‘‘पैशाचा मला अजिबात मोह नाही. जमेल तितक्या वेगात चेंडू टाकायचा व समोरच्या फलंदाजाच्या यष्टय़ा उद्ध्वस्त करायच्या, हेच माझं लक्ष्य असतं. त्या यष्टय़ा उडाल्यावर जो ध्वनी उमटतो, तो ऐकण्यासाठी माझे कान नेहमी आतुर असतात, नव्हे ते माझं टॉनिक आहे!’’ हे उद्गार आहेत २४ वर्षीय मोहम्मद शमीचे. wc09तो आता भारतीय संघातील एक महत्त्वाचा वेगवान गोलंदाज झाला आहे. त्याच्या या यशस्वी कारकीर्दचं श्रेय जातं ते त्याचे वडील तौसिफ अली यांना.
उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्हय़ापासून २० किलोमीटर अंतरावरील साहसपूर या गावी तौसिफ यांचं ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या सुटय़ा भागांचं दुकान आहे. तौसिफ यांनासुद्धा वेगवान गोलंदाजीचा नाद; पण पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्याकडे लक्ष अधिक केंद्रित झाल्यामुळे त्याकडे त्यांचं दुर्लक्ष झालं. तरीही आपल्या मुलानं वेगवान गोलंदाज होऊन देशाचं नाव मोठं करावं, असं स्वप्न मात्र त्यांनी जिवापाड जोपासलं होतं. शमीचे तिन्ही भाऊ वेगवान गोलंदाज. गंभीर आजारपणामुळे मोठय़ा भावाची कारकीर्द अकाली संपुष्टात आली. त्यामुळे तो वडिलांना व्यवसायात मदत करू लागला. शमीच्या गुणवत्तेला पैलू पाडण्यासाठी त्याचं महाविद्यालयीन शिक्षण चालू असतानाच तौसिफ यांनी त्याला बद्रुद्दीन सिद्धिकी यांच्याकडे नेलं, कारण साहसपूरला कोणत्याही प्रकारच्या क्रिकेट प्रशिक्षणाची सुविधा उपलब्ध नव्हती. ना मैदाने होती, ना खेळपट्टय़ा. फक्त चिखलाचं साम्राज्य होतं. २४ तासांपैकी बरेचसे तास हे आजही तिथं भारनियमन असतं.
२००५ मध्ये उत्तर प्रदेशच्या १९ वर्षांखालील संघाच्या निवडचाचणीसाठी शमीसुद्धा मोठय़ा उत्साहात सहभागी झाला; परंतु तिकडच्या राजकारणाचा फटका बसल्यामुळे त्याच्या नावाचा विचार झाला नाही. त्यामुळे त्याचं वर्ष वाया जाणार होतं व वर्षभरानंतरसुद्धा संधी मिळेलच याची खात्री नव्हती. या परिस्थितीचा अंदाज आल्यामुळे सिद्दिकी यांनी शमीला कोलकातामध्ये पाठवण्याचा सल्ला त्याच्या वडिलांना दिला. त्यांनी तो शिरसावंद्य मानला.
तेज गोलंदाज होण्याचं स्वप्न घेऊन शमी कोलकातामध्ये आला. डलहौसी अ‍ॅथलेटिक क्लबकडून त्यानं खेळायला सुरुवात केली. प्रत्येक सामन्याला पाचशे रुपये मानधन मिळायचे आणि रात्री झोपण्यासाठी मैदानाच्या सीमारेषेबाहेरील तंबूचा आसरा असायचा. आयुष्याशी त्याचा झगडा सुरू असताना एके दिवशी डलहौसी क्लबच्या सुमन चक्रवर्ती यांनी बंगाल क्रिकेट असोसिएशनचे माजी सहसचिव देवव्रत दास यांना शमीची गोलंदाजी दाखवली. ‘‘नया हिरा है, ध्यान दो, नहीं तो खो जायेगा.’’ हेच शब्द चक्रवर्ती यांनी उद्गारले होते. क्रिकेटमधील जवाहीर असलेल्या दास यांना चक्रवर्ती यांच्या शब्दाचे मोल कळले. त्यांनी शमीसमोर टाऊन क्लबकडून खेळायचा प्रस्ताव ठेवला. ७५ हजार रुपये वर्षांचे मानधन आणि प्रत्येक दिवशी भोजनासाठी १०० रुपये असा हा करार होता; परंतु शमीनं धीटपणे ‘‘मी राहायचं कुठे?’’ अशी आपली अडचण त्यांच्यासमोर मांडली. दास यांनी क्षणाचीही उसंत न घेता, ‘‘माझ्या घरी!’’ असं त्याला सांगितलं. त्यानंतर शमीला घेऊन दास घरी गेले आणि पत्नीला आपला निर्णय सांगितला, ‘‘हा मुलगा आजपासून आपल्यासोबत राहील!’’
मग शमीनं आपल्या मेहनतीनं बंगालच्या २२ वर्षांखालील संघात स्थान मिळवलं. मग दास यांनी शमीला मोहन बागान क्लब या कोलकातामधील एका नामांकित संघाकडून खेळण्याचा सल्ला दिला. या ठिकाणी एके दिवशी ईडन गार्डन्सच्या नेटमध्ये शमीला साक्षात सौरव गांगुलीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. शमीच्या गोलंदाजीच्या कौशल्यानं गांगुली भलताच प्रभावित झाला आणि त्यानं बंगाल क्रिकेटधुरीणांना सांगितलं की, ‘‘शमीची काळजी घ्या, तो भारताचं भविष्य आहे!’’
त्यानंतर २०१०मध्ये शमी बंगालच्या रणजी संघात सामील झाला. मग २०११ मध्ये आयपीएलसाठी कोलकाता नाइट रायडर्सनं त्याला करारबद्ध केलं, तर २०१२ मध्ये भारत ‘अ’ संघात त्याची वर्णी लागली. २०१३मध्ये अशोक दिंडाला दुखापत झाल्याने पाकिस्तानविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत शमीला पदार्पणाची संधी मिळाली. मग नोव्हेंबरमध्ये कोलकाताच्या इडन गार्डन्सवर विंडीजविरुद्ध कसोटी पदार्पणात पहिल्या डावात ४ व दुसऱ्या डावात ५ बळी मिळवत त्यानं संधीचं सोनं केलं. आता शमीच्या खात्यावर १२ कसोटी सामन्यांत ४७ बळी व ४३ एकदिवसीय सामन्यांत ७९ बळी जमा आहेत.
शमी जेव्हा कोलकातामध्ये आला, तेव्हा त्याच्याजवळ काहीच नव्हतं. फक्त वेगवान गोलंदाजी व स्वप्न या दोनच गोष्टी त्याच्याजवळ होत्या. एके काळी डलहौसी क्लबच्या प्रांगणातील शमीची निवासव्यवस्था असणाऱ्या तंबूचं आता सदस्यांसाठीच्या आलिशान रेस्टॉरंट व बारमध्ये रूपांतर झालं आहे. शमीचे दिवसही आता पालटले आहेत. कोलकातामध्ये त्याचं स्वत:चं घर आहे, दिमतीला गाडी आहे. गेल्याच वर्षी त्याचा विवाह झाला. शमीच्या कर्तृत्वाचा जसा बंगालवासीयांना अभिमान आहे, तसाच उत्तर प्रदेशमधील नागरिकांनाही आहे.