News Flash

ओझे उतरले!

१९९२ ते २०११.. वर्ष, स्पर्धा आणि ठिकाण बदलत होते, पण कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे बाद फेरीतून माघारी जाणे परवलीचे झालेले..

| March 18, 2015 03:10 am

 फिरकीपटू ताहीर विजयाचा शिल्पकार *  डय़ुमिनीची हॅट्ट्रिक
१९९२ ते २०११.. वर्ष, स्पर्धा आणि ठिकाण बदलत होते, पण कोणत्याही मोठय़ा स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे बाद फेरीतून माघारी जाणे परवलीचे झालेले.. यंदा समतोल आणि फॉर्मात असलेला संघ असूनही भाकिते त्यांच्या गाशा गुंडाळण्याचीच होती.. मात्र प्रतिस्पध्र्याचा सखोल अभ्यास आणि शिस्तबद्ध योजनांची मैदानावर अचूक अंमलबजावणी यांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेवर दणदणीत विजय मिळवत अनेक वर्षांचे ‘चोकर्स’चे ओझे डोक्यावरून उतरवले.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र कौशल्याला मेहनतीची जोड देत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हा निर्णय आपल्यासाठी सार्थ ठरवला. लहिरू थिरिमानेच्या जागी सलामीवीर म्हणून आलेल्या कुशल परेराला कायले अ‍ॅबॉटने तिसऱ्याच षटकात बाद करत शानदार सुरुवात केली. पुढच्याच षटकात डेल स्टेनने धोकादायक दिलशानला बाद केले. तो भोपळाही फोडू शकला नाही. थिरिमाने आणि कुमार संगकारा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी करत डाव सावरला. मात्र मोक्याच्या क्षणी बळी मिळवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या इम्रान ताहीरने थिरिमानेला बाद करत ही जोडी फोडली. चार सलग सामन्यांत चार शतके झळकावणारा कुमार संगकाराला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी अक्षरश: निष्प्रभ केले. एका क्षणी संगकाराच्या नावावर ५१ चेंडूंत अवघ्या १५ धावा होत्या. अनुभवी महेला जयवर्धनेला डू प्लेसिसच्या हाती झेल द्यायला भाग पाडत ताहीरने श्रीलंकेला अडचणीत टाकले. पाचवा विशेषज्ञ गोलंदाज नसणे हा दक्षिण आफ्रिकेचा कच्चा दुवा होता. मात्र कामचलाऊ गोलंदाजी करणाऱ्या जे पी डय़ुमिनीने अँजेलो मॅथ्यूजला माघारी धाडले. आक्रमक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या थिसारा परेराला बाद करत ताहीरने श्रीलंकेच्या डावाला खिंडार पाडले. पुढच्याच षटकात न्यूवान कुलसेकरा आणि थरिंदू कौशलला बाद करत डय़ुमिनीने हॅट्ट्रिक पूर्ण केली. फटक्यांची अस्त्रे म्यान झालेल्या संगकाराला मॉर्ने मॉर्केलने बाद केले. संगकारा बाद होताच श्रीलंकेच्या सन्मानजनक धावसंख्या गाठण्याच्या उरल्यासुरल्या आशाही संपुष्टात आल्या. संगकाराने ९६ चेंडूंत ४५ धावा केल्या. श्रीलंकेचा डाव १३३ धावांतच आटोपला. ताहीरने ४, तर डय़ुमिनीने ३ बळी घेतले.
सोपे लक्ष्य मिळालेल्या दक्षिण आफ्रिकेने आक्रमक सुरुवात केली. मात्र हशिम अमला १६ धावा करून तंबूत परतला. साखळी लढतीत खराब फॉर्मशी झगडणाऱ्या क्विंटन डी कॉकने ५७ चेंडूंत नाबाद ७८ धावांची दिमाखदार खेळी साकारत दक्षिण आफ्रिकेच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ताहीरला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या पराभवासह श्रीलंकेचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दक्षिण आफ्रिकेची उपांत्य फेरीची लढत ऑकलंड येथे होणार आहे.
धावफलक
श्रीलंका : कुशल परेरा झे. डी कॉक गो. अ‍ॅबॉट ३, तिलकरत्ने दिलशान झे. प्लेसिस गो. स्टेन ०, कुमार संगकारा झे. मिलर गो. मॉर्केल ४५, लहिरु थिरिमाने झे. आणि गो. ताहीर ४१, महेला जयवर्धने झे. प्लेसिस गो. ताहीर ४, अँजेलो मॅथ्यूज झे. प्लेसिस गो. डय़ुमिनी १९, थिसारा परेरा झे. रोसू गो. ताहीर ०, न्यूवान कुलसेकरा झे. डी कॉक गो. डय़ुमिनी १, थरिंदू कौशल पायचीत गो. डय़ुमिनी ०, दुश्मंत चमिरा नाबाद २, लसिथ मलिंगा झे. मिलर गो. ताहीर ३, अवांतर (बाइज ४, लेगबाइज २, वाइड ७, नोबॉल २) १५, एकूण : ३७.२ षटकांत सर्वबाद १३३
बादक्रम : १-३, २-४, ३-६९, ४-८१, ५-११४, ६-११५, ७-११६, ८-११६, ९-१२७, १०-१३३
गोलंदाजी : डेल स्टेन ७-२-१८-१, कायले अ‍ॅबॉट ६-१-२७-१,
मॉर्ने मॉर्केल ७-१-२७-१, जे पी डय़ुमिनी ९-१-१९-३,
इम्रान ताहीर ८.२-०-२६-४
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक नाबाद ७८, हशिम अमला झे. कुलसेकरा गो. मलिंगा १६, फॅफ डय़ू प्लेसिस नाबाद २१, अवांतर (लेगबाइज ४, वाइड १२, नोबॉल ३) १९,
एकूण : १८ षटकांत १ बाद १३४
बादक्रम : १-४०
गोलंदाजी : लसिथ मलिंगा ६-०-४३-१, तिलकरत्ने दिलशान २-०-१०-०, न्यूवान कुलसेकरा १-०-१३-०,
थरिंदू कौशल ६-०-२५-०,
दुश्मंत चमीरा २-०-२९-०,
थिसारा परेरा १-०-१०-०
सामनावीर : इम्रान ताहीर.

आम्ही हा सामना जिंकण्यासाठी प्रेरित होतो. सर्वच खेळाडू मानसिकदृष्टय़ा सक्षम होते. आम्ही नाणेफेक जिंकली असती तरी प्रथम फलंदाजीच केली असती. ज्या पद्धतीने सगळ्या गोलंदाजांनी शिस्तबद्ध आणि भेदक मारा केला ते अफलातून आहे. फिरकीपटूंनी धावा रोखणे आणि बळी मिळवणे या दोन्ही आघाडय़ांवर श्रीलंकेला निष्प्रभ केले. डी कॉक साखळी सामन्यांमध्ये धावांसाठी झगडत होता. मात्र त्याच्या क्षमतेवर संघव्यवस्थापनाला विश्वास होता. तो त्याने सार्थ ठरवला. आम्ही जेतेपदापर्यंत वाटचाल करू.
-ए बी डीव्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार

विश्वचषकातली आमची ही सर्वात निकृष्ट कामगिरी आहे. आम्ही योग्य फटक्यांची निवड केली नाही. २५० धावा करणे आवश्यक होते. दक्षिण आफ्रिकेचे आक्रमण अव्वल दर्जाचे आहे याची आम्हाला कल्पना होती. मात्र आमच्या हातून चुका झाल्या. संगकारा-जयवर्धने यांना आम्ही विश्वविजेतेपदाची भेट देऊ शकलो नाही याची खंत आहे.
-अँजेलो मॅथ्यूज,  श्रीलंकेचा कर्णधार

डय़ुमिनी आफ्रिकेचा पहिला हॅट्ट्रिकवीर
अष्टपैलू जे पी डय़ुमिनी दक्षिण आफ्रिकेतर्फे एकदिवसीय सामन्यात हॅट्ट्रिक साकारणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणाऱ्या गोलंदाजांच्या पंक्तीत डय़ुमिनी नववा गोलंदाज ठरला आहे. जादूई ऑफब्रेक गोलंदाजीच्या जोरावर डय़ुमिनीने ही किमया साधली. यंदाच्या विश्वचषकात इंग्लंडच्या स्टीव्हन फिनने बांगलादेशविरुद्ध हॅट्ट्रिक घेतली होती. दोन षटकांत मिळून डय़ुमिनीने खंडित हॅट्ट्रिकचा मान मिळवला. ३३व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डय़ुमिनीने अँजेलो मॅथ्यूजला फॅफ डू प्लेसिसकडे झेल द्यायला भाग पाडले. मग ३५व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर कुलसेकराचा झेल यष्टीमागे क्विंटन डी’कॉकने घेतला. डय़ुमिनीसह दक्षिण आफ्रिकेच्या क्षेत्ररक्षकांनी जोरदार अपील केले. पंचांनी काही निर्णय देण्याआधीच कुलसेकरा पॅव्हेलियनच्या दिशेने चालू लागला. पुढच्याच चेंडूवर कौशलला पायचीत करत डय़ुमिनीने हॅट्ट्रिक पूर्ण केली. साकलेन मुश्ताकनंतर विश्वचषकात हॅट्ट्रिक नोंदवणारा डय़ुमिनी केवळ दुसरा फिरकीपटू ठरला आहे.

विश्वचषकाच्या बाद फेरीत पदार्पण करणारा श्रीलंकेचा थरिंदू कौशल दुसरा खेळाडू. यापूर्वी इंग्लंडच्या वेन लारकिन्सने १९७९ विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत पदार्पण केले होते.

दक्षिण आफ्रिकेच्या फिरकीपटूंनी घेतलेल्या बळींची संख्या. दक्षिण आफ्रिकेतर्फे एका लढतीत फिरकीपटूंनी घेतलेल्या सर्वाधिक बळींचा विक्रम.

या सामन्यातल्या षटकारांची संख्या. विश्वचषकाची लढत षटकाराविना संपण्याची पहिलीच वेळ.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 18, 2015 3:10 am

Web Title: live cricket score world cup 2015 sri lanka vs south africa
टॅग : South Africa,Sri Lanka
Next Stories
1 ‘ चोकर्स’चा शिक्का पुसणार?
2 पॉवर प्ले : रं ग त-सं ग त
3 ऑस्ट्रेलियातून.. : तिकिटासाठी कायपण..!
Just Now!
X