विश्वचषक क्रिकेट स्पध्रेच्या निमित्ताने विविध वृत्तवाहिन्यांवर माजी क्रिकेटपटू विश्लेषण आणि परिसंवादांमध्ये सहभागी होतात. जगप्रसिद्ध ‘बीबीसी’ वाहिनीवरही अशा स्वरुपाचा कार्यक्रम प्रक्षेपित होतो. मात्र यामध्ये एका तोतया क्रिकेटतज्ज्ञाने सहभागी होत खळबळ उडवून दिली आहे.
नदीन आलम या इसमाने पाकिस्तानी माजी खेळाडू नदीम अब्बासी असल्याची बतावणी करत बीबीसी वर्ल्ड न्यूज, बीबीसी एशियन नेटवर्क, रेडिओ फाइव्ह लाइव्ह कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. या कार्यक्रमात भारताचा माजी खेळाडू आकाश चोप्राही सहभागी झाला होता. ४६ वर्षीय अब्बासी यांनी तीन कसोटीत पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले होते. सध्या रावळपिंडी येथे ते युवा खेळाडूंना मार्गदर्शन करतात.
‘‘देशाची प्रतिष्ठा मलिन केल्याबद्दल नदीम आलमला मारहाण करावीशी वाटते,’’ असे उद्विग्न उद्गार अब्बासी यांनी काढले. ते पुढे म्हणाले, ‘‘बीबीसी प्रतिष्ठित संस्था आहे. त्यांनी आलमविषयी सत्यता तपासून पाहायला हवी होती.’’ दरम्यान, याप्रकरणी बीबीसीने अब्बासी यांची माफी मागितली असून, यासंदर्भात सविस्तर चौकशी करण्यात येईल, असेही स्पष्ट केले आहे.