विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न सर्व देशांप्रमाणेच भारत आणि पाकिस्तान या देशांनीही जोपासले आहे. या महत्त्वाच्या स्पध्रेत प्रतिस्पध्र्याशी मैदानावर दोन हात करताना खेळाडूंनी भावनात्मक होऊ नये, यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांनी आपल्या खेळाडूंवर काही बंधने घातली आहे. त्यामुळे  शतक झळकावल्यावर विराट कोहली अनुष्का शर्माकडे पाहून ‘फ्लाइंग किस’ देताना दिसणार नाही. कारण या स्पध्रेसाठी खेळाडूंना आपल्या बायको किंवा प्रेयसीला सोबत आणण्यास मनाई करण्यात आली आहे. त्याचबरोबर सोशल मीडियातील टीकाटिप्पणींमुळे खेळांडूवर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही (पीसीबी) खबरदारी घेतली आहे.
कोहलीला इंग्लंडच्या दौऱ्यासाठी अनुष्काला घेऊन जाण्याची परवानगी बीसीसीआय दिली होती. या दौऱ्यात कोहलीला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या विश्वचषकापूर्वी झालेल्या एकदिवसीय सामन्यांमध्येही कोहलीने निराशा केली आहे. परंतु ऑस्ट्रेलियाच्या कसोटी मालिकेच्या वेळी अनुष्का तिथे होती आणि विराट चांगलाच फॉर्मात होता.
‘‘भारतीय संघाची सध्याची कामगिरी चांगली होत नाही. विश्वचषकासारखी महत्त्वाची स्पर्धा काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे संघाच्या हितासाठी आम्ही खेळाडूंना बायको किंवा प्रेयसीला सोबत आणता येणार नाही,’’ असे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह-उल-हक हा बऱ्याचदा ‘ट्विट’ करीत असतो, पण यंदाच्या विश्वचषकामध्ये त्याला हे करता येणार नाही. याबाबत पाकिस्तानी संघाचे व्यवस्थापक नाविद अक्रम चीमा म्हणाले की, ‘‘विश्वचषकासारख्या महत्त्वाच्या स्पर्धेमध्ये खेळाडूंनी फक्त कामगिरीवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे मला वाटते. विश्वचषकासारख्या मोठय़ा स्पर्धेत निवड झाल्याची जबाबदारी खेळाडूंनी समर्थपणे पार पाडायला हवी. त्यासाठी आम्ही खेळाडूंनी सोशल मीडियाचा वापर करू नये, असे ठरवले आहे.’’