मोहम्मद शमी आणि उमेश यादव यांच्या विश्वचषकातील कामगिरीने पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर प्रभावित झाला आहे. हे दोघेही जागतिक दर्जाचे गोलंदाज होण्याचा मार्गावर असल्याचे मत अख्तरने व्यक्त केले. भारताच्या यशात या जोडगोळीचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचेही त्याने सांगितले.
‘‘पाच सामन्यांत ५० बळी, हे प्रदर्शन अद्भुत आहे. या दोघांची प्रगल्भ कामगिरी कौतुकास्पद आहे. थोडय़ाच कालावधीत जगातील सवरेत्कृष्ट गोलंदाजांमध्ये त्यांची गणना होईल,’’ असे अख्तरने सांगितले.
आर्यलडविरुद्ध शमीने निर्णायक क्षणी बळी मिळवले. यामुळे आर्यलडचा डाव २५९ धावांतच आटोपला. उमेश यादवने पाच सामन्यांत सात बळी मिळवले आहेत. धावा रोखणे आणि बळी मिळवणे या दोन्ही पातळ्यांवर उमेशने संघव्यवस्थपनाचा विश्वास सार्थ ठरवला आहे.
तो पुढे म्हणाला, ‘‘या दोघांना एकत्रित गोलंदाजी करताना पाहणे हा आनंददायी अनुभव आहे. हॅमिल्टनच्या सेडन पार्कची खेळपट्टी गोलंदाजांना साहाय्यकारी होती. मात्र चेंडू बॅटवर व्यवस्थित येत होता. मात्र तरीही त्यांना शानदार गोलंदाजी केली.’’
गोलंदाजीच्या रनअपमध्ये बदल करण्याविषयी शोएब अख्तरनेच मोहम्मद शमीला मार्गदर्शन केले होते. छोटा रनअपने शमीच्या गोलंदाजीला भेदकता प्राप्त झाली.