मोहब्बत बरसा देना तू, सावन आया है.. हेच गाणं त्या सेलिब्रेटी प्रेमीयुगुलाच्या ओठांवर घोळत होतं. विवाहाच्या दिवशी पाऊस पडणं, हा शुभशकुन मानला जातो. परंतु ऑकलंडला त्या दिवशी मुसळधार पावसानं झोडपलं होतं. त्यामुळे पावसानं थोडी विश्रांती घ्यावी, याकरिता अनेक जण प्रार्थना करीत होते. न्यूझीलंडचा आघाडीचा फलंदाज मार्टिन गप्तील आणि टीव्ही सूत्रसंचालक-रेडिओ जॉकी लॉरा मॅकगोल्डरिक यांच्या विवाहाकडे सर्वाचे लक्ष लागून राहिले होते. सेंट ल्यूक चर्चपाशी लॉराची कार येऊन थांबली. एखाद्या अप्सरेप्रमााणे भासणाऱ्या पांढऱ्याशुभ्र गाऊनमधील लॉरानं कारचा दरवाजा उघडून पाऊल खाली ठेवलं आणि पावसानं ‘तथास्तु’ म्हणत पळ काढला. चाहत्यांची प्रार्थना फळास आली होती. मग काही काळातच सूर्यमहाराज प्रसन्न झाले आणि सारा आसमंत उजळून निघाला. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये अपेक्षेप्रमाणेच मोठा गाजावाजा करीत मार्टिन आणि लॉराचा विवाहसोहळा पार पडला.

मार्टिन-लॉराच्या प्रेमकथेला सुरुवात झाली २०११मध्ये. एका क्रिकेट कार्यक्रमांतर्गत मार्टिनची तिला मुलाखत घ्यायची होती. तिच्या टीव्ही कारकीर्दीतील हा जेमतेम दुसरा कार्यक्रम होता. मार्टिन आपल्या क्लबचे टी-शर्ट परिधान करून त्या कार्यक्रमाला हजर राहिला. या पहिल्याच भेटीत मार्टिनचा त्रिफळा उडाला. लॉराची ती मुलाखत फारशी चांगली झाली नव्हती. परंतु तिच्या आयुष्याचा साथीदार मात्र तिला मिळाला होता. मग ती दोघंही एकमेकांसोबत वेळ घालवू लागली. यातूनच या मैत्रीचं प्रेमात रूपांतर व्हायला वेळ लागला नाही.
मार्टिननं लॉराला विवाहाची मागणी घातली, तीसुद्धा कथा तितकीच रोचक आहे. १५० किमी ताशी वेगानं येणाऱ्या चेंडूला सामना करतानाही जितकं दडपण येणार नाही, तितकं मोठं ओझं घेऊन तो तिच्यासोबत मॉय समुद्रकिनाऱ्यावरून चालत होता. त्याच्या खिशात खास तयार करून घेतलेली हिरेजडित अंगठी होती. नेमकं काय बोलायचं, याकरिता मनात असंख्य शब्दांची जुळवाजुळव सुरू होती. न्यूझीलंडकडून पदार्पण करतानाही मार्टिन इतका चिंताग्रस्त झाला नव्हता. अखेर मार्टिननं हिमतीनं लॉराला, ‘‘माझ्या आयुष्याची जोडीदार होशील का?’’ हा प्रश्न विचारला. तिला या धक्क्यातून सावरायला थोडा वेळ लागला. ती शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. समोर खळाळणाऱ्या समुद्राच्या लाटाही क्षणभर स्तब्ध झाल्याचा भास मार्टिनला झाला. हृदयातील स्पंदनं अधिक वेगानं धडधड करू लागली.. आणि तिनं ‘हो’ म्हटलं. मार्टिनच्या आनंदाला पारावार नव्हता.
नावाजलेल्या क्रिकेटपटूची पत्नी असल्यामुळे ‘काहीतरी विशेष माहिती काढ’ असं तिला तिचे सहकारी सांगतात. परंतु व्यावसायिक कारकीर्द आणि खासगी आयुष्य याची मी अजिबात गल्लत करणार नाही, असं ती त्यांना खडसावून सांगते. वाहिन्यांकरिता क्रीडा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणारी लॉरा आतासुद्धा विश्वचषक स्पध्रेच्या निमित्तानं आपल्या कामात व्यग्र आहे. या वेळापत्रकातून जेव्हा तिला वेळ मिळतो, तेव्हा स्टार फाउंडेशनच्या समाजकार्यात ती हिरिरीने सहभागी होते.
न्यूझीलंड संघाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असलेल्या मार्टिनला ‘गप्पी’, ‘द फिश’ आणि ‘मार्टी टू-टोज’ या टोपणनावांनी संबोधलं जातं. त्याचं आयुष्य सावरून क्रिकेटपटू म्हणून घडण्यासाठीची प्रेरणासुद्धा या टोपणनावांमध्ये दडली आहे. मार्टिन १४ वर्षांचा असताना एका ट्रक अपघातामध्ये त्याला पायाची तीन बोटं गमवावी लागली. गप्तील जेव्हा इस्पितळात होता, तेव्हासुद्धा क्रिकेटनामाचा त्याचा जप सुरू होता. शालेय स्तरापासूनच क्रिकेट खेळत असल्यामुळे आता आपण खेळाडू म्हणून संपलो, असं नैराश्य त्याच्या मनात दाटलं होतं. परंतु मार्टिनच्या वडिलांनी माजी कर्णधार जेफ क्रो यांच्याशी संवाद साधून आपली कैफियत मांडली. जर एखादा न्यूझीलंडचा खेळाडू मार्टिनला भेटायला आला तर ते त्याच्यासाठी प्रेरणादायी ठरू शकेल, असं त्यांनी क्रो यांना सांगितलं. एका पित्याच्या विनंतीचा मान ठेवून क्रो यांनी पुढच्याच दिवशी तत्कालीन किवी संघनायक स्टीफन फ्लेमिंगला मार्टिनची भेट घेण्यासाठी इस्पितळात धाडले. साक्षात फ्लेमिंगला समोर पाहून मार्टिनचं दु:ख आणि वेदना कुठल्या कुठे पळून गेल्या. वडिलांची मात्रा लागू पडली आणि मार्टिननं पुन्हा आपल्या महत्त्वाकांक्षेचा मार्ग पत्करला; अन्यथा एका गुणवान क्रिकेटपटूला किवी क्रिकेट मुकलं असतं.