wclogoविश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होऊन दोन आठवडे झाले होते. टेलिव्हिजनच्या सामथ्र्यवान माध्यमातून खेळाचे बारकावे समजावून सांगत होते सुनील गावस्कर अन् संजय मांजरेकर. त्यांचे जन्मस्थान दादर हिंदू कॉलनी अन् शिवाजी पार्क परिसर. दोघेही मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातले. दोघेही जितके तंत्रशुद्ध फलंदाज, तितकेच समोरील गोलंदाजीप्रमाणे सभोवतालच्या क्रिकेटची छान चिकित्सा, परखड विश्लेषण करणारे. दोघांचीही इंग्रजी भाषेवर पकड, विशेषणांची निवड करण्यात अधिकच चपखल, अधिकच चोखंदळ.
सारं कसं छान छान चाललं होतं; पण क्रिकेटसह अटळ येणाऱ्या जाहिराती सुरू झाल्या, म्हणून चॅनल बदललं तिथेच गडबड झाली! कानी येणारे सूर सुरेल होते : ‘मराठी असे आमुची मायबोली, जरी आज ती राजभाषा नसे. नसो आज ऐश्वर्य या माऊलीला, यशाची पुढे दिव्य आशा असे.’ या अमर आशावादी सुरांनंतर कानी आले, वास्तवाचे ध्यान देणारे बोल: ‘जरी पंचखंडातही मान्यता घे, स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी. मराठी भिकारीण झाली तरीही कुशीचा तिच्या, तीस केंवी, त्यजी.’
माधव ज्युलियन ऊर्फ पटवर्धन यांनी हे स्फूर्तिदायक, दिशा-दिग्दर्शक गीत रचले स्वातंत्र्यपूर्व काळी. ‘पंचखंडात स्वसत्ताबळे श्रीमती इंग्रजी मान्यता’ घ्यायची, गुलामीतील भरतखंडाकडून खंडणीसारखी मान्यता वसूल करून घ्यायची, त्या जमान्यातील. ज्या साम्राज्यावर सूर्य कधीही मावळत नसे, असे ते ब्रिटिश साम्राज्य. ते इतिहासजमा झाल्याला आज ५०-६० वर्षे झाली तरीही गावस्कर-मांजरेकर समीक्षणासाठी एकमेव माध्यम इंग्रजी भाषा पसंत करत होते, कारण जेफ बॉयकॉट, इयान बोथम, डेव्हिड गॉवर प्रभृतींनी मराठीत (निदान राष्ट्रभाषा मुळीच नव्हे, पण राजभाषा हिंदीत) समीक्षण करण्याचा जमाना दूरवरचा, आज क्षितिजावरही नजरेत न येणारा!
काय करावं ते सुचेना, त्यातूनच तो दिवस निघाला नेमका मराठी भाषा-दिवस. कविवर्य वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या सकस लेखनाची उजळणी करण्याचा दिवस. ‘पिचेल मनगट, परी उरातील अभंग आवेश’, असं म्हणत क्रांतीच्या जयजयकार करणाऱ्या कुसुमाग्रजांच्या- तसेच ‘अनंत अमुची ध्येयासक्ती, अनंत अन् आशा, किनारा तुला पामराला!’ अशा शब्दांत अथांग सागराला त्याची जागा दाखवून देणाऱ्या ‘कोलंबसाचे गर्वगीत’ रचणाऱ्या कुसुमाग्रजांच्या आठवणी जागवण्याचा!
इंग्रजी नको, हिंदीही नको
निदान मराठी भाषा दिवशी, टाळत्याजोग्या इंग्रजीला थोडंफार टाळावं, म्हणून पुन्हा टीव्हीचं चॅनल बदलून पाहिलं. आता कानी येऊ लागली राज कपूर व दिलीप कुमार व देव आनंद, नर्गिस व मधुबाला व मीनाकुमारी आणि हो अर्थातच शाहरूख खान (चुकलोच एसआरके), सलमान खान व आमिर खान यांच्या हिंदीतून (सावधान! मुन्शी प्रेमचंद, कृष्णचंदर, हरीवंश राय बच्चन, सुमित्रानंदन पंत यांच्या हिंदीतून नव्हे). एक हिंदी आवाज कपिल देवसारखा वाटला. मग बहुधा शोएब अख्तर. मग पुन्हा अटळ जाहिराती चालू. पुन्हा चॅनल बदललं.
पुन्हा गडबड. नेमकं नको तेव्हा माधव ज्युलियन यांचे पुढचे बोल- ‘जरी मान्यता आज हिंदीस देई, उदेले नवं राष्ट्र हे हिंदवी, मनाचे मराठी मराठीस ध्यानी, हिची जाणुनी योग्यता थोरवी..’ इंग्रजी व त्याखालोखाल हिंदी या मराठीच्या भाषाभगिनीच; पण मराठी माध्यमाच्या मुळावर उठलेल्या. त्यांना झिडकारत होते द्रष्टे कवी माधव ज्युलियन.
मायबोली मराठीची हालत वर्णन करतात, माधव ज्युलियन, ‘मराठी असे आमुची मायबोली, अहो पारतंत्र्यात ही खंगली. हिची थोर संपत्ती गेली उपेक्षेमुळे खोल कालार्णवाच्या तळी.’ त्याआधी ते असेही सांगतात : ‘हिच्या लक्तरांची असे लाज आम्हां, नका फक्त पाहू हिच्या लक्तरा, प्रभावी हिचे रूप चापल्य देखा पडली फिकी ज्यामुळे अप्सरा’.. कविवर्याना नजरेत भरली, टोचली मराठीची लक्तरं, पारतंत्र्यात खंगलेली मराठी. स्वातंत्र्यानंतर ६७ वर्षांनी ही परिस्थिती कितपत सुधारली? आता मराठी सँडविच झालीय, इंग्रजी व हिंदी या विस्तारवादी भाषांच्या तडाख्यात. क्रिकेट समालोचन इंग्रजी वा हिंदीत, बस्स. त्यात चेपलीय मराठी!
कारस्थान मोडीत काढा!
आकाशवाणी व दूरदर्शन : सरकारी प्रसारमाध्यमं. भारतीय करदात्या नागरिकांच्या पैशातून चालवलेली केंद्रीय प्रसारमाध्यमं. त्यांची धोरणे ठरवायचा अधिकार नागरिकांचाच. भारतीय घटनेचं चौकट संघराज्यास साजेशी, फेडरल. घटनेनुसार हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, ती आहे राजभाषा. मराठी ही राजभाषा. मल्याळी, तामिळ, तेलगू, कन्नड, बंगाली, आसामी, ओडिया, पंजाबी, कश्मिरी आदी राज्यभाषा मराठीच्या व हिंदीच्या भाषाभगिनी. अशा परिस्थितीत इंग्रजी व हिंदी यांना अनधिकृत राष्ट्रभाषेचा दर्जा देण्याचं, ६७ वर्षांपासून इतर भाषाभगिनींवर लादलेलं जुलमी कारस्थान, स्वतंत्र भारत केव्हा मोडीत काढणार?
कोणतीही भाषा लोकांच्या व्यवहारात राहिली तरच वाढते, एरवी ओहोटीला लागते. शालेय-कॉलेजीय शिक्षण, न्यायालयीन कामकाज, विधिमंडळ कामकाज जनभाषातच चाललं पाहिजे. तेवढंच महत्त्व प्राप्त झालंय एकविसाव्या शतकात बडय़ा क्रीडास्पर्धाना. ऑलिम्पिक, एशियाड, राष्ट्रकुल, क्रिकेट हे करोडो लोकांना खेचणाऱ्या क्रीडा स्पर्धा. विश्वचषकात दक्षिण आफ्रिका व पाकिस्तान यांविरुद्धच्या सामन्यांना २५ ते २८ कोटी प्रेक्षकवर्ग लाभला, हा दावा स्टार टीव्हीचा. त्यात ४० टक्के तथ्य धरलं- तरी १०-१२ कोटी लोकांना कोणता संगीत जलसा वा चित्रपट महोत्सव वा राजकीय सभा खेचते?
लोकव्यवहाराचं प्रचंड मोठं व्यासपीठ बनलंय क्रीडा क्षेत्र. त्यावर किमान सरकारी माध्यमात, हिंदी-इंग्रजीच्या बरोबरीचं स्थान मराठीला (व तिच्या भारतीय भाषाभगिनींना) तातडीनं दिलंच पाहिजे- अशी मागणी महाराष्ट्राचं विधिमंडळ करील का? तसा स्पष्ट ठराव करील का? यात ‘दिलेच पाहिजे’मधील ‘च’ निर्णायक महत्त्वाचा, ‘संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे’, या घोषणेतील ‘च’ इतका!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिक्षण व क्रीडामंत्री विनोद तावडे; मराठी अस्मितेचे नारे देणारे उद्धव ठाकरे व राज ठाकरे, ‘इटालियन नको, भारतीय हवे’ म्हणणारे शरद पवार, अजित पवार, पृथ्वीराज चव्हाण व अशोक चव्हाण. लोकचळवळीचे नेते गणपतराव देशमुख, राजू शेट्टी, प्रकाश आंबेडकर, कॉ. दिवा पांडू गावित व डॉ. बाबा आढाव व ही भूमिका वर्षांनुवर्षे मांडणारे शिशिर शिंदे-मायबोलीसाठी ही गोष्ट मनावर घ्याच!
वि. वि. करमरकर