विश्वचषक स्पर्धेतील चौथ्या आणि अखेरच्या उपांत्यपूर्व सामन्यात न्यूझीलंडने आपली विजयी घौडदौड कायम राखत यावेळी वेस्ट इंडिजला तब्बल १४३ धावांनी धूळ चारली. स्पर्धेतील सलग सातव्या विजयाच्या जल्लोषासह किवींनी यावेळी संघाला पहिला द्विशतकवीर मिळाल्याचा आनंदही साजरा केला. सलामीवीर मार्टीन गप्तीलने यावेळी विंडीज गोलंदाजांचा समाचार घेत नाबाद २३७ धावांची विस्फोटक खेळी केली. गप्तीलच्या द्विशतकी खेळीच्या बळावर ३९४ धावांचा डोंगर उभारलेल्या न्यूझीलंडने वेस्ट इंडिजचा डाव २५० धावांत रोखला. या विजयासह न्यूझीलंडने स्पर्धेच्या उपांत्यफेरीत दिमाखात प्रवेश केला असून यजमानांची गाठ आता दक्षिण आफ्रिकेशी असणार आहे.
धुवांधार फलंदाजीच्या अनुभवानंतर न्यूझीलंड चाहत्यांना ट्रेंट बोल्टच्या भेदक गोलंदाजीने भारावून टाकले. डोंगराएवढ्या आव्हानाचा दबाव त्यात बोल्टच्या स्विंग माऱयापुढे कॅरेबियन फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. बोल्टने सुरूवातीच्या पाच षटकांत विंडीजच्या महत्त्वाच्या चार फलंदाजांना माघारी धाडले. बोल्टने जॉन्सन चार्ल्सला त्रिफळाचीत केले तर, सिमन्स, सॅम्युअल्स झेलबाद होऊन तंबूत परतले. रामदीनला भोपळाही न फोडू देता बोल्टने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. ख्रिस गेल नामक आपला एक्का मैदानात जम बसवत असल्याने विंडीजसाठी समाधानकारक होती. बोल्टची गोलंदाजीपाहून सहकारी अ‍ॅडम मिलनेला देखील हुरूप आला आणि विस्फोटक गेलला त्याने त्रिफळाचीत केले. गेलने ३३ चेंडूत ६१ धावा कुटल्या. गेल बाद झाल्यानंतर कार्टर, सॅमी आणि रसेल स्वस्तात माघारी परतले. अखेरीस जेसन होल्डरने २६ चेंडूत ४२ धावांची फटकेबाजी केली पण, साजेशी साथ न मिळाल्याने वेस्ट इंडिजचा डाव २५० धावांपर्यंत सिमीत राहिला.
दरम्यान, न्यूझीलंडच्या फलंदाजीत वेलिंग्टन स्टेडियमवरील उपस्थित प्रेक्षक चौकार आणि षटकारांच्या पावसात न्हाऊन निघाले. सलामीवीर मार्टीन गप्तीलच्या वादळात वेस्ट इंडिजचे गोलंदाज जमिनदोस्त झाले. गप्तीलने १६३ चेंडूत २४ चौकार आणि ११ खणखणीत षटकारांसह २३७ धावांची नाबाद खेळी साकरली. विशेष म्हणजे, गप्तीलच्या खेळीत नाहक पुढे जाऊन अंदाधुंदी मारलेला फटका एकही नव्हता. त्याने लगावलेले सर्व षटकार बॅकफूटवरून सहजगत्या मारलेले विश्वासू फटके होते. 
सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया न्यूझीलंडने मॅक्युलम आणि चांगल्या फॉर्मात असलेल्या विल्यम्सन या दोन महत्त्वाच्या फलंदाजांना स्वस्तात गमावल्यानंतर गप्तील आणि रॉस टेलरने संयमी खेळी करत न्यूझीलंडच्या धावसंख्येला आकार देण्यास सुरूवात केली. गप्तीलने आपल्या भात्यातील ठरावीक नजाकती फटक्यांचे दर्शन घडवत उपस्थितांना भारवून सोडले. गप्तीलने १११ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. शतक गाठल्यानंतर गप्तीलच्या खेळीला आणखी बहर येण्यास सुरूवात झाली.   रॉस टेलर गप्तीलला साजेशी साथ देत ४२ धावा केल्या. टेलर बाद झाल्यानंतर अँडरसनने आपल्या स्फोटक अंदाजात खेळीची सुरूवात केली. पण, मोठा फटका मारण्याच्या नादात अँडरसन ख्रिस गेलला झेल देऊन बसला. शतक झळकावल्यानंतर गप्तीलच्या फलंदाजीला बहर आला असून त्याने कारकीर्दीतील पहिले तर, विश्वचषक स्पर्धेत द्विशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. टीम इंडियाच्या रोहित शर्माच्या २६४ धावांच्या विक्रमाशी बरोबरी मात्र त्याला करता आली नाही. पन्नास षटकांच्या अंती गप्तील २३७ धावांवर नाबाद राहिला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्याचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंड संघाने घेतला. कर्णधार मॅक्युलमने सुरूवातीच्या षटकांत जोरदार फटकेबाजी करण्यास सुरूवात केली खरी परंतु, मोठी खेळी करण्यात मॅक्युलमला अपयश आले. ब्रँडन मॅक्क्युलम नाहक फटका मारून १२ धावांवर झेलबाद होऊन माघारी परतला. त्यानंतर मैदानात जम बसवण्यास सुरूवात झाली असतानाच केन विल्यम्सन ३३ धावांवर बाद झाला.

सामनावीर- मार्टीन गप्तील