क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ म्हटला जातो, पण प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांना जेव्हा आपले गोलंदाज नेस्तनाबूत करतात, तेव्हाच विजय मिळतो, असे मत भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केले आहे. जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करतात तेव्हा संघाचा कर्णधार म्हणून मी सर्वोत्तम ठरत असतो, अशी स्पष्टोक्ती धोनीने केली आहे.
‘‘जेव्हा गोलंदाज चांगली कामगिरी करत असतात तेव्हाच मी सर्वोत्तम ठरतो. तुमच्याकडे रणनीती असते तेव्हा तुमचे काम सोपे होत असते. या रणनीतीची योग्यपणे अंमलबजावणी करणे हे कर्णधाराचे काम असते. तुम्ही तेव्हाच सर्वोत्तम कर्णधार ठरता, जेव्हा तुम्हाला रणनीतीचा अवलंब चोखपणे करता येतो. तुम्ही दोन स्लीप्स लावालही, पण जर गोलंदाज पॅड्सवर चेंडू टाकत असेल तर काहीच होऊ शकत नाही. संघातील गोलंदाज हे रणनीतीनुसार गोलंदाजी करत असून, त्यामुळेच विजय मिळवणे शक्य होत आहे,’’ असे धोनी म्हणाला.
तो पुढे म्हणाला की, ‘‘आतापर्यंत वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. पण आर्यलडविरुद्धच्या सामन्यात त्यांना संघाला चांगली सुरुवात करून देता आली नव्हती. फिरकी गोलंदाजांनी प्रभावी गोलंदाजी करत आर्यलडला रोखले होते. सामन्याच्या अखेरच्या टप्प्यामध्ये वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली.’’