03 April 2020

News Flash

वॉप्रमाणे क्लार्कची विजयी झेप

‘‘या वाह्य़ात बातम्या पसरवणारा कोण तो दीडशहाणा?’’- हा संतप्त सवाल होता, कांगारू कर्णधार स्टीव्ह वॉचा.

| March 30, 2015 12:32 pm

‘‘या वाह्य़ात बातम्या पसरवणारा कोण तो दीडशहाणा?’’- हा संतप्त सवाल होता, कांगारू कर्णधार स्टीव्ह वॉचा. १९९९ मधील विश्वचषक मोहिमेस अपशकुन करणाऱ्या प्रवृत्तींना जाब विचारणाऱ्या स्टीव्ह वॉचा. logo03त्यानंतर १६ वर्षांनी अ‍ॅलन बॉर्डर, स्टीव्ह वॉ अन् रिकी पॉन्टिंग यांची यशस्वी परंपरा चालवण्याची जबाबदारी उचलणाऱ्या मायकल क्लार्कला. काही अंशी १९९९च्याच फेऱ्यातून जावं लागलंय.
२०१५च्या विश्वचषकाचे संयुक्त संयोजक हेच ठरले जेतेपदाचे अव्वल दावेदार, पण प्रतिस्पर्धी संघनायकांच्या वाटचालीत व कामगिरीत तफावत आहे जमीन-अस्मानाची. न्यूझीलंड संघनायकाचा खेळ सातत्यानं स्फोटक व त्याच्या सहकाऱ्यांचं काम सोपं करणारा. त्यातूनच तो सलामीला येत असल्यानं, संघाला योग्य मार्ग दाखवणारा. याउलट क्लार्क फॉर्मात नसलेला. त्यामुळे सूर गवसलेल्या स्टीव्ह स्मिथ व ग्लेन मॅक्सवेल या ताज्या दमाच्या फटकेबाजांना प्राधान्य देणारा. संघहित व स्वत:चा अडखळता फॉर्म लक्षात घेऊन, अन् स्वत: कर्णधार असूनही फलंदाजीतील स्वत:चा क्रमांक निश्चित करू न शकणारा.
विश्वचषक मोहिमेतील कांगारूंची यंदाची सुरुवात काहीशी १९९९मधील स्टीव्ह वॉच्या संघासारखी. तेव्हा सर्वप्रथम स्कॉटलंडविरुद्ध मिळमिळीत विजय. मग पाठोपाठच्या झुंजींत न्यूझीलंड व पाकिस्तानकडून पराभूत. यंदाही न्यूझीलंडकडून पराजयाचा धक्का. मग पावसामुळे बांगलादेशविरुद्धचा सामना अनिर्णीत, अन् कांगारूंच्या खात्यात विजयाच्या दोन गुणांऐवजी एकच गुण जमा. त्यामुळे जाणवल्या १९९९मधील विजयाआधीच्या अडचणी. किंबहुना १९९९ व २००३ व २००७मधील विश्वचषक विजयांच्या हॅट्ट्रिकआधीचं अग्निदिव्य.
पाठदुखीने दीर्घकाळ बेजार झालेल्या क्लार्कला या वेळी ऑस्ट्रेलियन प्रसिद्धी माध्यमांनी सतत फैलावर घेतलेलं आहे. क्लार्क व वॉटसन हे गुणी व दर्जेदार खेळाडू. पण संघातील जागा ते अडवून ठेवत आहेत. क्लार्कऐवजी मूळ कप्तान जॉर्ज बेली आणि वॉटसनऐवजी जेम्स फॉकनर किंवा मिचेल मार्श यांना पसंती द्यावी, अशी मागणी ऑस्ट्रेलियन वर्तमानपत्रं व चॅनल्स करत आहेत. १९९९मध्येही स्टीव्ह वॉ व शेन वॉर्न या दोन बडय़ा खेळाडूंत बेवनाव असल्याची बातमी ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या (एबीसी) टिम लेनने दिली होती. तिथेच मग भडका उडाला होता आणि पत्रकारांनी काही प्रश्न विचारण्याआधीच वॉने तावातावाने सवाल केला होता, ‘‘या वाह्य़ात बातम्या पसरवणारा दीडशहाणा कोण?’’
वॉर्नची ग्वाही
पाकिस्तान सामन्याआधी नीतिधैर्य खच्ची करू पाहणाऱ्या या निराधार पत्रकारितेवर वॉचा हल्लाबोल. तितक्याच निर्भयतेनं व प्रांजळपणे टिम लेननं हात उंचावत जबाबदारी स्वीकारली होती. मग स्टीव्ह वॉने बोलावलं वॉर्नला. कोणताही बेवनाव नसल्याची ग्वाही दिली वॉर्ननं. ते प्रकरण तिथं संपलं, पण दुसऱ्या दिवशी पाककडून मार खाणाऱ्या स्टीव्ह वॉच्या संघापुढील समस्या कायम राहिल्या.
कांगारूंच्या त्या विश्वचषक मोहिमेस पाश्र्वभूमी होती राष्ट्रकूल क्रीडास्पर्धाची. त्यात क्रिकेटचा समावेश होता. तेव्हा जलतरणातील ताऱ्या-सिताऱ्यांशी स्टीव्ह वॉचा संबंध आला क्रीडा नगरीत. त्यांच्या जीवनशैलीनं, त्यांच्या तंदुरुस्तीनं, दारूला दूर ठेवण्याच्या त्यांच्या शिस्तीनं वॉ प्रभावित झाला होता. त्यानं आदेश दिला :  १९८७ला बॉर्डरच्या नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या संघानं (ज्यात स्टीव्ह वॉचं योगदान उत्तम होतं.) स्पर्धा चालू असताना दारूपानावर बंदी घातली होती. तशीच ९९च्या विश्वचषक मोहिमेतही घालायची. त्याला खूप विरोध झाला. स्टीव वॉने समझौता केला. सामन्याआधीच्या दिवशी थोडी बीयर, वाइन चालेल. सामना संपल्यानंतरच मद्यपान करा. रात्रीची कर्फ्यू मध्यरात्रीची. त्यातली लवचीकपणा आणण्यास वॉ तयार झाला. पण हे प्रकरण एवढय़ावर थांबत नव्हतं. खेळाडूंच्या मनात दडलेली गाऱ्हाणी, आक्षेप, शंका-कुशंका यांचं निरसन होणं गरजेचं होतं. प्रशिक्षक जेफ मार्शने संघबैठक बोलावली. साऱ्यांनी मोकळेपणानं मनं मोकळी करावीत आणि साऱ्यांचं शंका-निरसन होईपर्यंत बैठक चालू राहील, असं स्पष्ट केलं. त्या बैठकीनंतरचं पाऊल टाकलं टॉम मूडीनं. स्टीव्ह वॉ, जेफ मार्श, शेन वॉर्न, पॉन्टिंग व मूडी यांनी डरहॅमच्या ‘पिझ्झा हट’मध्ये रात्रभर पार्टी केली. ऑस्ट्रेलियाला विश्वचषक प्रथमच मिळवून देणाऱ्या १९८७च्या संघाचे कर्णधार अ‍ॅलन बॉर्डर होते खास निमंत्रित. रात्रभर रंगलेल्या त्या पार्टीचा मेनू काय होता? वॉर्नचा आवडता मार्झारिटा पिझ्झा आणि माफक मद्यपान; पण मुख्य डिश होती- १९८७ ची विश्वचषक मोहीम. १९८९ व ९३च्या अ‍ॅशेस मालिका. उजाळा दिला गेला कांगारूंच्या विजयी खेळाला. ऑस्ट्रेलियन गोटातील निराशावाद दूर होत गेला. त्या मोहिमेतील शेवटची पावलं टाकली स्टीव्ह वॉ व वॉर्न यांनी जोडीनं. सुप्रसिद्ध हाइड पार्कमध्ये ते पोटभर बोलले. विसंवादातून संवादाकडे संघ गेला!
ह्य़ूजला श्रद्धांजली
दुखापती आणि फॉर्मला क्लार्कनं. फिटनेस सिद्ध करण्यास त्याला काही दिवसांच्या मुदती दिल्या होत्या कडक प्रशिक्षक डॅरेन लेहमन यांनी. क्लार्क, जॉर्ज बेली व स्मिथ अशा तीन संघनायकांच्या तलवारी एका म्यानात ठेवणं ही केवढी तारेवरची कसरत. अशा वेळी संघाला प्रेरणा देणाऱ्या दोन गोष्टी क्लार्कनं कौशल्यानं वापरल्या. क्रिकेट मैदानात चेंडूचा घाव वर्मी लागल्यामुळे फिल ह्य़ूज निधन पावला. शोकाकुल ऑस्ट्रेलियानं भारतीय क्रिकेट मालिकेच्या कार्यक्रमात चक्क फेरफार केले! ह्य़ूजशी सारे कांगारू भावनात्मक जोडलेले. त्याच्या स्मृतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी विश्वचषक जिंकलाच पाहिजे, अशी हवा तयार केली.
या वातावरणास उठाव देणारा क्लार्कचा धडाकेबाज फटका म्हणजे विश्वचषकाच्या अखेरीस एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा. ज्या फेऱ्यातून स्टीव्ह वॉने १९९९मध्ये मार्ग शोधला त्यातूनच आता क्लार्कने. क्लार्कने आपल्यापुढील समस्यांतून यशस्वीरीत्या सुटका करून घेतली. ह्य़ूजला आदरांजली व कर्णधार क्लार्कला निरोपाची भेट यांनीही प्रेरित झेलेले कांगारू विश्वचषक जिंकले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 30, 2015 12:32 pm

Web Title: michael clarke retires from odis as steve waugh
Next Stories
1 आता सेलिब्रेशन!
2 BLOG : ऑस्ट्रेलिया – अव्वल दर्जाशी तसूभर तडजोड न करण्याची संस्कृती
3 विराट, अनुष्काच्या वैयक्तिक जीवनाचा आदर करायला हवा- युवराज सिंग
Just Now!
X