extra ‘एसएबी-बाऊचर कन्सव्‍‌र्हेशन नॉन प्रॉफिट कंपनी (एनपीसी)’ हा मिलरच्या बॅटवरील ‘लोगो’ सहज सर्वाचे लक्ष वेधून घेतो. हाच लोगो अष्टपैलू अ‍ॅल्बी मॉर्केलच्या बॅटवरही आहे. मिलर आपल्या खेळीतून साकारलेल्या पैशाचा वाटा या संस्थेसाठीही देतो. याचप्रमाणे मिलरच्या यशात ऑस्ट्रेलियाचा सिंहाचा वाटा आहे. एकलव्य जसा द्रोणाचार्याचा पुतळा समोर ठेवून धनुर्विद्या शिकला. त्याचप्रमाणे मिलरने ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर मॅथ्यू हेडनची खेळी पाहून क्रिकेटपटू बनण्याचे स्वप्न साकारले.
मिलरच्या बॅटच्या लोगोमधील बाऊचर म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा माजी यष्टिरक्षक-फलंदाज मार्क बाऊचर. ९ जुलै २०१२ हा दिवस बाऊचरसाठी काळरात्र ठरला. लेग-स्पिनर इम्रान ताहीरचा चेंडू यष्टीला लागून उडालेल्या बेल्सने बाऊचरच्या डोळ्यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे बाऊचरची कारकीर्द अकाली संपुष्टात आली. परंतु क्रिकेटपासून संन्यास घेतल्यानंतर बाऊचर शांत बसला नाही, तर काही दिवसांतच आफ्रिकेतील गेंडय़ांच्या संवर्धनाचे शिवधनुष्य त्याने उचलले. याच कार्यात मिलर आणि मॉर्केलसुद्धा सामील झाले आहेत. दक्षिण आफ्रिका हा निसर्गाचे वरदान लाभलेला देश. भारतात जशी व्याघ्रबचाव मोहीम सुरू आहे, तशीच तिथे गेंडय़ांसाठी सुरू आहे. २०१२मध्ये ५८० गेंडय़ांची अवैध शिकार झाल्याचे अहवाल सांगतो. या देशात १८ हजारांच्या आसपास गेंडे आहेत. त्यांची मोजणी करण्याचे कार्य व्हॅटर्निटी जेनेटिक्स लॅबोरेटरी करीत आहे. त्याच्यासाठी आर्थिक तरतूद ही संस्था करीत आहे. या अभियानाद्वारे दहा लाख डॉलरचा निधी जमा करण्याचे प्राथमिक लक्ष्य या संस्थेने समोर ठेवले आहे.
मिलरच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्दीला प्रारंभ झाला २०१० साली. परंतु आता तो एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा आधारस्तंभ आहे. आयपीएलमध्ये ग्लेन मॅक्सवेल आणि मिलर ही जोडगोळी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या यशाची शिल्पकार आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेचे मैदानावरील वैर जरी प्रचलित असले तरी मिलरच्या क्रिकेट कारकीर्दीमागील प्रेरणा ही ऑस्ट्रेलियाचीच आहे. हेडनच्या खेळी टीव्हीवर पाहून आपणसुद्धा त्याच्यासारखे क्रिकेटपटू व्हायचे, असा निर्धार मिलरने केला. तसे मिलरचे कुटुंब खेळावर निस्सीम प्रेम करणारे. वडील क्लब दर्जाचे क्रिकेटपटू असल्यामुळे क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि स्क्वॉशचे धडे त्याला शालेय दिवसांतच मिळू लागले. हेडनला गोलंदाजांवर हल्लाबोल करीत मैदानावर चौफेर फटकेबाजी करताना पाहण्याचा त्याला बालपणी लळा लागला. १७व्या वर्षीच त्याने प्रथम श्रेणीत पदार्पण केले. डॉल्फिनकडून स्थानिक क्रिकेट यशस्वीपणे बहरल्यानंतर मिलर यॉर्कशायर संघात सामील झाला, परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच तो अधिक रमला. तिथे ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज जेसन गिलेस्पी या प्रशिक्षकाने या हिऱ्याला पैलू पाडले. खेळाची रणनीती शिकवून हेडनप्रमाणे कारकीर्द घडवण्याच्या त्याच्या स्वप्नाला हातभार लावला. मग आयपीएलमध्ये पंजाबकडून खेळताना अ‍ॅडम गिलख्रिस्ट आणि डेव्हिड हसी यांचे मार्गदर्शन त्याला मिळत आहे. मोठे फटके खेळण्यात वाकबदार असलेल्या मिलरचा २०११च्या विश्वचषकासाठी संभाव्य संघात समावेश करण्यात आला होता. परंतु अंतिम संघनिवडीत त्याला स्थान मिळू शकले नव्हते. परंतु यंदाच्या विश्वचषकात संधी मिळताच मिलरने त्याचे सोने केले. दक्षिण आफ्रिकेला कठीण परिस्थितीतून तर बाहेर काढलेच आणि संघाच्या विजयी सलामीचा तो शिल्पकार ठरला.
प्रशांत केणी