भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी निराशाजनक बातमी आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गुडघ्याच्या दुखापतीमुळे यूएईविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे. सरावादरम्यान मोहम्मद शमीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर काढण्यात आलेल्या ‘एक्स रे’ मध्ये दुखापत कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. पर्थमध्ये भारत आणि यूएई संघात शनिवारी सामना होणार आहे. ऐन विश्वचषकात टीम इंडियाच्या वेगवान गोलंदाजीचा सध्याचा हुकमी एक्का दुखापतग्रस्त झाल्याने संघासाठी चिंतेची बाब आहे.
भुवनेश्वर कुमार दुखापतीशी झगडत असताना मोहम्मद शमीने मोठ्या हिमतीने पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडली होती. यूएई विरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या जागी मुंबईकर धवल कुलकर्णीला संधी मिळण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धी संघ कमकुवत जरी असला तरी इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार आणि आता मोहम्मद शमी हे मुख्य गोलंदाज संघाबाहेर असल्याने टीम इंडियाला पुढील काळात मोठ्या अडचणींना समोरे जावे लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.