रंगपंचमीच्या दिवशी भारतीय संघ मैदानात बेधडकपणे विजयाचे रंग उधळेल, अशी साऱ्यांनाच अपेक्षा होती. पर्थच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांनी आपले रंग उधळत सामना रंगात आणला होता. दिमाखात विजयाचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय संघाचा बेरंग होणार, अशी भीती वाटत असली तरी शांत चित्ताने खेळणाऱ्या धोनीने खेळपट्टीवर ठाण मांडत भारताला चार विकेट्स राखून विजय मिळवून दिला. धडाकेबाज ख्रिस गेलसह तीन फलंदाजांना बाद करीत सामनावीर मोहम्मद शमीने वेस्ट इंडिजच्या डावाला धक्के दिले आणि त्यामुळेच भारताला त्यांचा डाव १८२ धावांमध्ये आटोपता आला. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने शतकासमीप अर्धा संघ गमावला होता. पण धोनीने एक बाजू लावून धरून रडतखडत विजय मिळवला आणि दिमाखात उपांत्यपूर्व फेरी गाठली.
वेगवान खेळपट्टीवर नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि भारतीय गोलंदाजांनी त्यांना हतबल करून सोडले. शमी आणि उमेश यादव या जोडीने वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना चकित करीत त्यांना झटपट बाद करण्यात यश मिळवले. या दोघांना अन्य गोलंदाजांनीही सुरेख साथ दिल्यामुळे त्यांची ७ बाद ८५ अशी दयनीय अवस्था केली होती. पण त्यानंतर मात्र कर्णधार जेसन होल्डरने ४ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ५७ धावांची अप्रतिम खेळी साकारल्यामुळे संघाला १८२ धावा करता आल्या.
सध्याचा फॉर्म पाहता भारतीय संघ हे आव्हान लीलया पेलेल, असे वाटले होते. पण वेस्ट इंडिजच्या वेगवान माऱ्यापुढे भारतीय फलंदाज ढेपाळले. अजिंक्य रहाणेचा अपवाद वगळता अन्य फलंदाजांनी बेजबाबदार फटके खेळत पराभवाला आमंत्रण दिले होते. पण धोनीने सावध फलंदाजी करीत संघाला विजयावर शिक्कामोर्तब करूनच मैदान सोडले. धोनीने आर. अश्विनच्या (नाबाद १६) साथीने सातव्या विकेटसाठी ५१ धावांची अभेद्य भागीदारी रचली. धोनीने एका बाजूने फलंदाज बाद होत असताना अखेपर्यंत झुंज देत ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर नाबाद ४५ धावांची खेळी साकारत संघाला विजय मिळवून दिला.
धोनीच्या खात्यात सर्वाधिक विजय
भारताला सर्वाधिक विजय मिळवून देण्याचा विक्रम महेंद्रसिंग धोनीने आपल्या नावावर केला असून यापूर्वी हा विक्रम सौरव गांगुलीच्या नावावर होता. धोनीने १११ एकदिवसीय सामन्यांमध्ये ५९ विजय मिळवले असून ४१ पराभव पदरी पडले आहेत. यामधील ३ सामने बरोबरीत सुटले असून ८ सामने रद्द झाले आहेत.
धोनीचे पॅडविना यष्टीरक्षण
भारताचा महेंद्रसिंग धोनी कधी काय करील, याचा नेम नसतो. यष्टीरक्षण करताना ग्लोव्हज्बरोबर पॅडही लागतातच. पण आर. अश्विनच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षण करताना धोनीने आपले पॅड ‘सिली पॉइंट’वर उभ्या असलेल्या अजिंक्य रहाणेला दिले आणि स्वत:ने मात्र पॅडविना सहजपणे यष्टीरक्षण केले. डावाचे १४वे षटक सुरूअसताना धोनीला अजिंक्यला ‘सिली पॉइंट’वर क्षेत्ररक्षणासाठी उभे ठेवायचे होते. पण षटक सुरू झाल्यामुळे पॅड मागवता येत नव्हते, त्यामुळे धोनीने आपले पॅड या वेळी रहाणेला दिले.

आतापर्यंत जगभरातील खेळपट्टय़ांपेक्षा वाकावर गोलंदाजी करताना सर्वात जास्त आनंद मिळाला. या खेळपट्टीवर स्विंग आणि उसळी अशा दोन्ही गोष्टी आम्हाला मिळत होत्या. त्यामुळे अचूक टप्पा आणि दिशा पकडत आम्ही गोलंदाजी केली आणि त्याचेच फळ मला मिळाले. गोलंदाजीसाठी धावताना मी काही बदल केले आहेत, त्याचा फायदा मला चांगलाच झाला. या बदलामुळे माझा वेग वाढला. यापुढेही कामगिरीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करत संघाला विजय मिळवून देण्याचाच प्रयत्न असेल.
मोहम्मद शमी, भारताचा गोलंदाज

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचे शल्य वाटत नाही. कारण खेळपट्टी फलंदाजीसाठी चांगली होती. पण आम्ही सुरुवातीलाच महत्त्वाचे फलंदाज गमावले आणि त्यामुळे आम्ही सावरू शकलो नाही. फलंदाजांनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली असती तर आमची धावसंख्या अजून वाढली असती आणि त्याचबरोबर सामना जिंकण्याची संधीही. यापुढे संघात योग्य समन्वय कसा ठेवता येईल, याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.
जेसन होल्डर, वेस्ट इंडिजचा कर्णधार

  सलग चार सामन्यांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला सर्वबाद करण्याची किमया भारताने तब्बल ९ वर्षांनंतर साधली आहे. यापूर्वी २००६ साली भारताने असा पराक्रम केला होता.

आतापर्यंतच्या विश्वचषकांचा विचार करताना भारताने पाच वेळा वेस्ट इंडिजच्या संघाला सर्व बाद करण्याचा पाराक्रम केला आहे. विश्वचषकात वेस्ट इंडिज सर्वाधिक वेळा भारताविरुद्धच सर्व बाद झाला आहे.

संक्षिप्त धावफलक
वेस्ट इंडिज : ४४.२ षटकांत सर्व बाद १८२ (जेसन होल्डर ५७; मोहम्मद शमी ३/३५, रवींद्र जडेजा २/२७) विजयी वि. भारत : ३९.१ षटकांत ६ बाद १८५ (महेंद्रसिंग धोनी नाबाद ४५; जेरॉम टेलर २/३३).
 सामनावीर : मोहम्मद शमी.

 

सामनावीर- मोहम्मद शमी