पाकिस्तानला पराभूत करत ऑस्ट्रेलियाचा संघ उपांत्य फेरीत दाखल झाला असून त्यांच्यापुढे आता भारताचे आव्हान असेल. भारताची या स्पर्धेतील कामगिरी पाहता त्यांच्यावर विजय मिळवणे अवघड दिसत आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मायकेल क्लार्कनेही नेमकी हीच गोष्ट बोलून दाखवली आहे. उपांत्य फेरीत भारताला नमवणे कठीण असल्याचे मत क्लार्कने व्यक्त केले आहे.
‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या सुरुवातीला भारतीय संघ जसा वाटत होता, तसा तो आता नक्कीच नाही. विश्वचषकामध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली आहे, त्यामुळे त्यांची कामगिरी पाहता त्यांना नमवणे आमच्यासाठी कठीणच आहे,’’ असे क्लार्क म्हणाला.
भारताविरुद्धच्या सामन्याबद्दल क्लार्क म्हणाला की, ‘‘विश्वचषकापूर्वी भारतीय संघाने बराच वेळ ऑस्ट्रेलियामध्ये व्यतीत केलेला आहे. त्यामुळे त्यांना इथल्या वातावरणाबरोबर खेळपट्टीचीही चांगली माहिती आहे. त्यामुळे उपांत्य फेरीचा सामना हा आमच्यासाठी मोठे आव्हान असेल. या सामन्यासाठी आम्ही सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू.’’
उपांत्य फेरीचा सामना सिडनीला होणार असून ही खेळपट्टी फिरकीला पोषक असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने ऑस्ट्रेलियापेक्षा भारतालाच अधिक पसंती दिली आहे. याबाबत क्लार्क म्हणाला की, ‘‘या सामन्यासाठी खेळपट्टी कशी असेल, हे पाहावे लागेल. खेळपट्टीवर गवत ठेवले तर वेगवान गोलंदाजांना चांगला फायदा होईल आणि जर फिरकीला पोषक असेल तर आमच्या संघातही फिरकीपटू आहेत. जशी खेळपट्टी असेल त्यानुसारच आम्ही संघ निवडणार आहोत.’’

ऑस्ट्रेलियाचे पारडे जड – हेझलवूड
अ‍ॅडलेड : ‘‘भारतापेक्षा ऑस्ट्रेलियाला मनोबलाचा जास्त फायदा होईल, कारण यापूर्वी झालेल्या कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये आम्ही त्यांच्यावर विजय मिळवले आहेत. या सामन्यांमध्ये भारताचा खेळ आम्ही जवळून पाहिला असून त्यांच्यावर मात करण्यातही यशस्वी ठरलो आहोत आणि त्याचाच फायदा होईल. कारण या सामन्यासाठी आमचे मनोबल चांगलेच उंचावलेले आहे,’’ असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हॅझलवूड म्हणाला.

मिसबाहची भारतालाच पसंती
अ‍ॅडलेड : ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यामध्ये दुसरा उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. सामना ऑस्ट्रेलियात असल्याने यजमान वरचढ असल्याचे काही जणांना वाटत असले तरी पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हकने या सामन्यासाठी भारतालाच पसंती दिली आहे. सिडनीची खेळपट्टी फिरकीसाठी पोषक असल्याने ऑस्ट्रेलियापेक्षा भारताचेच पारडे वरचढ असल्याचे मिसबाहला वाटते.

भारताविरुद्ध स्टार्कची कामगिरी महत्त्वाची -मार्श
सिडनी : ‘‘भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांनी आतापर्यंत कामगिरीमध्ये सातत्य दाखवले आहे. भारताच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला असून वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने भेदक गोलंदाजी केली आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या सामन्यात स्टार्कची कामगिरी महत्त्वाची ठरेल,’’ असे ऑस्ट्रेलियाचे माजी सलामीवीर जेफ मार्श यांनी सांगितले.

पराभवाची मालिका भारताने लक्षात ठेवावी -मॅक्सवेल
सिडनी : ‘‘ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील एकदिवसीय स्पर्धेत भारताला एकही सामना जिंकता आला नव्हता. एकामागून एक त्यांच्या पदरी पराभव पडले होते. त्यामुळे भारताने ही पराभवाची मालिका लक्षात ठेवावी. आम्ही आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करत एकामागून एक विजय मिळवले आहेत. या मोसमात एकदिवसीय सामन्यांमध्ये आम्ही नेत्रदीपक कामगिरी केली आहे, असे ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेल म्हणाला.