माझें नमन आधी गणा। सकळिक ऐका चित्त देऊनी।
धोनी ब्रिगेडची चढाई गाईन विश्वचषक मुलुखमदानी ॥
पारंपरिक दावेदार पाकिस्तान। प्रबळ असे दुश्मन।
धूळ चारता विराट, मग चाहत्यांना चढले हो अवसान॥
दक्षिण आफ्रिका समोर येता, अवघड दिसे घाटमाथा॥
शिखर बॅट सरसावीत आला, त्यांचा फोडीला हो तक्ता॥
सहजी अरब अमिरातीस अश्विन दाखवियले गगन॥
वेस्ट इंडिजच्या फौजेची शमी उडवी गाळण॥
आर्यलडचे शिखर करतो गर्वहरण झुलवून॥
काबीज करी झिम्बाब्वे, रैना सहज मात देऊन॥
नमियेले सहाही देश, अन् ल्याले जडिताचें भूषण।
कोण म्हणेल हा तोच संघ, ज्याचे गेले नाक कापून॥
कसोटी-तिरंगी मालिकेत सहज आला तो हरून॥
विश्वचषकामध्ये पराभवाची कात टाकली हो उतरून॥
क्रिकेट दुनिया काबीज केली। सत्तर विकेट घेऊन।
मग उपांत्य फेरीमध्ये तोच लौकिक आले राखून॥
पुन्हा एकदा केले गारद संपूर्ण विरोधी संघाला॥
रोहित पठ्ठा नाचला करून हतबल बांगलादेशाला॥
धन्य-धन्य महेंद्रसिंग धोनी वीर गाजला।
संघाला पूर्ण देऊन आधार कप्तान शोभला।
ब गटास झुंजवुनी पार भारतीय संघाचा केला विस्तार।
भरला विश्वचषक क्रिकेटचा दरबार बुद्धिबळात धोनी दमदार॥
झाला शिरजोर भारत उपांत्य फेरीत झुंजणार॥
सांगा धोनीसेनेचा हा विजयीरथ कोण धरणार॥
ना तर विश्वचषकाची फेरी, ती अंतिम भारत गाठणार॥
पजेचा मांडिला विडा घेऊनी तो खडा अवचित सरदार ॥
क्रोधाने मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियन कप्तान॥
बोलला गर्जून टाकू भरडून धोनी ब्रिगेड सतान॥
भरडून टाकतो धोनीचा मिळविलेला सन्मान ॥
२६ मार्चचा तो दिन उगवला शंकाकुशंका घेऊन॥
मायकेल क्लार्कची आली सेना गर्जत चाल करून ॥
खेळपट्टी संगनमताने स्वत:ला साजेशी केलेली आहे. पाटा खेळपट्टी. या खेळपट्टीवर विरोधक चालणारच logo05नाहीत याची पुरती तजवीज केलेली. अशा रीतीने ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला वेसण घालण्यासाठी फास आवळलेला आहे. आता फक्त कौल आपल्या बाजूला लागला की प्रथम फलंदाजी घ्यायची की विरोधकाला िखडीत गाठता येईल अशी सर्व योजना. सिक्का उडवला गेला. नशिबाचा फेरा बघा, अनेकदा कौल जिंकणारा आपला धोनी या अतिमहत्त्वाच्या सामन्यामध्ये कौल हरला आणि ऑस्ट्रेलियाच्या बाजूने अर्धी कामगिरी फत्ते झाली.
हसला मनात मायकेल क्लार्क, हो हो, जी जी जी..
सामना सुरू झालेला आहे. पहिल्यांदा विरोधी संघ फलंदाजीला आला
उमेशने वॉर्नरला बाजूला केला.
स्मिथ पाय रोवून उभा राहिला.
धोनीने विराटला गोलंदाजी दिली, भल्याभल्यांनी मोठे डोळे केले.
अश्विनला गोलंदाजी देण्याआधी धोनीने केलीही ही खेळी.
त्या पाटा विकेटवर अश्विनने गुगली सुरू केली.
बघता-बघता स्मिथने पन्नाशी पार केली।
त्याला अश्विनने गुगलला।
उमेशने मॅक्सवेल संपवला।
मग िफचलाही परत पाठवला।
मोहितने क्लार्कला उडवला ।
फॉकनरच्या उमेशने दांडय़ा गुल केल्या।
वॉटसन शेवटाला वळवळला।
त्याला मोहितने हवेतच टिपला।
म्हणता-म्हणता ऑस्ट्रेलियाने धावांचा डोंगर हो रचला।
उत्तर देण्यासाठी रोहित-शिखरने नांगर टाकला।
पण संयमाचा कडलोट होताच शिखरने विकेट फेकली आणि पाठोपाठ झुंजार विराट चालता झाला. रोहित, रैना निघाले. एकामागोमाग भारताचे कसलेले खेळाडू बाद होऊ लागले.
सारे चाहते सुन्न झाले, हो झाला हाहाकार।
अजिंक्य रोवून पाय रहाणे भरवशाचा साथीदार।
समजूनी कप्तानी खेळ करी, मग सोबत हो माही जी, रं हो जी रं हो जी रं हो दाजी
अजिंक्य डीआरएसचा बळी जाता सारी गात्रे हो थकली।
एकटाच मग किल्ला लढवी तो कप्तान माही।
रणझुंजार ऐसा गडी कधी पाहिला नाही।
झालो जरी पराभूत तरी जिंकला हो धोनी।
वेगवान त्रिकूटाने दखल घ्यायला लावली. सांघिक कामगिरी करत कुणालाही वाटले नसताना फक्त स्वत:च्या जोरावर इथपर्यंत पोहोचलेली ही धोनी ब्रिगेड. हारजीत हा खेळाचाच भाग असतो, पण तरीही कात टाकत सर्वानी आशा सोडलेला हा संघ इथपर्यंत पोहोचला यांचे कौतुक करायलाच हवे.
खरा क्रिकेटप्रेमी यातील जाणतो जी र्वम
खिलाडीवृत्ती असे हाच माना धर्म, हो जी जी जी..
करतो नमन पराभवाचे शल्य ठेवून मनात
शाहीर मांडतो सारे आज हो या कवनात हो जी जी जी..
हो जी जी जी..