाहायला मिळते. त्यामुळे त्याच्या वेगवान माऱ्यावर फलंदाज वेगाने धावा जमवतात. मोहम्मद शमीकडेही चांगला वेग आहे. अखेरच्या षटकांमध्ये तो चांगली गोलंदाजी करतो, पण तो सध्या चांगल्या फॉर्मात दिसत नाही. एकंदरीत वेगवान माऱ्याचा विचार केला तर भारतीय संघ त्यामध्ये कुठेही दिसत नाही.
 प्रसाद लाड